या असल्या जुन्या प्राचीन मंदिरांचा भव्यपणा व सौंदर्य हेही त्या काश्मीरच्या मोहिनीचे एक कारण नाही. निसर्गरचना व कलासौंदर्य यांचा तेथे समन्वय साधला आहे हे एक कारण म्हणावे, तर निसर्गसौंदर्याची स्थळे नेमकी निवडून तेथे बांधलेल्या रमणीय वास्तू, इतर अनेक देशांतूनही आढळतात. पण केवळ काश्मीरातच आढळणारा विशेष हा की तेथे निसर्ग आणि कला यांच्यातील ह्या दोन्ही प्रकारच्या सौंदर्याचा संगम अशा काही स्थळी आढळतो की, तेथील निसर्गात अद्यापही गूढ जीवनाचा संचार आहे. त्या तेथील निसर्गाची मंद स्वरात चालविलेली कुजबुज अद्यापही आपल्याला ऐकविण्याची शक्ती त्या निसर्गात आहे. सगळा निसर्ग देवदेवतामय आहे अशी जी भावना मानवी समाजात पुरातनकाली होती, त्या भावनेचे संस्कार अद्यापही आपल्या अंतर्यामी कोठेतरी खोल दडलेले असतात. त्या संस्कारांना हळूवार चालना देऊन, मानववंशाच्या युवावस्थेतील एका सृष्टीत आपल्याला कळत न कळत नेऊन सोडण्याची शक्ती या निसर्गाच्या मंद स्वरात आहे. ही सृष्टी नाहीशी झाली आहे, म्हणून खेद झालेल्या एका कवीने त्या सृष्टीचे वर्णन केले आहे ते हे की, त्या सृष्टीत
''पृथ्वीसाठी मानव । आकाशी अंतराळी देव ।
प्रत्यक्ष वर्तले सजीव । चालती बोलती ॥''*
---------------------------
* 'ल आर्ट ग्रीको-बोधिक द गांधार' (गांधारात आढळून आलेली ग्रीक-बौध्द कला)
पण मला काश्मीरविषयी जिव्हाळा वाटतो म्हणून मी जी केव्हा केव्हा त्या नादात रंगून असा भलतीकडेच वहावत असलो, तरी मला येथे काश्मीरचे गुणगान करावयाचे नाही, आणि निसर्गात देवदेवता सृष्टीचा संचार आहे अशा धर्मकल्पनेचे काही एखाद्या युक्तिवादाचे मला येथे समर्थनही करावयाचे नाही. खरे म्हणजे या धर्मकल्पनेवर थोडीफार श्रध्दा बसली तर मानवाच्या देहाला व मनाला ती कल्याणकारकच आहे असे मानण्याइतपत माझ्यातही त्या कल्पनेचा अंश आहे, पण ते वेगळे. पण असे मात्र माझे ठाम मत आहे की, मातीशी मानवाचा संबंध सर्वस्वी तुटला तर मानवजातीची प्राणशक्ती हळूहळू झिजून नाहीशी होणार. अर्थात ही ताटातूट कायमची अशी क्वचितच होते व निसर्गातल्या अशा कोणत्याही प्रक्रियेला खूपच कालावधी जावा लागतो. पण आधुनिक सुधारणा युगाचा एक मोठा दोष हा आहे की, त्यामुळे मानवी जीवन प्राणशक्तीच्या उमगापासून लांबलांब होत चालले आहे. आधुनिक भांडवलशाही समाजाची स्पर्धा व आक्रमणलालसा ही विशेष लक्षणे, धन हेच सारसर्वस्व मानून कुबेराला परमेश्वरपद देण्याची ह्या युगाची प्रवृत्ती, कशाचीच शाश्वती धरता येत नाही, सारखा ताण पडतो आहे अशी बहुतेकांची स्थिती, यामुळे मानसिक आरोग्य अधिकच बिघडते आहे, नवे मानसिक रोग उत्पन्न होताहेत. समाजाची अधिक समतोल आर्थिक घडी वेळीच सुज्ञपणा दाखवून बसवली तर ह्या स्थितीत काही सुधारणा होण्याचा संभव आहे. पण काही थोडीफार सुधारणा ह्या स्थितीत झाली तर मानवाचा हल्ली आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक, अगदी जिव्हाळ्याचा संबंध, धरतीमातेशी व निसर्गाशी राखणे अगदी अवश्य आहे. संबंध ह्या शब्दाचा जुना संकुचित अर्थ घेऊन जुन्या काळाप्रमाणे शेतीतच राबावे, किंवा अगदी प्रथमावस्थेतील वन्य मानवाप्रमाणे राहणी ठेवावी अशा अर्थाचा संबंध येथे अभिप्रेत नाही. आहे त्या रोगापेक्षा, न जाणो, कदाचित असले उपायच घातुक ठरायचे. माणसांचा धरतीमातेशी संबंध होता होईल तो निरंतर राहील अशा प्रकारे आधुनिक उद्योगधंद्याची व्यवस्था लावणे व ग्रामीण भागातून तेथील जनतेच्या संस्कृतीचे मान वाढविणे शक्य दिसते. जीवनातील विविध सुखसोयींच्या बाबतीत नगरे व ग्रामे यांच्यात देवाण-घेवाण राहावी, म्हणजे दोन्ही ठिकाणच्या लोकांना आपली शारीरिक व मानसिक वाढ पूर्ण करायला आपले जीवन सर्वांगपरिपूर्ण करायला पुरेशी संधी मिळत राहील.
लोकांना खरोखर हे साधावे असे मनापासून वाटत असले तर ते शक्य आहे याविषयी मला फारशी शंका वाटत नाही. निदान हल्ली तरी अशी इच्छा लोकांत सर्वत्र पसरलेली आढळत नाही. एकमेकांचा जीव घेण्यात खर्ची पडणारी शक्ती वजा जाता शिल्लक उरलेली जगातली लोकांची शक्ती नकली कृत्रिम पदार्थ निर्माण करण्यात व आपल्या जिवाला कशीबशी खोटीनाटी करमणूक करून घेण्यात भलतीकडेच खर्ची पडत असते. हे पदार्थ किंवा ही साधने बहुतेक मुळीच नकोत असे माझे म्हणणे नाही, त्यांपैकी काही असे आहेत की, ते अवश्य आहेत हे निश्चित, पण अधिक चांगल्या कामी लावता येण्याजोगा वेळ त्यांच्यापायी फुकट जातो, जीवनाकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोण त्यापायी भलतीकडेच वळतो. आजकाल कृत्रिम खताला फार मोठी मागणी आहे, त्याच्या परीने ते बरेही असेल. पण ह्या कृत्रिम खताचेच वेड घेऊन त्याच्या नादात लोकांना नैसर्गिक खताचा पार विसर पडावा एवढेच नव्हे तर हे नैसर्गिक खत लोकांनी भलत्या कामात फुकट घालवावे, किंवा फेकून द्यावे, हा प्रकार मला मोठा चमत्कारिक वाटतो. देशाच्या हिशेबाने पाहू गेले तर केवळ चीन देश काय तो असा दिसतो की, तेथील लोक या नैसर्गिक खताचा पूर्ण उपयोग करून घेण्याइतका सुज्ञपणा दाखवतात. काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, कृत्रिम खताने परिणाम तत्काळ होत असला तरी शेतजमीनीला अवश्य असलेली काही द्रव्ये त्या जमिनीतून या खतामुळे नाहीशी होऊन जमिनीचा कस जातो, आणि उत्तरोत्तर पीक येईनासे होते. जमीन घ्या किंवा माणसाचे वैयक्तिक जीवन घ्या हल्ली अवस्था अशी आहे की, हाती लागलेला हा ऊस दोन्ही टोकांकडून खाण्याचा सपाटा भलताच चालला आहे. जमिनीतून काढायचे खंडोगणती आणि तिच्यात परत टाकायचे ते मात्र तोळ्यावारी किंवा मुळीच टाकायचे नाही असा प्रकार आपण चालविला आहे.