आपले-आपल्या वर्गाचे हित तेच हिंदुस्थानचे हित अशी, ह्या प्रकारची समजूत वरिष्ठ खात्यांतील अंमलदारांची असे व या वरिष्ठ खात्यांमध्ये ब्रिटिशच फक्त असत. त्यांच्यातुनच पुढे 'इंडियन सिव्हिल सर्व्हिस' सनदी नोकरशाहीची पोलादी चौकट निर्माण झाली. एका इंग्रज लेखकाने, ''जगातील अत्यंत चिवट असे ट्रेड युनियन'' असे त्याचे वर्णन केले आहे. हे आय.सी.एस. वाले देशाचा कारभार चालवीत, ते म्हणजे हिंदुस्थान, त्यांच्या स्वार्थाला धक्का लावणारे हिंदुस्थानही अहितकारक. या सनदी नोकरांमुळे आणि जो काही इतिहास व जे काही वृत्तान्त ब्रिटिश जनतेला वाचायला मिळत, त्यावरून ब्रिटिश जनतेतील सर्व वर्गांचे हिंदुस्थानसंबंधी हेच मत बनले. सत्ताधारी वर्ग तर या मतांशी संपूर्णपणे सहमत होताच, परंतु इंग्लंडातील शेतकरी-कामकरीवर्गावरही याचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. स्वत:च्या देशात त्यांना मानसन्मानाचे स्थान नव्हते तरी हिंदी साम्राज्याचे-हिंदुस्थानचे आपण मालक या गोष्टीचा त्यांना अभिमान वाटे. इंग्लंडातील शेतकरी किंवा कामगार येथे आला तर तो एकदम सत्ताधारी वर्गाचा बने. हिंदी इतिहास, हिंदी संस्कृती यांचे त्याला काडीमात्र ज्ञान नसे, आणि हिंदुस्थानबद्दल कोणती विचारसरणी बरोबर आहे ते ठरवायला त्याच्यापाशी दुसरे कोणतेही साधन किंवा कसलीही मूल्ये नसल्यामुळे हिंदुस्थानातील ब्रिटिशांनी रूढ केलेली विचारसरणीच तोही स्वीकारी. फार झाले तर त्याला मोघम कळवळा येईल, पण तो कळवळासुध्दा या अधिकारीवर्गाच्या मूलभूत विचारसरणीच्या चौकटीच्या मर्यादेत बसेल तितकाच. जवळजवळ शंभर वर्षे ब्रिटिश जनतेच्या सर्व वर्गातून, थराथरांतून ही सार्वभौमवृत्ती, आपण हिंदुस्थानचे धनी ही वृत्ती सर्वांच्या रोमरोमात शिरली. ही वृत्ती म्हणजे त्यांचा राष्ट्रीय वारसा होऊन हिंदुस्थानकडे पाहण्याची ही एक ठराविक दृष्टी बनून गेली व त्यांच्या स्वत:च्या देशाबाबत विचारसरणीवरही या दृष्टीचा न कळत परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. आजचे ब्रिटिश मजूर पक्षाचे पुढारी म्हणजे ज्यांच्याजवळ ठराविक तत्त्वे नाहीत अशांचा एक विचित्र संघ. तेही हिंदुस्थानातील ब्रिटिश व्यवस्थेचे अगदी कट्टे पाठीराखे असतात. कधी कधी स्वदेशातील धोरण व वसाहतींच्या बाबतीतील धोरण यांतील विरोध मनासमोर येऊन आपली ध्येयांची तोंडपाटीलकी व हातून होणारी विपरीत कृती यांच्यातील विरोध लक्षात येऊन ते कधीमधी मनात अस्वस्थ होतात, परंतु किती झाले तरी व्यवहार आधी पाहिला पाहिजे असे शेवटी ठरवून आपल्या सदसदद्विवेकबुध्दीची चुळबूळ ते दडपून टाकतात. व्यवहारी लोकांनी रूढी व्यवहारानुसार पावले टाकली पाहिजेत, चालू असलेल्या परंपरेप्रमाणेच पुढे वागले पाहिजे. उगीच ध्येयाच्या भरी पडून, एखाद्या नवीन तत्त्वज्ञानाचा नवीन अनुभव घेण्याच्या भानगडीत पडून अज्ञानात पाऊल टाकणे-असल्या गोष्टी व्यवहारी माणसे कधी करीत नसतात.
थेट विलायतेतून जे बडे लाटसाहेब येतात त्यांना सनदी नोकरांच्या चौकटीवर संपूर्णपणे विश्वसून आणि त्यांच्याशी समरस होऊनच वागावे लागते. ते स्वत: इंग्लंडातील सत्ताधारी व मत्ताधारी वर्गातील असल्यामुळे आय.सी.एस.वाल्यांची दृष्टी स्वीकारणे त्यांना कठीण जात नाही; आणि अतुलनीय अनियंत्रित सत्तेच्या या अपूर्व पदाचे ते अधिकारी झाल्यामुळे त्यांच्या बोलण्याच्या व वागण्याच्या रीतीत कळतो न कळतो असा सूक्ष्म पालट होऊ लागतो; आणि हिंदुस्थानातील कोट्यवधी लोकांवर सत्ता चालविणारा ब्रिटिश व्हाइसरॉयांसारखा अनियंत्रित हुकुमशहा या विशाल जगात पूर्वीही कोणी झाला नसेल, आजही नसेल. इंग्लंडमधील मुख्य प्रधान किंवा अमेरिकेचा अध्यक्ष बोलायला धजणार नाही अशा रीतीने हे बडे लाटसाहेब बिनदिक्कत बोलतात. तुलनाच करावयाची झाली तर हिटलरशी करता येईल, आणि एकटा व्हाइसरॉयच याप्रमाणे बोलू शकतो असे नाही, तर त्याच्या कार्यकारी मंडळातील सारे ब्रिटिश सभासद, तसेच ते गव्हर्नर, ते कलेक्टर, निरनिराळ्या खात्यातील बडेबडे चिटणीस-सार्यांचा एकच खाक्या, एकच नमुना. जणू आकाशातून, हिमालयाच्या उंचीवरून ते बोलत असतात. ते आपण करतो आणि बोलतो, ते बरोबरच असले पाहिजे; मानले जाईलच याविषयी ते नि:शंक असतात. मग इतर क्षुद्र, मर्त्य माणसे काहीही म्हणोत, कारण सत्ता व मत्ता, वैभव व दिमाख कोणाचा असेल तर तो त्यांचा.