४४
उप्पलवण्णा

“ऋद्विमती भिक्षुणीश्राविकांत उप्पलवण्णा श्रेष्ठ आहे.”

ही श्रावस्ती येथें एका श्रेष्ठीच्या कुळांत जन्मली. कमलासारखी तिची कांति होती म्हणून उप्पलवण्णा (उत्पलवर्णा) असें तिचें नांव ठेवण्यांत आलें. ती वयांत आल्यावर तिच्या सौंदर्याची कीर्ति ऐकून पुष्कळ राजकुमारांनीं आणि श्रेष्ठिकुमारांनीं तिची मागणी केली. तिच्या बापावर हें एक मोठें संकटच ओढवलें. मुलीनें प्रव्रज्या घेतली तर ह्यांतून आपण सुटेन, असें वाटून तो तिला म्हणाला, “तूं भिक्षुणी होऊं शकशील काय?” हें ऐकून तिला अतिशय आनंद झाला, व ती भिक्षुणी होण्यास तेव्हांच तयार झाली. त्याप्रमाणें तिला भिक्षुणी करण्यांत आलें. भिक्खुणीसंयुत्तांत हिचा माराबरोबर संवाद आहे, त्याचा सारांश असा :-

उप्पलवण्णा सकाळच्या प्रहरीं एका प्रफुल्लित शालवृक्षाखालीं उभी होती. त्या वेळीं पापी मार उप्पलवण्णा भिक्खुणीला भय आणि लोमहर्ष उत्पन्न करण्याच्या आणि समाधीपासून भ्रष्ट करण्याच्या उद्देशानें तिकडे आला आणि म्हणाला, “या सुपुष्पित शालवृक्षाखालीं तूं एकटी उभी आहेस. तुझ्यासारखी दुसरी सुंदर स्त्री मिळणें कठीण; हे वेडे तुला धूर्तांचें भय वाटत नाहीं काय?”

उप्पलवण्णा म्हणाली, “येथें शंभर आणि हजार जरी धूर्त आले, तरी ते माझा एक लोमहि वाकवूं शकणार नाहींत. हे मार, मी जरी एकटी आहें, तरी मी तुला भीत नाहीं....माझें चित्त माझ्या स्वाधीन आहे. ऋद्धिपाद १  मला पूर्णपणें अवगत आहेत, व मी सर्व बंधनांपासून मुक्त झालें आहें. बा मारा, मी तुला घाबरत नाहीं.”
------------------------------------------------------------------------------------------------------------
१ छंद, वीर्य, चित्त आणि मीमांसा हे चार ऋद्धिपाद आहेत. यांच्या योगें सिद्धि प्राप्त होतात.
------------------------------------------------------------------------------------------------------------
४५
पटाचारा

“विनयधर भिक्षुणीश्राविकांत पटाचारा श्रेष्ठ आहे.”

ही श्रावस्ती येथें एका सावकाराच्या कुटुंबांत जन्मली. वयांत आल्यावर आपल्या बापाच्या एका नोकरावर तिचें मन जडलें. अर्थातच ही गोष्ट घरांत कोणास माहीत नव्हती. पुढें समानजातीच्या तरुणाबरोबर तिचें लग्न ठरलें असतां ह्या नोकराला बरोबर घेऊन, व बरोबर नेण्याजोगे दागदागिने घेऊन ती घरांतून पळून गेली. तीं दोघे श्रावस्तीहून तीन चार योजनांच्या अंतरावर एका खेडेगांवीं जाऊन राहिलीं. कांहीं काळानें ती गरोदर झाली, व नवमास पूर्ण झाल्यावर आपल्या बापाच्या घरीं जाण्यास सिद्ध झाली. नवर्‍याला ही गोष्ट इष्ट नव्हती. म्हणून तो आजउद्यां करीत राहिला. शेवटीं ती एकटीच निघाली. नवर्‍यानें मागोमाग येऊन तिला गांठलें. वाटेंतच तिला मुलगा झाल्यामुळें श्रावस्तीला जाण्याचा बेत रहित करून तीं आपल्या राहत्या गांवीं आलीं. पुन्हां कांहीं वर्षांनीं ती गरोदर झाली, व नवमास पूर्ण झाल्यावर नवरा टंगळमंगळ करीत असतां एकटीच श्रावस्तीला जाण्यास निघाली. १
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- येथपर्यंत ही गोष्ट चूळपंथक आणि महापंथक ह्यांच्या आईच्या गोष्टीसारखीच आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel