१३२. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. तेव्हां पसेनदि कोसल राजानें उद्यानपाळाला बोलावून उद्यान साफ करण्यास सांगितलें. उद्यानपाळ राजाला म्हणाला, “उद्यानांत दुसरें कांहीं नाही. केवळ भगवान् तेथें बसला आहे.” राजा म्हणाला, “आपण आज भगवंताचें दर्शन घेऊं.” तो उद्यानांत आला तेव्हां बुद्धाजवळ त्यानें एका उपासकाला पाहिलें, व (तो मारेकरी असेल असें वाटून) राजा संत्रस्त झाला. पण पुन्हां राजाच्या मनांत असा विचार आला कीं, हा मनुष्य जर नीच असता तर भगवंताच्या सेवेंत तत्पर राहिला नसता. त्यानंतर पसेनदि कोसल बुद्धापाशीं आला, व नमस्कार करून एका बाजूला बसला. बुद्धाच्या समोर राजाला नमस्कार करणें योग्य न वाटल्यामुळें त्या उपासकानें पसेनदीला नमस्कार केला नाही; व त्यामुळें राजाचें मन विकृत झालें. तेव्हां भगवान् राजाला म्हणाला, “महाराज, हा उपासक बहुश्रुत आणि विरक्त आहे.” अशा रितीनें भगवंतानें स्तुति केल्यामुळें राजा प्रसन्न होऊन त्या उपासकाला म्हणाला, “जर कांहीं काम पडलें तर मला सांगत जा.” “बरें महाराज,” असें त्या उपासकानें उत्तर दिलें. नंतर पसेनदीला भगवंतानें उपदेश केला, व भगवंताला नमस्कार करून आणि प्रदक्षिणा करून पसेनदि राजा तेथून निघून गेला.

एके दिवशीं तो उपासक छत्री घेऊन राजवाड्यावरून जात होता. त्याला बोलावून आणून राजानें आपल्या स्त्रियांना धर्म शिकविण्यास सांगितलें. तेव्हां उपासक म्हणाला, “मी जें कांहीं शिकलों तें आर्यांकडून (भिक्षूंकडून) शिकलों. तेव्हां तेच महाराजांच्या स्त्रीमंडळाला धर्म शिकविण्यास योग्य आहेत.”  राजाला त्याचें म्हणणें योग्य वाटलें, व स्त्रीमंडळाला धर्म शिकविण्यासाठीं एकादा भिक्षु पाठवावा, अशी त्यानें भगवंताला विनंति केली. त्याप्रमाणें भगवंतानें आनंदाची ह्या कामीं नेमणूक केली. तो एके दिवशीं राजवाड्यांत गेला असतां, पसेनदि राजा व मल्लिका राणी आपल्या शयनगहांत एकाच शय्येवर निजलीं होतीं. आनंदाला पाहून मल्लिका देवी एकदम उठली, व अशा घाईमुळें तिची साडी सुटली. आनंद तेथूनच माघारा आरामांत गेला, व त्यानें ही गोष्ट इतर भिक्षूंना सांगितली...ह्या प्रसंगीं भगवंतानें निमय केला तो असा:-

जो भिक्षु मूर्धावसिक क्षत्रियराजाच्या शयनगहाचा उंबरठा- राजा किंवा राणी आंत असतां- पूर्वी वर्दी दिल्याशिवाय उल्लंघील, त्याला पाचित्तिय होतें ।।८३।।


१३३. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं कोणी एक भिक्षु अचिरवती नदींत स्नान करीत असतां त्याच ठिकाणी दुसरा एक ब्राह्मण स्नानासाठीं आला; व बरोबर आणलेली पांचशें कार्षापणांची थैली कांठावर ठेवून, स्नान करून परत जातांना ती थैली तेथेंच विसरला. दुसर्‍या कोणीं घेऊन जाऊं नये म्हणून त्या भिक्षूनें ती थैली आपणापाशीं ठेविली. वाटेत आठवण झाल्यामुळें ब्राह्मण तसाच परत आला, तेव्हां भिक्षूनें ती थैली त्याला परत दिली. भिक्षूला बक्षीस१ देण्याचा प्रसंग येऊं नये, म्हणून ब्राह्मण म्हणाला कीं, त्या थैलींत हजार कार्षापण होते. असें म्हणून तो आपली थैली घेऊन गेला...ह्या प्रसंगी भगवंतानें नियम केला तो असा:-

“जो भिक्षु सांपडलेलें द्रव्य किंवा मूल्यवान् वस्तू घेईल किंवा घेववील, त्याला पाचित्तिय होतें.”

ह्या नियमांत दोन प्रसंगीं कांहीं फेरफार करून शेवटच्या प्रसंगीं जो नियम करण्यांत आला तो असा:-
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- एकाद्याची हरवलेली वस्तू दुसर्‍यास सांपडली असतां त्या वस्तूची शेंकडा पांच टक्के किंमत त्याला द्यावी, अशी वहीवाट असे. त्याला पालिभाषेंत ‘पुण्णपत्त’ असें म्हटलें आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जो भिक्षु आरामाबाहेर किंवा आवसथाबाहेर सांपडलेलें द्रव्य किंवा मूल्यवान वस्तू घेईल किंवा घेववील, त्याला पाचित्तिय होतें. आरामांत किंवा आवसथांत सांपडलेलें द्रव्य किंवा मूल्यवान् वस्तू, ज्याची त्याला मिळावी ह्या हेतूनें घेऊन किंवा घेववून ठेवण्यास सांगावें, हा ह्या बाबतींत शिष्टाचार ।।८४।।

१३४. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु अवेळीं गांवांत जाऊन राजकथा, चोरकथा, सेनाकथा, युद्धकथा, अन्नपानकथा वगैरे बाष्कळ१ (१- ह्या गोष्टींना पालि भाषेंत ‘तिरच्छानकथा’ म्हणतात. विशेष माहितीसाठीं राजवाडेंकृत दीघनिकायाचें भाषांतर (पृष्ठ १०) पहावे.)  गोष्टी करीत असत... ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

“जो भिक्षु अवेळीं गांवांत जाईल, त्याला पाचित्तिय होतें.”

त्या काळीं कांहीं भिक्षु श्रावस्तीला येत असतां संध्याकाळीं एका गांवाजवळ आले. तेथील रहिवाशांनीं त्यांना गांवांत बोलाविलें. परंतु भगवंतानें अवेळीं गांवांत जाण्याची मनाई केल्यामुळें गांवांत न जातां ते बाहेरच राहिले. तेथें चोरांनीं त्यांचीं चीवरें हिरावून घेतलीं. ही गोष्ट भगवंताला समजली, तेव्हां तो म्हणाला, “भिक्षुहो, इतर भिक्षूंच्या संमतीनें अवेळीं गांवांत जाण्यास मी परवानगी देतो.”

दुसर्‍या एका प्रसंगीं एक भिक्षु श्रावस्तीला येत असतां संध्याकाळीं एका गांवाजवळ आला; व दुसरा भिक्षु बरोबर नसल्यामुळें त्याला गांवांत प्रवेश करतां आला नाहीं. ही गोष्ट भगवंताला समजली, तेव्हां त्यानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

“जो भिक्षु बरोबर दुसरा भिक्षु असतां त्याला विचारल्यावांचून अवेळीं गांवांत जाईल, त्याला पाचित्तिय होतें.”

त्या काळीं एका भिक्षूला साप चावला, त्याला बरा करण्यासाठीं दुसरा भिक्षु विस्तव आणावा म्हणून गांवांत जात असतां त्याच्या मनांत, आपण भगवंतानें केलेल्या नियमाचा भंग करतों कीं काय, अशी शंका आली...ह्या प्रसंगीं भगवंतानें नियमांत फेरफार केला तो असा:-

जो भिक्षु दुसरा भिक्षु बरोबर असतां त्याला न कळतां तशाच अत्यंत जरूरीच्या कामावांचून गांवांत जाईल, त्याला पाचित्तिय होतें ।।८५।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel