आणीबाणीची वेळ येण्यापूर्वीच शेतकरी आणि कामगार यांच्या हिताचे कायदे करायची राष्ट्रसभेच्या मंत्रिमंडळांना, विधिमंडळातील राष्ट्रसभेच्या पक्षांना उत्सुकता होती.  केव्हा अरिष्ट येईल याचा नेम नव्हता, सारी परिस्थितीच प्रक्षोभक होती.  सर्व प्रांतातून एक वरिष्ठ विधिमंडळही होते.  त्यांचा मतदारसंघ फार मर्यादित होता.  जमीनदार, कारखानदार यांचे प्रतिनिधी या मंडळात असत.  प्रगतिपर कायदेकानू करायला या दुसर्‍या सभागृहाचा त्याचप्रमाणे अनेक इतर गोष्टींचे अडथळे होते.  संमिश्र मंडळामुळे या अडचणी अधिकच वाढल्या असत्या आणि आसाम व सरहद्दप्रांताखेरीज अन्यत्र तूर्ततरी संमिश्र मंत्रिमंडळे नकोत असा निर्णय घेण्यात आला.

हा निर्णय अखेरचा होता असे नाही; फरक करावा लागण्याची शक्यता डोळ्यासमोर होती; परंतु परिस्थिती झपाट्याने बदलत होती आणि फरक करणे अधिकाधिक बिकट होत चालले.  त्या त्या प्रांतातील राष्ट्रसभेची सरकारे तत्काळ सोडवायला पाहिजेत अशा शेकडो प्रश्नांत मग्न होऊन गेली.  काही वर्षानंतर संमिश्र मंत्रिमंडळे बनवली नाहीत हे चांगले केले की वाईट याबद्दल अनेक मते रूढ झाली.  त्यांतील शहाणपणाविषयी किंवा गैरमुत्सद्दीपणाविषयी अनेकांची अनेक मते आहेत.  गोष्ट घडून गेल्यावर शहाणे होणे सोपे असते.  परंतु आजही मला असे वाटते की, त्या वेळच्या परिस्थित्यनुसार आणि राजकीय दृष्ट्या आम्ही जे केले तेच तर्कदृष्ट्या आणि नैसर्गिकरीत्या बरोबर होते, तथापि जातीय प्रश्नावर दुर्दैवेकरून त्याचे विपरीत परिणाम झाले ही गोष्ट खरी आणि त्यामुळे अनेक मुसलमानांना आपणास दूर सारण्यात आले असे वाटू लागले.  त्यांना दुखावल्यासारखे वाटले.  आपल्या बाबतीत अन्याय झाला अशी त्यांची समजूत झाली.  या भावनेचा प्रतिगामी गटांनी फायदा घेतला आणि त्यांनी स्वत:ची शक्ती वाढवली.

नवीन कायद्यामुळे किंवा प्रांतामध्ये राष्ट्रसभेची सरकारे होती म्हणून ब्रिटिश सरकारच्या एकंदर राज्यकारभारविषयक तंत्रात फारसा बदल झाला असे मुळीच नाही.  खरी सत्ता आजवर जेथे होती तेथेच अजूनही होती.  परंतु लोकांच्या मनोरचनेत विलक्षण बदल झाला.  सर्व देशात एक प्रकारची विद्युत् संचारल्यासारखे झाले.  शहरांपेक्षा खेड्यापाड्यांतून हा फरक अधिक स्पष्टपणे दृग्गोचर झाला.  शहरातील कामगार लोकांतही अशीच प्रतिक्रिया झाली.  शिरावरचे एक अजस्त्र ओणे निघाले असे कोट्यवधी जनतेस वाटले.  सुटकेचा जणू त्यांनी सुस्कारा सोडला.  शेकडो वर्षे दडपून ठेवलेली जनतेची शक्ती उफाळून सर्वत्र वर आली.  गुप्त पोलिसांचे भय नष्ट झाले, तात्पुरते तरी कमी झाले; आणि दारिद्र्यातील दरिद्री शेतकर्‍यालाही मान उंच करून चालावेसे वाटू लागले.  स्वाभिमान आणि स्वावलंबन याची भावना त्याच्याजवळ अधिक दिसू लागली.  आपणांसही महत्त्व आले, आपली उपेक्षा करून भागणार नाही ही पहिल्यानेच त्याला आता जाणीव होत होती.  अत:पर सरकार म्हणजे अपरिचित आणि दूर कोठेतरी असणारे राक्षसाप्रमाणे नव्हते; अधिकार्‍यांच्या शेकडो थरांनी दुरावलेले, ज्या सरकारकडे त्याला दाद मागता येत नसे, ज्याच्यावर परिणाम करता येत नसे, शक्य तितके त्याच्याजवळून उकळण्यासाठीच जे सरकार आणि ज्याचे अधिकार असत, असे सरकार आता नाही असे त्याला वाटले.  ज्यांना त्याने अनेकदा पाहिले होते, ज्यांची भाषणे ऐकली होती, ज्यांच्याशी तो बोलला होता, ते लोक आता त्यासत्तेच्या जागेवर आरूढ झाले होते; तुरुंगात तो व ते कधी एकत्र राहिलेले असत, आणि एक प्रकारचा भ्रातृभाव त्यांच्यात जणू होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel