ही गोष्ट भगवंताला समजली, तेव्हां त्यानें त्या दोघांला बोलावून आणून चौकशी केली इत्यादि.

यावरून असें दिसून येतें कीं भगवंतानें आरंभीं रात्रिभोजनाचा तेवढा निषेध केला असावा. आणि संघांतील बहुतेक भिक्षूंना ही गोष्ट पसंत पडल्यामुळे हा नियम सर्वसंमत झाला असावा. लटुकिकोपमसुत्तांत (मज्झिमनिकाय नं. ६६) उदायी भगवंताला म्हणातो, “भदंत, एकान्तांत असतांना माझ्या मनांत असा विचार आला कीं, भगवंतानें पुष्कळशा दुःखकारक गोष्टी आम्हांपासून दूर केल्या आणि पुष्कळशा सुखकारक गोष्टी आम्हांला प्राप्त करून दिल्या... भदन्त, आह्मी पूर्वी संध्याकाळीं, सकाळी, दुपारी आणि दुपार होऊन गेल्यावरहि जेवीत होतों. अशी एक वेळ होती कीं भगवंतानें भिक्षूंला दिवसा अवेळी जेवण्याची मनाई केली. त्यावेळीं मला फार वाईट वाटलें. श्रद्धाळु गृहस्थ दिवसा विकाळीं आम्हांला खाण्यापिण्याचे जिन्नस देतात, त्यांचीहि भगवान् मनाई करीत आहे हें मला आवडलें नाहीं. परंतु भगवंतावर असलेल्या प्रेमामुळें, भगवंताच्या गौरवानें, लज्जा आणि लोकापवादभय जाणून दिवसा विकाळीं खाणें आम्ही सोडून दिलें. पण आम्ही सकाळीं व संध्याकाळीं जेवीत होतों. त्यानंतर भगवंतानें रात्रीं भलत्याच  वेळीं खाण्याची मानाई केली. तेव्हांहि मला वाईट वाटलें. या दोन जेवणांत जें उत्तम जेवण तेंहि आम्हांस भगवान् सोडावयास सांगतो हें मला आवडलें नाहीं.... परंतु भगवंतावर असलेल्या प्रेमानें, भगवंताच्या गौरवानें, आणि लज्जा व लोकापवादभय जाणून आम्हीं रात्रीं अवेळीं जेवण्याचेंहि सोडून दिलें. हा  नियम करण्यापूर्वीं भिक्षू आंधेर्‍या रात्रीं भिक्षाटन करीत असतां गटारांत किंवा घाणीच्या डबक्यांत पडत असत, कांट्यांत शिरत, निजलेल्या गायीवर पडत, चोरी करून येणार्‍या किंवा चोरी करण्यास जाणार्‍या चोरांच्या तावडींत सांपडत....मींहि एके वेळीं असाच भिक्षाटन करण्यसास गेलों होतों. तेथें एक स्त्री आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूस भांडीं घांशीत होती. मला पाहून ‘हें भूत आहे, हें पिशाच आहे,’ असें ती मोठ्यानें ओरडली. तेव्हां मी तिला म्हणालों, ‘भगिनी, मी पिशाच नाहीं, मी भिक्षु आहें, व येथें भिक्षेसाठी उभा राहिलों आहें. ती म्हणाली ‘अरे भिक्षू, तुझी आत्या मरो, माता मरो, कसायाच्या तीक्ष्ण सुरींने तुझे पोट कापून काढलेलें चांगले. पण अशा अंधेर्‍या रात्री तुला हें भिक्षाटन करणें चांगलें नाहीं.’ भदन्त, या गोष्टीची जेव्हां मला आठवण होते, तेव्हां भगवंताने पुष्कळशा दुःखकारक गोष्टी आम्हांपासून दूर केल्या व पुष्कळशा सुखकारक गोष्टी आम्हांस प्राप्त करून दिल्या असें मला वाटतें.”

या गोष्टीवरून असें दिसून येतें कीं, प्रथमतः भगवंतानें भलत्याच वेळीं खाण्याचा निषेध केला. तरी रात्रीच्या जेवणाचा निषेध केला नाहीं. नंतर सकाळी बारा वाजण्यापूर्वी एकदां व सायंकाळी सूर्यास्तापूर्वीं एकदां अशीं दोनच जेवणें जेवण्याचा नियम केला असावा. भगवान स्वतः सकाळचें एकच जेवण जेवीत होता, व भिक्षूंनांहि तसें करण्यास उपदेश करीत असे, याचा उल्लेख ककचूपमसुत्तांत (माज्झिम. नं.२१) आला आहे. परंतु सध्याचा प्रघात असा आहे कीं, अरुणोदयापासून मध्याहृकाळपर्यंत भिक्षूनें वाटेल तितक्या वेळां खावें. बारा वाजल्यापासून दुसर्‍या दिवशी अरुणोदयापर्यंत विकाल समजला जातो. सप्तदशवर्गीय भिक्षू बारा वाजल्यांतर खाण्याचे पदार्थ खात त्यामुळें हा नियम करावा लागला असें विनयग्रंथांत सांगितलें आहे. परंतु विनयाचा आणि सुत्तपिटकांतील वर दिलेल्या उतार्‍यांचा स्पष्ट विरोध दिसून येतो.आणि विनयाच्या अशा प्रकारच्या कथा मागाहून रचल्या गेल्या असाव्या हें उघड होतें.

वज्जिपुत्तक नांवाचा एक भिक्षु होता. तो भगवंतापाशीं आला आणि म्हणालाः- “हा दीडशें शिक्षापदें (नियम) दर पंधरवड्याला म्हटलीं जातात. तीं शिकणें मला शक्य नाहीं.” भगवान् म्हणालाः- “तूं अधिशीलशिक्षा, अधिचित्तशिक्षा आणि अधिप्रज्ञाशिक्षा या तीन शिक्षा (नियम) शिकशील काय?” वज्जिपुत्तक म्हणालाः- “या तीन शिक्षा शिकणें मला शक्य आहे. भगवान म्हणाला:- “जर तूं या तीन शिक्षा शिकशील तर तुझा राग, द्वेष आणि मोह नष्ट होईल, आणि तुझ्या हातातून पापकर्म घडणार नाहीं.१ ”
------------------------------------------------------------------------------------------------------------
१. या तीन शिक्षांची सविस्तर माहिती बुद्ध, धर्म आणि संघ या पुस्तकांतील दुसर्‍या व्याख्यानांत धर्म या सदराखालीं दिली आहे. वरील सुत्त अंगुत्तरनिकायाच्या तिकनिपाताच्या दुसर्‍या पण्णासकाच्या, चवथ्या वग्गांतील चवथें आहे. Pali Text Society च्या एडिशनमध्यें यासुत्ताचा नंबर ८३ दिला आहे. तो चुकीचा आहे. ८१ आणि ८२ या दोन सुत्तांचा समावेश एका ८१ व्या सुत्तांतच केला गेल्यामुळें असा घोंटाळा झाला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel