७१. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं स्थविर भिक्षु आळीपाळीनें भिक्षुणींना उपदेश करीत असत. एके दिवशीं चूळपंथकाची पाळी होती. भिक्षुणी म्हणाल्या, “आज आर्य चूळपन्थक आम्हांस विस्तारानें उपदेश न करतां पुन्हां पुन्हां आपली उद्‍गार गाथाच म्हणत राहील.” हे त्यांचें अनुमान खरें ठरलें. त्या उपदेशासाठीं आल्यावर चूळपंथकानें ही गाथा म्हटली:- “अधिचेतसो अप्पमज्जतो मुनिनो मोनपथेसु सिक्खतो। सोका न भवन्ति तादिनो उपसन्तस्स सदा सतीमतो।। (समाधीमध्यें अप्रमत्त राहणार्‍या, मौनमार्गांत आत्मदमन करण्यास शिकणार्‍या, शांत आणि सदोदित स्मृतिमान् तादृश मुनीला शोकप्रसंग येत नसतात)” आपण केलेलें अनुमान खरें ठरलें, असें भिक्षुणी आपसांत बोलूं लागल्या. त्यांचे बोलणें चूळपंथकानें ऐकलें; व तो सिद्धीच्या बळानें आकाशांत चंक्रमण करूं लागला, उभा राहूं लागला, बसूं लागला, निजूं लागला, धूर उत्पन्न करूं लागला, अग्नि उत्पन्न करूं लागला व अंतर्धान पावूं लागला; आणि  वरचीच उद्‍गारगाथा व इतर पुष्कळ बुद्धवचनें म्हणूं लागला. तें पाहून भिक्षुणी म्हणूं लागल्या, “चूळपंथकाच्यासारखा प्रभावशाली उपदेश आम्हीं कधीं ऐकला नाहीं. पण ह्या चूळपंथकाच्या उपदेशामुळें शहरांत जाण्यास भिक्षूणींना उशीर झाला; व दरवाजे बंद झाल्यामुळें रात्र शहराबाहेर घालवून त्यांना सकाळीं शहरांत जावे लागलें, त्यांना पाहून लोक म्हणूं लागले कीं, ह्या भिक्षूणी अब्रह्मचारिणी आहेत; रात्रीं भिक्षूंबरोबर राहून सकाळीं गांवांत येत आहेत. होतां होतां ही गोष्ट भगवंताच्या कानीं आली. त्यानें चूळपंथकाचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

संघानें निवडलेला भिक्षुहि सूर्यास्तानंतर भिक्षुणींला उपदेश करील तर त्याला पाचित्तिय होतें।।२२।।

७२. बुद्ध भगवान् शाक्य देशांत कपिलवस्तु येथें निग्रोधारामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु भिक्षुणीउपाश्रयांत जाऊन भिक्षुणींना उपदेश करीत असत. हें वर्तमान भगवंताला समजलें, तेव्हां त्यानें त्यांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

“जो भिक्षु भिक्षुणीच्या उपाश्रयांत जाऊन भिक्षुणीला उपदेश करील त्याला पाचित्तिय होतें.”

त्या काळीं महाप्रजापती गोतमी आजारी होती. स्थविर भिक्षु तिच्या समाचाराला गेले. त्यांना तिनें धर्मोपदेश करण्याची विनंती केली. पण तसें करण्याची मनाई आहे म्हणून त्यांनीं धर्मोपदेश केला नाहीं. नंतर भगवान् महाप्रजापतीला भेटावयाला गेला. त्याला तिनें ही गोष्ट सांगितली. तेव्हां ह्या प्रकरणीं भगवान् भिक्षूंना म्हणाला, “आजारी भिक्षुणीला भिक्षुणीच्या उपाश्रयांत जाऊन उपदेश करण्याची मी परवानगी देतों. आणि त्यानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

जो भिक्षु प्रसंगाशिवाय भिक्षुणीच्या उपाश्रयांत जाऊन भिक्षुणीला उपदेश करी, त्याला पाचित्तिय होतें. भिक्षुणी अजारी असणें, हा ह्या बाबतींत प्रसंग जाणावा ।।२३।।

७३. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं स्थविर भिक्षूंना भिक्षुणींला उपदेश केल्यामुळें चीवरपिंडपातादिकांचा लाभ होत असे. षड्वर्गीय भिक्षु म्हणत कीं, केवळ लाभासाठीं स्थाविर भिक्षु भिक्षुणींना उपदेश करतात. ही गोष्ट भगवंताला समजली, तेव्हां त्यानें षड्वर्गियांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

लाभासाठीं स्थविर भिक्षु भिक्षुणींना उपदेश करतात असें जो भिक्षु म्हणेल, त्याला पाचित्तिय होतें ।।२४।।

७४. बुद्ध भगवान् श्रावस्तीं येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं एक भिक्षु श्रावस्तींतील एका गल्लीत भिक्षाटन करीत असे. एक भिक्षुणीहि तेथेंच भिक्षेला जात असे. तेथें त्या दोघांची ओळख झाली. एकदां त्या भिक्षुणीला  त्यानें चीवर दिलें. ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं....व भगवंतानें नियम केला तो असा:-

“जो भिक्षु अज्ञाति भिक्षुणीला चीवर देईल त्याला पाचित्तिय होतें.”

ह्यामुळें भिक्षुणीनें कांही पदार्थांच्या बद्दल चीवर मागितलें असतां भिक्षु देईनात. भगवंतानें पदार्थाच्या बद्दल चीवर देण्याची परवानगी दिली; व वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

जो भिक्षु पदार्थांच्या बदलीशिवाय अज्ञाति भिक्षुणीला चीवर देईल, त्याला पाचित्तिय होतें ।।२५।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel