Bookstruck

भाग ३ रा 70

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
घोसित श्रेष्ठीचे कुक्कुट श्रेष्ठी आणि पावारिक श्रेष्ठी असे दोघे सधन मित्र कौशांबी येथें रहात असत. बुद्ध भगवंताची कीर्ती ऐकून हे तिघजण त्याच्या दर्शनाला श्रावस्तीला गेले; आणि आपल्या शहरीं येण्यास त्यांनीं भगवंताला आमंत्रण केलें. तथागत गांवांत राहात नसतात, असें भगवंतानें त्यांना सांगितलें. ही सूचना त्यांना पुरे झाली; व कौशांबीला येऊन त्यांनीं शहराबाहेर फार दूर किंवा फार जवळ नव्हत, अशा रम्य ठिकाणीं तीन आराम (विहार) बांधले. घोसिताराम, कुक्कुटाराम आणि पावारिकाराम अशीं त्या आरामांचीं नांवें होतीं.

‘आपणाला आणि भिक्षुसंघाला रहाण्यासाठीं आराम तयार झाले आहेत,’ हें वर्तमान कळवून श्रेष्ठींनीं भगवंताला कौंशांबीला येण्यास आमंत्रण पाठविलें. परंतु भगवान् त्या वेळीं उपदेश करीत कुरुदेशांत फिरत होता. प्रवास कीरत तो कम्मासदम्म (कल्माषदम्य) शहरीं आला. तेथें मागंदिय ब्राह्मणानें त्याला पाहिलें, आणि त्याची लक्षणसंपत्ति पाहून आपल्या अद्वितीय सुंदर कन्येला हाच वर योग्य आहे, अशी त्याची खात्री झाली; व ताबडतोब घरीं जाऊन तो आपल्या पत्‍नीला म्हणाला, “भद्रे मुलीला शृंगारून तयार कर; आज तिच्यासाठी मीं योग्य वर पाहिला आहे.”

ब्राह्मणाच्या घरीं ही गडबड चालली असतां भगवान् बुद्ध त्या घरावरून गांवांत भिक्षेला गेला. लवकर मुलीला शृंगारून तयार केली नाहीं, म्हणून ब्राह्मण बायकोवर रागावूं लागला. तो म्हणाला, “हें पहा, तो या रस्त्यानें नुकताच निघून गेला. हीं येथें त्याचीं पावलें उमटली आहेत.” ब्राह्मणी बुद्धाच्या उमटलेल्या पावलांकडे पाहून हंसत हंसत म्हणाली, “तुम्ही अगदीं वेडे दिसतां ! हीं काही मनुष्याचीं पावलें दिसत नहींत. हीं अत्यंत विरक्त, सर्वज्ञ मनुष्याचीं पावलें आहेत. अशा मनुष्याला मुलगी देऊं पहातां, हा शुद्ध वेडेपणा आहे.” तिचें बोलणें लक्ष्यांत न घेतां ब्राह्मण म्हणाला, “अग तूं मोठी तोंडाळ आहेस!”

असा त्या दोघांचा वादविवाद चालला असतां बुद्ध भगवान् भिक्षाटन करून जेवण झाल्यावर पुन्हां त्या बाजूनें चालला. त्याला दुरून पाहून ब्राह्मण आपल्या मुलीला घेऊन त्याच्याजवळ आला आणि म्हणला, “भो प्रव्रजित, सकाळपासून मी तुमच्या शोधांत आहें. सर्वलक्षणसंपन्न अशा माझ्या मुलीला वर तूंच योग्य आहेस. तेव्हा आजपासून तूं हिचा सांभाळ कर.”

भ० :- बा ब्राह्मणा, तृष्णा, असंतोष आणि कामविकार पाहून स्त्रियांच्या संगतींत मला सुख वाटत नाहीं. हें अमेध्य पदार्थांनीं भरलेलें शरीर पायानेंहि स्पर्श करण्यास योग्य नाहीं, असें मला वाटतें.

हें बुद्धाचें भाषण ऐकून मागंदियेला (मांगदिय ब्राह्मणाच्या कन्येला) अत्यंत त्वेष आला. ती आपल्याशींच म्हणाली, “याला जर मी नको असेन, तर नको असें सरळपणें बोलावें. पण ‘अमेध्य पदार्थांनीं भरलेलें शरीर’ असें बोलून माझा अपमान कां करावा?” तेव्हांपासून तिनें बुद्धाचा सूड उगविण्याचा निश्चय केला; भगवंताचा धर्मोपदेश ऐकून तिची आई भिक्षुणी झाली व बाप भिक्षु झाला. आणि त्यानें मुलीला आपल्या धाकट्या भावाच्या स्वाधीन केलें.
« PreviousChapter ListNext »