२४
उपसेन वंगंपुत्त

“सर्वांना प्रसन्न करणार्‍या भिक्षुश्रावकांत उपसेन वंगंतपुत्त श्रेष्ठ आहे.”

हा सारिपुत्ताचा धाकटा भाऊ. सारिपुत्ताला जसें आईच्या नांवावरून सारिपुत्त म्हणत, तसें त्याला बापाच्या नांवावरून वंगंतपुत्त म्हणत. तरुणपणीं वेदाभ्यास पुरा झाल्याबरोबर तो भिक्षु झाला. उपसंपदेनंतर एकाच वर्षानें संघाची अभिवृद्धि करण्याच्या हेतूनें त्यानें दुसर्‍या एका तरुणाला आपल्या हाताखालीं प्रव्रज्या दिली. हें वर्तमान भगवंताला समजलें;  तेव्हां त्यानें त्याचा निषेध केला, व असा नियम केला कीं, ज्याला भिक्षु होऊन दहा वर्षें झालीं नाहींत, त्यानें दुसर्‍याला आपल्या हाताखालीं उपसंपदा देऊं नये. १  ह्याचा परिणाम उपसेनेच्या मनावर फार चांगला झाला, व अरण्यवासादिकांच्या योगानें आपणालाच नव्हे, तर दुसर्‍या तरुण भिक्षूंनाहि त्यानें उत्तम वळण लाविलें. दहा वर्षें संघांत राहिल्यावर त्यानें नियमाप्रमाणें पुष्कळ शिष्य केले. तेहि आपल्या उपाध्यायाप्रमाणें अत्यंत साधेपणानें वागत असत. त्यांना घेऊन एकदां उपसेन बुद्धदर्शनाला आल्याची हकिगत दुसर्‍या भागांत (कलम ३४) आलीच आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- महावग्ग [Oldenberg’s Edition] पृ. ५९.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सळायतनसंयुत्ताच्या दुसर्‍या पण्णासकाच्या दुसर्‍या वग्गाच्या सातच्या सुत्तांत उपसेनाच्या अंतकाळची गोष्ट आली आहे. तिचा सारांश असा :-

सारिपुत्त आणि उपसेन राजगृह येथें रहात होते. त्या वेळीं उपसेनाला सर्पदंशाची बाधा झाली. तो भिक्षूंना म्हणाला, “माझ्या शरीराला खाटेवर घालून बाहेर न्या. नाहींतर तें येथेंच भुशासारखें होईल.” सारिपुत्त म्हणाला, “तुझ्या शरीरांत कांहीं व्यंग दिसत नाहीं, असें असतां, तें भुशासारखें होईल असें कसें म्हणतोस?”

उपसेन म्हणाला, “ज्याला हीं इंद्रियें माझीं आहेत किंवा तीं मीच आहें, असें वाटतें त्याचींच इद्रियें विकृत होणें संभवनीय आहे. पण मला असें वाटत नाहीं; तेव्हां माझ्या शरीरांत व्यंग कसें दिसेल?”

हा संवाद झाल्यानंतर उपसेनाला खाटेवरून बाहेर नेण्यांत आलें, व तेथें तो मरण पावला.

साधेपणाचें वळण आपल्या शिष्यांना व त्यायोगें इतर भिक्षूंना आणि भगवंताला तो प्रसन्न करी. म्हणून प्रसाद उत्पन्न करणार्‍या भिक्षूंत त्याला अग्रस्थान मिळालें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel