तैमूरने दिल्लीची राखरांगोळी केल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात त्राण राहिले नाही.  त्याचे खंड खंड झाले होते.  परंतु दक्षिणेची स्थिती बरी होती; आणि विजयानगरचे राज्य हे सर्वांत बलिष्ठ आणि वरिष्ठ होते.  त्याचा विस्तारही बराच होता.  उत्तरेकडील अनेक हिंदू लोक या शहरात आणि या राज्यात आश्रयार्थ आले.  समकालीन वर्णनावरून असे दिसते की, विजयानगर शहर अती सुंदर व संपन्न होते.  मध्य आशियातील अब्दूररझाक लिहितो की, ''या सर्व पृथ्वीवर असे शहर डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही.''  या शहरात भव्य बाजारपेठा होत्या.  मेहेरपींची कमानदार दुकाने होती.  मोठमोठ्या हवेल्या होत्या आणि सर्वांहून उंच असा तो राजवाडा होता.  त्याच्याभोवती नाना लहान लहान प्रवाह, घोटीव प्रमाणशीर पाषाणांनी बांधून काढलेल्या कालव्यातून खळखळा वाहात असत.  शहरभर सर्वत्र बागबगीचे होते.  निकोलो कोन्टी हा इ. सन १४२० मध्ये येथे आला होता.  तो या शहराचा परीघ साठ मैल होता असे लिहितो.  या विस्तृत व विशाल बागांमुळे त्याला असे वाटले असावे.  युरोपातील दुसरा एक पोर्तुगीज प्रवासी पैस हा सन १५२२ मध्ये या शहरात आला होता.  युरोपातील नवयुगामध्ये गजबजलेली शहरे त्याने पाहिलेली होती.  तो म्हणतो, ''विजयानगर रोमएवढे मोठे आहे आणि प्रेक्षणीय आहे.''  तो आणखी

-----------------------
*  दक्षिणेकडील बहामनी राज्याच्या उदयाची आणि या नावांची एक मनोरंजक हकीकत आहे.  एका अफगाण मुसलमानाने हे राज्य स्थापिले.  पूर्व-वयात गंगू ब्राह्मणाने त्याला आधार दिला होता.  कृतज्ञतेमुळे या अफगाणाने गंगू ब्राह्मणाचे नाव स्वत:ला लावले आणि त्याच्या वंशाला पुढे बहामनी (ब्राह्मणी) हे नाव पडले.

लिहितो की, ''अनेक सरोवरे, जलप्रवाह, उद्याने यांची जिकडेतिकडे गर्दी असलेले हे नगर मोठे शोभिवंत व अजब आहे.  कशाचीही इथे ददात नाही.  जगातील सर्वांत सुसमृध्द असे हे शहर आहे.''  राजवाड्यातील दिवाणखाने हस्तिदंती होते.  पहावे तेथे हस्तिदंत.  छतामध्ये गुलाब आणि कमळे हस्तिदंदात खोदलेली सुंदर दिसत.  ''हे शहर इतके सुंदर व वैभवशाली आहे की असे दुसरे कोठे क्वचितच आढळेल.''  त्या वेळी राजा कृष्णदेवराय राज्य करीत होता.  त्याच्याविषयी हा पोर्तुगीज प्रवासी लिहितो, ''सर्वांना त्याचा दरारा आहे.  हा आदर्श राजा स्वभावाने आनंदी व उत्साही आहे.  परदेशीयांचे स्वागत करण्याची त्याला हौस आहे.  त्यांचा दर्जा कोणताही असो,  मोठ्या मेहेरबानीने त्यांची भेट घेऊन, त्यांची विचारपूस करतो.''

दक्षिणेकडे विजयानगर वाढत असताना वरती दिल्लीच्या दुबळ्या सुलतानाला नवीन शत्रूला तोंड द्यावे लागले.  उत्तरेकडच्या खिंडीतून आणखी नवीन हल्ले करणारा आला.  ज्या रणांगणावर या देशाचे भवितव्य अनेकदा ठरले त्या पानिपतच्या रणभूमीवरच १५२६ मध्ये लढाई झाली.  आणि या स्वारी करणार्‍याने दिल्लीचे सिंहासन जिंकले.  या विजयी पुरुषाचे नाव बाबर.  तो तैमूरच्या वंशातील तुर्को-मोगल घराण्यातील होता.  हिंदुस्थानातील मोगल साम्राज्याचा त्याने पाया घातला.

दिल्लीची सत्ता दुबळी होती म्हणूनच केवळ बाबर विजयी झाला असे नाही.  त्याच्याजवळ एक नवीन युध्दतंत्र होते.  हिंदुस्थानात माहीत नसलेला असा तोफखाना त्याच्याजवळ होता.  युध्दतंत्रात प्रगती करण्यात या वेळेपासून हिंदुस्थान मागे पडत चालला तो चालला.  तसे पाहिले तर सारे आशिया खंड या युध्दतंत्रात होते तेथेच राहिले व युरोपखंड पुढे जाऊ लागला.  दोनशे वर्षे मोगलसत्ता हिंदुस्थानात प्रबळ होती.  परंतु युरोपियन सैन्ये आली असती तर मोगलांना सतराव्या शतकानंतरच्या काळात त्यांच्याशी यशस्वी रीतीने तोंड देणे कठीण गेले असते.  समुद्रावर सत्ता असल्याखेरीज युरोपियन फौजा इकडे येणे कठीण होते.  या काळात युरोपात दर्यावर्दी सत्ता वाढीस लागत होती, हा एक महत्त्वाचा बदल होत होता.  तेराव्या शतकात दक्षिण हिंदुस्थानातील चोलांची सत्ता संपली आणि हिंदी दर्यावर्दी प्रभुत्व झपाट्याने मागे पडले.  लहानशा पांड्य राज्याचा समुद्राशी निकट संबंध होता, परंतु त्यांची सत्ता फारशी नव्हती.  तरीसुध्दा पंधराव्या शतकापर्यंत हिंदी वसाहतींनी हिंदी सागरावर प्रभुत्व ठेवले होते, पण पुढे अरबांनी त्यांना हाकलून दिले आणि अरबांच्या पाठोपाठ पोर्तुगीज आले.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel