उत्क्षेपनीय कर्म (बहिष्कार)

७६. बुद्ध भगवान् कौशाम्बी येथें घोषिकारामांत रहात होता. त्या काळीं छन्न भिक्षु आपत्ति करून प्रायश्चित करूं इच्छीत नव्हता. अशा प्रकरणीं भिक्षूला बहिष्कार घालण्यांत यावा अशी भगवंतानें संघाला अनुज्ञा केली. “जर तो भिक्षु व्यवस्थितपणें वागत असला, आपले दोष कबूल करून त्यांचें प्रायश्चित करीत असला. तर संघानें त्याच्यावरचा बहिष्कार काढून घ्यावा.

७७. भगवान् बुद्ध श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्य आरामांत रहात होता. त्या काळीं अरिष्ट नांवाच्या भिक्षूला अशी दृष्टि उद्भवली होती कीं, बुद्धाच्या उपदेशाप्रमाणें विचार केला असतां जे अंतरायकर धर्म सांगितले ते अंतरायाला कारण होत नाहींत. ही गोष्ट भिक्षूंना समजली तेव्हां ते त्याला म्हणाले, “हे अरिष्ट, तूं भगवंताच्या उपदेशाचा उलटा अर्थ करूं नकोस. विषयसुखांत दु:ख फार व दोष मोठा असें भगवंतानें वारंवार सांगितलें आहे. असें असता विषयोपभोग धर्मगार्गांत अंतरायकर नाहींत असें तूं म्हणतोस?” भिक्षूंनी पुष्कळ प्रयत्न केला, पण अरिष्ठ आपली दृष्टि सोडण्यास तयार नव्हता. तेव्हां भगवंतानें त्याला बोलावून ही खोटी दृष्टि सोडण्यास सांगितलें, तरी तो ऐकेना. नंतर भगवंतानें अशा प्रकरणीं जो भिक्षु खोटी दृष्टि स्वीकारून उपदेश केला असतांहि तीं सोडणार नाहीं त्याला बहिष्कार घालण्याची संघाला अनुज्ञा दिली. जो भिक्षु नीट रितीनें वागून ती दृष्टी सोडीत असला तर त्याजवरचा बहिष्कार संघाने काढून घ्यावा.”

परिवास कर्म

७८. “ज्या भिक्षूच्या हातून संघादिशेष नांवाची आपत्ति घडली असेल त्याला संघानें परिवास द्यावा. ही आपत्ति एकच असून एक दिवस लपवून ठेविली असेल तर एकच दिवसाचा परिवास द्यावा; दोन दिवस लपवून ठेवली असेल तर दोन दिवसांचा; व पुष्कळ दिवस लपवून ठेवली असेल तर संघानें परिवासाची मर्यादा ठरवावी. पुष्कळ संघादिशेष आपत्ति घडल्या असतील व पुष्कळ दिवस लपवून ठेवल्या असतील तर परिवासाची मर्यादा संघानेंच ठरवावी. ज्याला परिवास दिला असेल त्या भिक्षूनें तिंतके दिवस निदान अरुणोदयाच्या वेळीं विहारांत रहातां कामा नये. अरुणोदयापूर्वीं उठून विहारापासून दूर अंतरावर जाऊन राहिलें पाहिजे, व सकाळीं परत येऊन, आपण परिवासाची एक रात्र घालविल्याची बात मी भिक्षूंना दिली पाहिजे.”

मानत्त (संघाचा संतोष)

७९. अशा रितीनें परिवास संपल्यानंतर त्या भिक्षूनें आपण परिवास पूर्ण केल्याची बातमी संघाला दिली पाहिजे. मग संघ त्याला सहा रात्रींचे मानत्त देतो. म्हणजे त्या भिक्षूनें संघाला संतुष्ट करण्यासाठीं परिवासाच्या रात्रींप्रमाणें आणखी सहा रात्री (निदान अरुणोदयाच्या वेळीं) विहाराबाहेर काढल्या पाहिजेत.

मूलायपटिकस्सना (पूर्वस्थितीवर आणणें)

८०. ज्या भिक्षूला परिवास किंवा मानत्त दिलें असेल त्याकडून त्या स्थितींत असतांना जर संघादिशेष आपत्ति घडली तर संघानें त्याला पूर्वस्थितीवर आणावें. म्हणजे परिवासाच्या आणि मानत्ताच्या ज्या रात्री त्यानें विहाराबाहेर घालविल्या त्या सर्व फुकट जातात, व पुन्हां त्याला परिवास सुरू करावा लागतो, व तो संपल्यावर पुन्हां संघाकडून मानत्त घ्यावें लागतें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel