Bookstruck

भाग ३ रा 34

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पूर्वजन्मीं जी बाहियाची नातलग होती, अशी एक देवता बाहियाच्या आश्रमाजवळ राहात असे. बाहियाची अशी समजूत झालेली पाहून ती म्हणाली, “बा, बाहिया, तूं अर्हन्त तर नाहींसच, पण अर्हत्त्वाचा मार्गहि तुला माहीत नाहीं.”

बाहिय :- तर मग देवते, जगांत अर्हन्त किंवा अर्हत्त्वमार्गावरून चालणारे कोण आहेत?

देवता :- बाहिया, उत्तर देशांत श्रावस्ती नांवाचें नगर आहे. तेथें सध्या सम्यक्संबुद्ध भगवान् रहात आहे. तो स्वतः अर्हन्त असून अर्हत्पदलाभासाठीं धर्मोपदेश करीत असतो.

त्या देवतेच्या बोलण्यानें बाहियाला संवेग उत्पन्न झाला, व ताबडतोब सुप्पारकाहून श्रावस्तीला जाण्याला तो निघाला. वाटेंत त्यानें कोठेंहि एका रात्रीहून जास्त मुक्काम केला नाहीं. तो जेतवनविहारांत आला, तेव्हां त्याला असें समजलें कीं, भगवान् नुक्ताच श्रावस्तींत भिक्षाटनाला गेला आहे. बाहियानें मागोमाग जाऊन भगवंताला एका गल्लींत गांठलें व वंदन करून उपदेश करण्यास विनंति केली. ‘ही भिक्षाचर्येची वेळ आहे, धर्मोपदेशाची नव्हे,’ असें भगवंताचें म्हणणें पडलें. पण बाहिय म्हणाला, “भदन्त, आमच्या जगण्याचा काय नेम आहे? मला आपला उपदेश लवकर ऐकूं द्या.” त्याच्या आग्रहास्तव भगवंतानें संक्षेपानें त्याला उपदेश केला तो असाः-

“बाहिय, तूं जें पहाशील तें पाहिलेंस एवढेंच होऊं दे; जें ऐकशील तें ऐकलें एवढेंच, जें अनुभवशील तें अनुभवलें एवढेंच, व जें जाणशील तें जाणलें एवढेंच होऊं दे. असा तूं अभ्यास करशील, तर दृष्ट, श्रुत, अनुभूत आणि ज्ञात ह्यांत तूं आपणाला पहाणार नाहींस;  आणि जेव्हां तूं ह्यांत आपणाला पहाणार नाहींस, तेव्हां इहलोकीं, परलोकीं किंवा दुसर्‍या कोठेंहि तुला जन्म नाहीं; आणि हाच दुःखाचा अंत होय.”

हा उपदेश ऐकून बाहिया तेथल्या तेथें अर्हत्पदाला पावला. भगवान् तेथून निघून गेल्यावर एका व्यालेल्या गाईनें बाहियाला ठार मारलें. भिक्षाटनाहून परत येतांनां भगवंतानें त्याचें प्रेत पाहिलें, व तें एका खाटेवर घालावयास लावून भिक्षूंकडून शहराबाहेर नेववून जाळावयास लाविलें; आणि त्याच्या अवशेषांवर स्तूप बांधावयास लाविला. त्याची काय गति झाली, असा जेव्हां भिक्षूंनीं प्रश्न केला, तेव्हां, तो परिनिर्वाण पावला असें भगवंतानें सांगितलें. अत्यंत अल्पावकाशांत निर्वाणपदाचा बोध झाला म्हणून तत्काळ बोध करून घेणार्‍या भिक्षुश्रावकांत त्याला अग्रस्थान मिळालें.

« PreviousChapter ListNext »