जो भिक्षु पुराव्याशिवाय इतर भिक्षूला संघादिशेष आपत्ति लागू करील, त्याला पाचित्तिय होतें ।।७६।।

१२६. बुध्द भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु सप्तदशवर्गीय भिक्षूंना बुध्दिपुरःसर संशयांत पाडीत; आणि म्हणत कीं, वीस वर्षें पुरीं झाल्याशिवाय उपसंपदा देऊं नये, असा भगवंतानें नियम केला आहे; आणि तुम्हांला तर वीस वर्षें पुरीं झाली नाहींत; तेव्हां तुम्ही भिक्षु नव्हत, असें तर नसेलना ? ते (सप्तदशवर्गींय भिक्षु) रडत असत.... ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असाः-

जो भिक्षु भिक्षूला क्षणमात्रहि दु:ख व्हावें, ह्या उद्देशानें बुद्धिपुर:सर संशयांत पाडील, त्याला ह्याच कारणास्तव पाचित्तिय होतें ।।७७।।


१२७. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु सज्जन भिक्षूंबरोबर भांडत असत. सज्जन भिक्षु आपआपसांत म्हणत कीं, हे षड्वर्गीय भिक्षु निर्लज्ज आहेत. त्यांच्या बरोबर भांडण्यांत अर्थ नाहीं. षड्वर्गीय भिक्षु कान देऊन त्यांचें भाषण ऐकत, व आम्हांला तुम्ही निर्लज्ज कां म्हणतां, अशी तक्रार करीत...ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु आपले विरोधी भिक्षु काय बोलतात, तें लपून ऐकण्याचा प्रयत्न करील, त्याला ह्याच कारणास्तव पाचित्तिय होतें ।।७८।।

१२८. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु नियमांचा भंग करीत, व त्या संबंधीं संघानें चोकशी करून प्रत्येकाला प्रायश्चित ठरविलें असतां शिवीगाळ करीत असत. एके दिवशीं कांहीं कराणास्तव संघ एकत्र जमला होता. षड्वर्गीय भिक्षु चीवरें करण्यांत गुंतले होते. तेव्हां संघकार्याला आपली संमति देण्यासाठीं आपणांपैकीं एकाला त्यांनीं प्रतिनिधी म्हणून संघाच्या सभेला पाठविलें. संघानें त्याचीच चौकशी करून त्यावर आपत्ति लागू केली. ही गोष्ट त्याच्या साथीदारांना समजली, तेव्हां ते संघाची निंदा करूं लागले; संघ असें करील, हें आम्हांस ठाऊक असतें, तर त्याला आम्हीं तेथें पाठविलेंच नसतें, असें म्हणूं लागले... त्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु धार्मिक संघकृत्यांस संमति देऊन मागाहून निंदा करील, त्याला पाचित्तिय होतें ।।७९।।

१२९. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं कांहीं कारणास्तव संघ एकत्र जमला होता. षड्वर्गीय भिक्षु चीवर करण्यांत गुंतले होते; म्हणून आपली संमति देण्यासाठीं त्यांनीं आपल्यापैकीं एकाला पाठविलें. त्याच भिक्षूची संघांत चौकशी चालली असतां, तो संमति न देतां मध्येंच उठून गेला... ह्या प्रसंगी भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु संघांत एकाद्या गोष्टीची चौकशी चालली असतां संमति न देतां मध्येंच उठून जाईल, त्याला पाचित्तिय होतें ।।८०।।


१३०. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या काळीं दब्ब मल्लपुत्र संघाच्या शयनासनाची व जेवणाची व्यवस्था पहात असे. त्याचें चीवर जीर्ण झालें होतें. त्या काळीं संघाला एक नवीन चीवर मिळालें, व संघांने तें दब्बाला दिलें. तेव्हां, भिक्षु आपल्या आवडीच्या मनुष्याला संघाची वस्तू देतात. अशा रितीनें षड्वर्गीय भिक्षु इतर भिक्षूंची निंदा करू लागले...ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केल तो असा:-

जो भिक्षु समग्र संघानें चीवर दिल्यानंतर, आपल्या आवडीच्या माणासाला भिक्षु सांघिक वस्तू देतात असें म्हणून निंदा करील, त्याला पाचित्तिय होतें ।।८१।।

१३१. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं श्रावस्ती येथील एका पूगानें संघासीठीं चीवरें व जेवण तयार केलें होतें. षड्वर्गीय भिक्षूंनीं तीं चीवरें दुसर्‍याच भिक्षूंला देवविलीं... ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु संघाला मिळणारी वस्तू बुद्धिपुर:सर व्यक्तीला देववील, त्याला पाचित्तिय होतें ।।८२।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel