स्वातंत्र्ययुध्दानंतरचे ते भीषण दिवस गेले.  हळूहळू लोक शांत होत होते.  मने स्थिर होत होती, परंतु ती मने शून्यमय होती.  हृदयसिंहासन रिते होते.  कोणीतरी बसवायला तेथे हवे होते.  ब्रिटिश सत्ता मान्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.  परंतु भूतकाळाशी केवळ संबंध सुटत होता असे नाही.  केवळ एक नवीन सरकार येत होते.  एवढेच नव्हे तर अधिक काहीतरी येत होते.  संशय आणि गोंधळ. त्याचबरोबर आत्मश्रध्देचा अस्त याही गोष्टी आल्या.  स्वातंत्र्ययुध्दाच्या आधीच भूतकाळाचा संबंध तुटला होता.  बंगालमध्ये आणि इतरत्र विचारांच्या नवीन चळवळीही सुरू झाल्या होत्या.  नवीन जमान्याला आरंभ होऊन गेला होता.  परंतु हिंदूपेक्षा मुसलमान अधिकच कोपर्‍यात जाऊन बसणारे झाले.  पाश्चिमात्य शिक्षण त्यांनी टाळले आणि पुन्हा केव्हातरी पूर्व वैभवाचे पुनरुज्जीवन होईल अशा दिवसाच्या स्वप्नात ते गुंग होऊन राहिले.  परंतु १८५७ झाले, आणि आता ती स्वप्नेही भंगली.  आता तशा कल्पनांतही अर्थ नव्हता.  परंतु ज्याला चिकटून राहावे असे काहीतरी हवे होते.  पाश्चिमात्य शिक्षणापासून ते दूर राहिले.  हळूहळू आणि पुष्कळ वाद करून सर सय्यद अहमद खान यांनी त्यांचे मन नवीन शिक्षणाकडे वळविले.  त्यांना खूप अडचणी आल्या, परंतु न डगमगता त्यांनी अलीगढचे कॉलेज सुरू केले.  सरकारी नोकरीकडे जाण्याचा हाच राजमार्ग होता आणि नोकरीचे आमिष प्रभावी ठरून जुने रागद्वेष दूर झाले; पूर्वग्रह कमी झाले.  गैरसमजुती मागे पडल्या.  शिक्षणात आणि नोकर्‍या-चाकर्‍या पटकविण्यात हिंदूंनी आघाडी मारली आहे हा मुद्दाही त्यांना पटे आणि आपणही पुढे घुसले पाहिजे असे त्यांना वाटू लागले.  पारशी आणि हिंदू उद्योगधंद्यांतही पुढे जात होते.  परंतु मुसलमानांचे लक्ष फक्त सरकारी नोकरीचाकरीकडेच वळविण्यात आले.

परंतु या नवीन क्षेत्राकडे वळल्यामुळे त्यांच्या मनातील संशय आणि गोंधळ निरस्त झाला नाही आणि नोकरीच्या क्षेत्रात कितीसे जाणार ?  हिंदूंचीही तीच मन:स्थिती होती.  तेही भूतकाळाकडे बघत होते, प्राचीन ऐक्याकडे, वैभवाकडे पाहात होते.  प्राचीन वाङ्मय आणि तत्त्वज्ञान, कला आणि इतिहास यामुळे मनाला थोडे समाधान वाटे.  राममोहन रॉय, विवेकानंद, दयानंद यांनी नवीन वैचारिक चळवळी सुरू केल्या होत्या.  पाश्चिमात्य वाङ्मयाचे आकंठ पान जरी त्यांनी केलेले असले तरी त्यांची मने प्राचीन महर्षी आणि राजर्षी, तत्त्वज्ञानी आणि वीरपुरुष, पूर्वजांची सत्कृत्ये आणि पराक्रम यांनीच भरलेली असत.  लहानपणापासून ज्या दंतकथा आणि आख्यायिका त्यांनी ऐकलेल्या असत त्या त्यांच्या मनात भरलेल्या होत्या.

या परंपरेशी मुसलमानही परिचित असल्यामुळे हा वारसा त्यांचाही होता.  परंतु मुसलमानांतील वरिष्ठ वर्गांना विशेषत: वाटू लागले की, या थोड्याबहुत धार्मिक स्वरूपाच्या परंपरेपासून आपण दूरच राहायला हवे; या परंपरांना उत्तेजन देणे इस्लामी शिकवणीच्या विरुध्द होईल, असे त्यांना वाटले.  ते स्वत:चा राष्ट्रीय वारसा अन्यत्र शोधू लागले.  ते स्वत:ची सांस्कृतिक मुळे दुसरीकडे पाहू लागले.  हिंदुस्थानातील अफगाण आणि मोगल काळात त्यांना पाय ठेवायला आधार होता.  तो वारसा त्यांना होता.  परंतु तेवढा त्यांना हृदयातील पोकळी, शून्यता भरून काढायला पुरेसा वाटेना. कारण तो काळ हिंदु-मुसलमान दोघांनाही समान होता.  हे परकीयांचे आक्रमण ही भावनाही हिंदुमनातून दूर गेली होती.  मोगल राज्यकर्त्यांकडे हिंदी राष्ट्रीय राज्यकर्ते अशाच रीतीने पाहण्यात येई.  औरंगजेबाच्या बाबतीत अर्थात निराळी भावना होती.  ज्या अकबराची हिंदू विशेष नावाजणी करतात, त्याच्याविषयी मुसलमानांना अलीकडे तितकेसे वाटत नाही, असे दिसून येते.  गेल्या वर्षी अकबराची चतु:शत सांवत्सरिक जयंती साजरी करण्यात आली होती.  सर्व प्रकारचे लोक पुष्कळ मुसलमानही त्यात सामील होते.  परंतु मुस्लिम लीग अलग राहिली.  कारण अकबर हिंदुस्थानच्या एकतेचे प्रतीक म्हणून.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel