१९
वक्कलि

“श्रद्धावान् भिक्षुश्रावकांत वक्कलि श्रेष्ठ आहे.”

ह्याचा जन्म श्रावस्ती येथें एका ब्राह्मणकुळांत झाला. वक्कलि हें त्याचें नांव. लहानपणींच वेदवेदांगांत तो पारंगत झाला होता, व बुद्धाला पाहिल्याबरोबरच त्याची त्याच्यावर अत्यंत श्रद्धा जडली. रोज भगवंताला पाहिल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. पण श्रद्धा बलवती झाल्यामुळें व प्रज्ञेच्या कार्याला वाव न मिळाल्यामुळें निर्वाणमार्गांत वक्कलीला मोठा अंतराय झाला. त्याच्या पुढची गोष्ट खन्धसंयुत्ताच्या दुसर्‍या पण्णासाच्या चौथ्या वग्गांत वक्कलिसुत्तांत आलीच आहे. तिचा सारांश असाः-

“भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या वेळीं वक्कलि एका कुंभाराच्या १ घरीं अत्यंत आजारी होता. एका उपस्थायकाकडून हें वर्तमान त्यानें भगवंताला कळविलें. भगवान् कुंभाराच्या घरीं आला, तेव्हां वक्कलि त्याला मान देण्यासाठीं खाटेवरून उठण्याचा प्रयत्‍न करूं लागला. पण भगवान् म्हणाला, “वक्कलि, असा उठण्याचा प्रयत्‍न करण्याचें कांही कारण नाहीं. येथें आसनें मांडलेलीं आहेत, तेथें मी बसूं शकतों.” भगवान् एका आसनावर बसला आणि म्हणाला, “वक्कलि, तुला कसें काय वाटतें?  तुझें दुखणें कमी होत आहेना?”
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- कुंभाराच्या घरीं म्हणजे भांडीं बनवावयाच्या कारखान्यांत (शाळेंत), असें अट्ठकथेचें म्हणणें आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वक्कलि :- तुम्हांला काय सांगूं! मला अगदीं बरें वाटत नाहीं. अत्यंत तीव्र वेदना उत्पन्न होतात, पण त्यांचें पर्यवसान दिसून येत नाहीं.

भगवान् :-  पण वक्कलि, तुझ्या मनाला एकादी शंका किंवा पश्चाताप जाचत नाहींना?

वक्कलींनें होकारार्थी उत्तर दिलें. तेव्हां भगवान् म्हणाला, “ही मनाची रुखरुख तुझ्या आचरणांत कांहीं निंद्य कृत्य घडून आल्यामुळें तर नसेलना?”

“नाहीं,” असें वक्कलीनें उत्तर दिलें.

“तर मग, वक्कलि, तुझ्या मनाला एवढी रुखरुख कां लागून रहावी?”

“भगवंताच्या दर्शनाला जाण्यास जें बळ लागतें तें मजजवळ नाहीं, एवढ्याचसाठीं माझ्या मनाला तळमळ लागली आहे.”

“वक्कलि, ह्या माझ्या सडून जाणार्‍या (पूति) देहाकडे पाहून काय उपयोग! जो धर्म जाणतो तो मला पहातो, व जो मला पहातो तो धर्म जाणतो. वक्कलि, मी तुला असें विचारतों कीं, रूप नित्य कीं अनित्य? वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान नित्य कीं अनित्य?”  हे सर्व स्कंध अनित्य अनित्य आहेत,’ असें वक्कलीनें उत्तर दिलें.

“असें जाणून, हे वक्कलि, विद्वान् आर्यश्रावक ह्या पांच स्कंधांविषयी विरक्त होतो आणि वैराग्यामुळें विमुक्त होतो.”

ह्याप्रमाणें उपदेश करून भगवान् गृध्रकूटपर्वताच्या बाजूला गेला. तेव्हां वक्कलि आपल्या उपस्थायकांना म्हणाला, “बंधुहो, मला खाटेसह उचलून ऋषिगिलीच्या पायथ्याशीं कालशिला येथें घेऊन जा. माझ्यासारख्यानें गांवांत मरणें मला योग्य वाटत नाहीं.”…तेथें नेल्यावर वक्कलि विमुक्त झाला, व त्यानें शस्त्रप्रयोग करून आत्मघात केला. कांही वेळानें भिक्षूंसह भगवान् तेथें आला, व त्यानें वक्कलि खाटेवर लोंबकळत पडल्याचें पाहिलें. त्या वेळीं अंधकारमय धुकें जिकडे तिकडे पसरलें होतें. तें दाखवून भगवान् भिक्षूंला म्हणाला, “भिक्षुहो, हा मार आहे. वक्कलीचें विज्ञान कोठें पैदा झालें, ह्याच्या शोधांत तो आहे. परंतु वक्कलि परिनिर्वाण पावला असल्यामुळें त्याच्या विज्ञानाला पुनर्जन्म नाहीं.”                    
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel