परंतु ग्रीक संस्कृतीने जे काही नवेनवे निर्माण करण्यात यश मिळविले त्या सर्वांत महत्त्वाचे जर कोणते एक अपूर्व अंग असेल तर ते प्रायोगिक विज्ञानाचा आरंभ हे होय.  प्रत्यक्ष ग्रीस देशापेक्षा अलेक्झांड्रियाभोवतालच्या ग्रीक जगात या विज्ञानाचा अधिक विकास झाला.  यांत्रिक शोध व विज्ञानविकास यासाठी ख्रि.पूर्व ३३० ते १३० ही दोन शतके निराळी उमटून पडतात.  सतराव्या शतकात पुन्हा विज्ञानाची घोडदौड सुरू होईपर्यंत ग्रीकांच्या या विज्ञानविकासाची तुलना करण्यासारखे हिंदुस्थानातच नव्हे, तर जगात सुध्दा काही दिसून येणार नाही.  रोमलाही प्रचण्ड साम्राज्य, नाना देशांतील लोकांचे शोधबोध मिळवून घेण्याची अपार संधी व ग्रीक संस्कृतीशी निकटचा संबंध हे सारे असूनही, विज्ञानात, यांत्रिक शोधांत भर घालता आली नाही.  युरोपात ग्रीक व रोमन संस्कृतींचा विनाश झाल्यावर मध्ययुगात शास्त्रीय ज्ञानाची ज्योत जर कोणी पेटत ठेवली असेल तर ती अरबांनी होय.

अलेक्झांड्रिया येथे शास्त्रीय प्रवृत्तीचा, नव्या नव्या शोधांचा जो हा बहार एकदम आला तो त्या काळातील सामाजिक परिस्थितीचाच परिणाम होय.  वाढत्या समाजाच्या गरजांमुळे दर्यावर्दी लोकांच्या अडचणींमुळे त्याला उपाय म्हणून हे सर्व निघाले.  हिंदुस्थानातील शून्याचा शोध, एकंदहं वगैरे स्थानमूल्य पध्दती सामाजिक गरजांतूनच निर्माण झाल्या.  कारण त्या काळी व्यापार वाढत होता व व्यापारी संबंध अधिक गुंतागुंतीचे होत होते.  परंतु ग्रीक लोकांत ही शास्त्रीय प्रवृत्ती सर्व समाजांत खेळत होती असे नि:शंकपणे म्हणता येणार नाही, कारण सर्वसाधारण जनता प्राचीन परंपरा व आदर्श पुढे ठेवून चालली होती.  मानवाचा व निसर्गाचा मेळ घालू पाहणार्‍या परंपरागत तत्त्वज्ञानाचाच सर्व ग्रीक जनतेवर पगडा होता.  ग्रीक व हिंदी जनता यांच्यात साम्य आहे ते येथेच आहे.  ग्रीस देशात काय किंवा हिंदुस्थानात काय, निरनिराळ्या उत्सवांनी वर्षाची विभागणी होई. वेगवेगळ्या ॠतूंच्या आरंभी ठरीव उत्सव वृत्ती पालटून सृष्टीच्या स्वरूपाशी मानवही आपले स्वरूप जुळवून घेई. अद्यापही भारतात हे उत्सव आहेत. थंडी संपून वसंत आला की होळीचा सण व पिके शरद्ॠतूच्या अखेरीला तयार होतात तेव्हा दिवाळीचा सण आणि प्राचीन रामायण, महाभारतातील वीरपुरुषांचे उत्सव रामलीला कृष्णलीला वगैरे होतात. हे असे उत्सव आले म्हणजे त्या त्या उत्सवांची गाणी व कृष्णगोपींच्या रासलीलेसारखे नाच होतात.

प्राचीन भारतातील स्त्रिया समाजात मोकळेपणाने वावरत.  राजघराण्यातील व सरदारघराण्यातील स्त्रियांची गोष्ट जरा निराळी होती.  हिंदुस्थानातल्यापेक्षा ग्रीस देशातच स्त्रियांवर अधिक बंधने होती.  पुरुषांत त्या मिसळू शकत नसत.  प्राचीन भारतीय ग्रंथांत सुप्रसिध्द आणि विदुषी स्त्रियांचे वरचेवर उल्लेख येतात.  पुष्कळ प्रसंगी सार्वजनिक वादविवादात त्या भाग घेत.  ग्रीस देशात विवाहाला एका अर्थी कराराचेच रूप होते.  परंतु हिंदुस्थानात विवाहाचे दुसरे अनेक प्रकार जरी उल्लेखिलेले असले तरी सर्वसाधारणपणे विवाह म्हणजे एक पवित्र धार्मिक मीलन असे समजण्यात येई.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel