४६
धम्मदिन्ना

“धर्मोपदेशक भिक्षुणीश्राविकांत धम्मदिन्ना श्रेष्ठ आहे.

राजगृहांत विशाख नांवाचा एक श्रेष्ठी बिंबिसार राजाचा मित्र होता. राजाच्या सहवासानेंच तो भगवंताच्या उपदेशाकडे वळला, व क्रमानें अनागामी झाला. धम्मदिन्ना ही त्याची आवडती बायको होती. पण ज्या दिवशीं त्याला अनागामिफळ मिळालें, त्या दिवशीं रोजच्या प्रमाणें त्याचें स्वागत करण्यासाठीं धम्मदिन्नेनें पुढें केलेला हात त्यानें स्वीकारला नाहीं. जेवण्याच्या वेळीहिं तो मुकाट्यानें जेवला. तेव्हां आपला कांहीं दोष असावा असें वाटून त्याविषयीं धम्मदिन्नेनें त्याला प्रश्न केला. त्यानें घडलेला प्रकार सांगितला, व तो म्हणाला, “आजपासून माझ्याजवळ बसणें किंवा जेवणें तुला योग्य नाहीं. ह्या घरांत असलेली सर्व संपत्ति घेऊन तूं तिचां यथारुचि विनियोग कर; पाहिजे तर येथें रहा, पाहिजे तर आपल्या आईच्या घरीं जा.” धम्मदिन्नेला ही गोष्ट पसंत पडली नाहीं, व नवर्‍याची परवानगी घेऊन ती भिक्षुणी झाली. कांहीं काळ खेडेगांवांत एकांतवासांत घालवून तिनें अर्हत्पद मिळविलें व ती पुन्हां राजगृहाला आली. विशाखश्रेष्टीला तिच्या आगमनाची बातमी लागली, तेव्हां तिची परीक्षा पहाण्यासाठीं ती होती तेथें जाऊन त्यानें तिला धर्मविषयक अनेक प्रश्न विचारले. त्यांचीं धम्मदिन्नेनें यथायोग्य उत्तरें दिल्यावर विशाखानें तें सर्व वर्तमान भगवंताला निवेदित केलें. तेव्हां भगवान् म्हणाला, “हे विशाख, धम्मदिन्ना भिक्षुणी पंडीता आहे, महाप्रज्ञावती आहे. मला जर तूं हे प्रश्न विचारले असतेस, तर मीहि तुला अशींच उत्तरें दिलीं असतीं. १” (१ विशाख आणि धम्मादिन्ना ह्यांचा संवाद व हें भगवंताचें भाषण मज्झिमनिकायांतील चूळवेदल्ल सुत्तांत आहे.)

४७
नंदा

“ध्यानरत भिक्षुणीश्राविकांत नंदा श्रेष्ठा आहे.”

ही महाप्रजापती गोतमीची मुलगी. भगवंतापेक्षां जरा वयानें मोठीं. तिच्या सौंदर्यावरून तिला रूपनंदा असेंहि म्हणत. तिचें लग्न झालें होतें कीं नाहीं, व झालें असल्यास तिच्या नवर्‍याचें नांव काय, ह्याची माहिती सांपडत नाहीं. महाप्रजापतीच्या प्रव्रज्येनंतर हीहि भिक्षुणी झाली. परंतु रूपाचा गर्व वहात असल्यामुळें ती भगवंताच्या दर्शनाला जात नव्हती. पण एके दिवशीं भिक्षुणी ह्या नात्यानें तिला स्वतःच बुद्धदर्शनाला जाणें भाग पडलें; व भगवंतानें खेमेप्रमाणें हिलाहि क्षणोक्षणीं पालटत जाणारी स्त्री दाखवून हिचा रूपगर्व हरण केला.
थेरीगाथेंत एक दुकनिपातांत व दुसरी पंचक निपातांत अशा दोन नंदा आहेत. त्यांच्या गाथांच्या अट्ठकथेंत थेरीअपदानाला अनुसरून पहिलीचें अभिरूपनंदा व दुसरीचें सुंदरीनंदा अशीं नांवें दिलीं आहेत. पहिली खेमक शाक्याची मुलगी व दुसरी शुद्धोदनाची आणि महाप्रजापती गोतमीची मुलगी. दोघींनाहि रूपाचा गर्व होता, व तो खेमेप्रमाणेंच भगवंताने हरण केला, असें अपदानावरून दिसून येतें. मनोरथपूरणीकारानें सुंदरीनंदेला रूपनंदा म्हटलें आहे, असें दिसून येतें. ह्या दोघांना भगवंतानें उपदेशिलेल्या अशा ज्या गाथा थेरीगाथेंत आहेत, त्यांत पहिली दोन्ही ठिकाणीं सारखीच आहे. ती अशी :-

आतुरं असुचिं पूतिं पस्स नन्दे समुस्सयं।
असुभाय चित्तं भावेहि एकग्गं सुसमाहितं।।

अर्थ :- हे नंदे, हा देह पीडित, अशुचि आणि घाणेरडा आहे, असें जाण; आणि एकाग्रतेनें ह्याच्या घाणेरडेपणाची भावना कर.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel