६३. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं हिंवाळ्यांत भिक्षु मोकळ्या जागीं मंचक किंवा आसन ठेवून उन्हांत बसत असत; व तें जागच्या जागीं न ठेवतां किंवा दुसर्‍या कोणाला न सांगतां तेथेच टाकून जात असत. हें वर्तमान भगवंताला समजलें तेव्हां त्यानें त्यांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु सांघिक मंच, पीठ, बिछाना किंवा चटई मोकळ्या जागेंत पसरून किंवा पसरावयास लावून जातेवेळीं जागच्याजागीं न ठेवील, न ठेवावयास लावील, किंवा दुसर्‍याला न सांगता जाईल, त्याला पाचित्तिय होतें ।।१४।।

६४. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अ. आरामांत रहात होता. त्या काळीं सप्तदशवर्गीय भिक्षु परस्परांशीं मैत्रीनें वागत असत. ते एकत्र रहात व एकत्रच प्रवास करीत. एके दिवशीं एका सांघिक विहारांत बिछाने पसरून ते निजले व जातांना बिछाने तसेच टाकून गेले. त्यामुळें बिछान्याला वाळवी लागली. हें वर्तमान भगवंताला समजलें, तेव्हां त्यांचा, निषेध करून त्यानें भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु सांघिक विहारांत शय्या (बिछाना) हांतरून किंवा हांथरावयास लावून जातांना जागच्याजागीं न ठेवितां किंवा न ठेवावयास लावतां किंवा कोणाला न सांगतां जाईल, त्याला पाचित्तिय होतें ।।१५।।

६५. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. अरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु चांगल्या चांगल्या जागीं जाऊन आगाऊच निजण्याच्या उद्देशानें बसत असत. स्थविर भिक्षु त्यांना तेथून उठवीत; परंतु षड्वर्गीय भिक्षु गर्दी करून तेथेंच निजत असत; हेतु हा कीं ज्याला गर्दी वाटत असेल त्यानें तेथून निघून जावें. ती गोष्ट भगवंताला समजली तेव्हां त्यानें षड्वर्गियांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु सांघिक विहारांत पूर्वी वस्तीला राहिलेल्या भिक्षूला गर्दी व्हावी व त्यानें तेथून निघून जावें अशा हेतूनें जाणूनबुजून गर्दी करू निजेल, त्याला ह्याच कारणास्तव पाचित्तिय होतें ।।१६।।

६६. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं सप्तदशवर्गीय भिक्षूंनी एका गांवठी विहाराची डागडुजी चालविली होती. ती होईपर्यंत षड्वर्गीय भिक्षूंनीं वाट पाहिली, व विहार साफसूफ झाल्यावर सप्तदशवर्गीयांना हांकून देऊन आपणच तेथें राहूं लागले. सप्तदशवर्गियांनीं त्यांची पुष्कळ विनवणी केली; पण त्यांना ते आंत राहूं देईनात.हें वर्तमान भगवंताला समजलें तेव्हां त्यानें षड्वर्गियांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु भिक्षुवर रागावून सांघिक विहारांतून त्याला बाहेर काढील, किंवा बाहेर काढवील, त्याला पाचित्तिय होतें ।।१७।।

६७. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या वेळी दोन भिक्षु सांघिक विहारांतील दोन मजली कुटींत, एक तळमजल्यावर व दुसरा वरच्या मजल्यावर रहात होता. वरच्या मजल्यावर जमिनींत रोंवलेल्या पायांची एक खाट होती. वरच्या मजल्यावर राहणारा भिक्षु त्या खाटेवर जोरानें एकदम बसला. त्यामुळें खाटेचा पाय खालीं शिरून खालच्या मजल्यावर राहणार्‍या भिक्षूच्या डोक्याला मोठा धक्का लागला, व त्यांनें आरडाओरड केली. सज्जन भिक्षूंना ही गोष्ट आवडली नाहीं, व भगवंतानें त्या बाबतींत नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु सांघिक विहारांतील दोन मजली कुटींत वरच्या मजल्यावर पाय जमिनींत रोंवलेल्या खाटेवर किंवा आसनावर बसेल किंवा निजेल, त्याला पाचित्तिय होतें ।।१८।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel