३९. त्यानंतर बुद्धाच्या मनांत असां विचार आला कीं, जे मी भिक्षूंना नियम घालून दिले आहेत ते प्रातिमोक्षाच्या१ रुपानें त्यांनीं उपोसथाच्या दिवशीं ह्मणावे, म्हणजे हेंच त्यांचे उपोसथकर्म होईल. तेव्हां ह्या प्रकरणीं भिक्षूंना बोलावून त्यानें आपला विचार कळविला; व तो ह्मणाला, “भिक्षुहो, आजपासून प्रातिमोक्ष म्हणण्याची मी तुम्हांला परवानगी देतों.” तो म्हणाण्याचा विधि असा:-
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- दुसर्‍या भागांत सांगितलेल्या प्रतिबंध नियमांच्या संग्रहाला प्रतिमोक्ष म्हणतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
समर्थ भिक्षूनें संघास विज्ञाप्ति करावी. ‘भदंत संघ, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आज पंचदशीचा उपोसथ आहे. जर संघाला योग्य वाटत असेल तर संघाने उपोसथ करावा, प्रतिमोक्ष म्हणावा. संघाचें पूर्वकृत्य कोणतें? बंधुहो, तुम्हीं आपत्तींपासून परिशुद्ध आहांत कीं काय तें सांगा; म्हणजे मी प्रातिमोक्ष म्हणतों. तो आम्हीं सर्वानीं लक्ष देऊन चांगल्या रितीनें ऐकावा. ( प्रातिमोक्षापैकीं) ज्याच्या हातून जी आपत्ति (दोष) घडली असेल ती त्यानें सांगावी; आपत्ति नसेल तर मुकाट्यानें राहावें. मुकाट्यानें राहिल्यानें, बांधवहो, तुम्ही परिशुद्ध आहांत असें मी समजेन. अशा सभेंत तनिदा जाहीर करणें म्हणजे प्रत्येकाला अलग अलग विचारून खुलासा करून घेण्यासारखें आहे. तीनदां जाहीर केलें असतां जो भिक्षु आठवण असलेली आपत्ति उघडपणे सांगणार नाहीं, त्याजवर जाणूनबुजून खोटें बोलण्याचा आरोप येईल. जाणूनबुजून खोटें बोलणें (धर्म मर्गांत) अंतरायकारक आहे असें भगवंतानें सांगितलें आहे. म्हणून जो भिक्षु परिशुद्ध होण्याची इच्छा करतो. त्यानें आठवत असलेली आपत्ति संघांत उघड करून सांगावी. कारण असें केलें तर त्याला सुख होईल.’ असें बोलून त्या भिक्षूनें प्रातिमोक्ष म्हणावा.

४०. भगवंतानें प्रातिमोक्ष म्हणण्यास परवानगी दिली आहे असें म्हणून भिक्षु दररोज प्रातिमोक्ष म्हणूं लागले. तसें करण्याची भगवंतानें मनाई केली; व पंधरवड्याला, चतुर्दशी किंवा पंचदशी ह्या दोहोंपैकीं कोणत्यातरी दिवशीं एकदां प्रातिमोक्ष म्हणाण्याची परवानगी दिली. कांहीं भिक्षु आपापल्या मंडळांत प्रातिमोक्ष ह्मणूं लागले. पण तसें न करतां सर्वांनीं एकत्र जमून उपोसथ करावा असा बुद्धानें नियम केला. पण ‘सर्वांनीं’ ह्याच अर्थ काय  हें भिक्षूंना समजेना. तेव्हां बुद्धानें ‘एका ठिकाणीं राहणारे सर्व भिक्षु’ असा त्याचा अर्थ केला. पुढें एका ठिकाणीं राहणारे कोण ह्याविषयींहि शंका येऊं लागली. म्हणजे एका गांवांत कांही भिक्षु असत तर त्याच्या जवळच्या गांवांतहि कांहीं असत. तेव्हां एका ठिकाणीं याची मर्यादा कोठपर्यत न्यावी हें समजेना. भगवंताला ही गोष्ट सांगण्यांत आली. तेव्हा तो म्हणाला, “भिक्षुहो, सीमा ठरविण्याची मी परवानगी देतों. ती अशी:-

पर्वत, पाषाण, अरण्य, वृक्ष, रस्ता, वारुळ, नदी आणि उदक ह्यांच्या योगानें एका ठिकाणच्या सीमा ठरवाव्या. नंतर समर्थ भिक्षूनें संघाला विज्ञाप्ति करावी. ‘अशा अशा चिन्हानें सीमा ठरविण्यांत आली आहे. जर संघाला योग्य वाटत असेल तर ह्या सीमेच्या आंत राहणार्‍या भिक्षूंनीं एकत्र उपोसथ करावा असें संघाने ठरवावें.’ ही विज्ञाप्ति झाली. नंतर ही गोष्ट त्यानें त्रिवार संघांत जाहीर करावी; व कोणी हरकत घेतली नाहीं म्हणजे ती सीमा संघास पसंत पडली असें समजावें. सीमा तीन योजनांपेक्षां विस्तीर्ण असतां कामा नये; व ती नदीच्या पारहि असूं नये.”

४१. त्या काळीं भिक्षु एका सीमेंत आळीपाळीने निरनिराळ्या विहारांत प्रातिमोक्ष म्हणत असत. पण जे इतर ठिकाणाहून भिक्षु येत त्यांना उपोसथ कोठें होणार आहे हं समजण्यास मारामार पडे. म्हणून संघाच्या आनुमतीनें कोणती तरी एक जागा मुकर करून तेथें प्रातिमोक्ष म्हणावा असा भगवंतानें नियम केला. उपोसथाची जागा आकुंचित असल्यास तिच्याबाहेर बसून जरी प्रातिमोक्ष ऐकला तरी त्यांत दोष नाहीं. उपोसथाचा दिवस कोणता हें भिक्षूंनीं आगाऊ समजावून घ्यावें. जो वृद्ध पुढारी भिक्षु असेल त्यानें आगाऊ दिवस सांगावा. त्या स्थविरानें तरुण भिक्षूंकडून उपोसथागार साफ करून घ्यावें; आसनें मांडावयास लावावीं; दिवा लावण्यास सांगावे; पिण्याचें पाणी व पाय धुण्याचें पाणी तयार ठेववावें. जेथें भिक्षुणी बसली असेल तेथें प्रातिमोक्ष म्हणण्यांत येऊं नये.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel