४५. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या समयी षड्वर्गीय. भिक्षूंनीं चीवर करण्याच्या अवधींत पुष्कळ सूत मागून घेतलें. चीवरें करून संपल्यावरहि सूत शिल्लक राहिलें. तेव्हां आणखीहि सूत मागून घेऊन त्यांनीं कोष्ट्यांकडून चीवरवस्त्रें तयार करवून घेतलीं. तरी सूत शिल्लक राहिलें. पुन्हां आणखी सूत मागून घेऊन त्यांनीं आणखी चीवरवस्त्रे तयार करविलीं. तें पाहून लोक त्यांच्यावर टीका करूं लागले. हें वर्तमान भगवंताला समजलें तेव्हां त्यानें त्यांचा निषेध करून भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु स्वत: सूत मिळवून कोष्ट्याकडून चीवरवस्त्र विणवील त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।२६।।

४६. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं एक मनुष्य प्रवासाला निघाला असतां आपल्या बायकोला म्हणाला, “सूत कांतून अमक्या कोष्ट्याला दे, व चीवरवस्त्र तयार करवून घे. मी आल्यावर आर्य उपनंदाला चीवरानें आच्छादीन.” हें त्याचें भाषण एका पिंडपातिक भिक्षूनें ऐकलें, व त्यानें तें वर्तमान उपनंदाला सांगितलें. उपनंद त्या कोष्ट्याजवळ जाऊन त्याला म्हणाला, “हें चीवरवस्त्र माझ्यासाठीं विणविण्यांत येत आहे. तें तूं लांब, रुंद, भरींव, चांगलें विणलेलें, चांगली इस्तरी केलेलें व चांगलें धुतलेलें असें बनव.” तो म्हणाला, “भदंत, मला त्यानें हें एवढेंच सूत दिलें आहे. ह्या सुतानें लांब, रुंद आणि भरीव चीवरवस्त्र करतां येणें शक्य नाहीं. पण व्यवस्थितपणें विणलेलें, चांगली इस्तरी केलेलें व चांगलें धुतलेलें करतां येणें शक्य आहे.” परंतु उपनंदानें लांब, रुंद व भरींव करण्याचा त्याला आग्रह केला. अर्थांत तें सूत कमी पडलें. तेव्हां त्या स्त्रीजवळ जाऊन त्या कोष्ट्यानें आणखी सूत मागितलें; व तिनें कारण विचारलें असतां घडलेलें वर्तमान तिला सांगितलें. त्या स्त्रीनें त्याला पूर्वी दिलें होतें तेवढेंच आणखी सूत दिलें; व तें चीवरवस्त्र तयार करवून घेतलें. तिचा नवरा घरीं आला तेव्हां उपनंद शाक्यपुत्र तेथें गेला. त्याला पाहून त्या गृहस्थाला चीवर वस्त्राची आठवण झाली. त्यानें स्त्रीला विचारलें, व तिनें तें चीवरवस्त्र आणून त्याच्या हवालीं केलें, आणि घडलेली गोष्ट त्याला सांगितली. त्यानें तें चवीरवस्त्र उपनंदाला दिलें खरें; पण तो त्यावर व शाक्यपुत्रीय श्रमणांवर टीका करूं लागला. अनुक्रमें हें वर्तमान भगवंताला समजलें. त्यानें उपनंदाचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

भिक्षूला उद्देशून अज्ञाति गृहपति किंवा गृहपत्नी कोष्ट्याकडून चवीरवस्त्र विणवावयास लावील; ह्या बाबतींत अनधीष्ट भिक्षु कोष्ट्यांजवळ जाऊन विशिष्ट चीवराची आवड दर्शवील; म्हणेल कीं, हें चीवर माझ्यासाठींच विणविण्यांत येत आहे; तें लांब, रूंद, भरींव, चांगलें विणलेलें, चांगली इस्तरी केलेलें व चांगलें धुतलेलें असें करा; म्हणजे आम्हींहि तुम्हांला कांही देऊं. असें म्हणून जर तो भिक्षु त्यांना कांहीं-केवळ भिक्षान्न देखील –देईल त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।२७।।

४७. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं एका महामात्रानें प्रवासाला जाते वेळीं भिक्षूंना निरोप पाठविला कीं, त्यांनीं येऊन वर्षाकालिक चीवर घ्यावें. परंतु भगवन्तानें वर्षाकालिक चीवर स्वीकारण्याची परवानगी दिली नसल्यामुळें भिक्षु अनमान करूं लागले. तो महामात्र म्हणाला, “मीं असा निरोप पाठविला असतां भदंत येत नाहींत हें कसें? मी सैन्याबरोबर जात आहें. कधीं मरेन त्याचा नेम काय?” हें वर्तमान भगवंताला समजलें; तेव्हां ह्या प्रकरणीं भिक्षूंना बोलावून भगवान् म्हणाला, “भिक्षूहो, अत्येक१ चीवर घेण्यास मी तुम्हांला परवानगी देतों.” भगवंतानें अत्येक चीवराची परवानगी दिली आहे म्हणून भिक्षु अत्येक चीवरवस्त्रें घेऊन त्यांचीं गाठोडीं बांधून ठेवूं लागले. तें आनंदानें पाहिलें; व त्यानें ती गोष्ट भगवंताला सांगितली. भगवंतानें त्या भिक्षूंचा निषेध करून सर्व भिक्षंना नियम घालून दिला तो असा:-
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- अत्येक चीवर म्हणजे प्रवासाला जाणार्‍या मनुष्यानें, आजारी मनुष्यानें, गर्भिणी स्त्रीनें किंवा ज्यानें नुकताच बौद्ध धर्म स्वीकारला आहे अशा माणसानें वर्षाकाळीं दिलेलें चीवर.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कार्तिकी पौर्णिमेपूर्वी दहा दिवस भिक्षूला अत्येक चीवर मिळेल. तें अत्येक आहे असें वाटल्यास त्यानें घ्यावें; व घेऊन चीवरवस्त्र शिवण्यापर्यंत ठेवून घ्यावें; त्यापेक्षां जास्त ठेवल्यास निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।२८।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel