वाटेंत एका निर्जन प्रदेशांत तिला नवर्‍यानें गांठलें. तेथेंच तिला प्रसवनेदना होऊं लागल्या. इतक्यांत अकालमेघ उद्‍भवून जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन गेलें. अशा स्थितींत आपणावर कांहीं तरी आच्छादन असावयास पाहिजे, असें ती नवर्‍यास म्हणाली. त्यानें खुंट वगैरे गाडून एक झोंपडी बनविण्यास आरंभ केला. ती शाकारण्यासाठीं एका वारुळाजवळ असलेलें गवत कापीत असतां, तेथील भयंकर कृष्णसर्प त्याच्या पायाला चावला, व तो मरून खालीं पडला. इकडे त्याची स्त्री प्रसूत होऊन पुत्र प्रसवली, व ती सारी रात्र दोन्ही मुलांना उराशीं घेऊन तिनें मोठ्या संकटांत घालविली. ‘मी अनाथ झालेली पाहून मला माझा पति सोडून तर गेला नसेल ना?’ असें तिला वारंवार वाटे.

पण दुसर्‍या दिवशीं इकडे तिकडे हिंडत असतां तिला त्याची गत काय झाली हें समजलें. तेव्हां मुलांना घेऊन कोठें तरी गांवाच्या जवळ जाण्याच्या उद्देशानें ती तशीच पुढें चालली. लहान मुलाला ओटींत, व मोठ्या मुलाला तिनें हातांत धरलें होतें. वाटेंत पावसामुळें एका ओढ्याला बरेंच पाणी आलें होतें. तेव्हां मोठ्या मुलाला अलीकडच्या तीरावर ठेवून व धाकट्याला पलीकडच्या तीराला घेऊन जाऊन त्याला तेथें चिंध्यांच्या बिछान्यावर निजविलें, व ती परत येऊं लागली. ती त्या ओढ्याच्या मध्यभागीं आल्यावर एक ससाणा धाकट्या मुलाला पकडण्यासाठीं येत असलेला तिनें पाहिला. जोरानें हात हालवून ती त्या ससाण्याला पळवूं लागली. पण त्यामुळें, आई आपणास बोलावते आहे असें वाटून मोठ्या मुलानें ओढ्यांत उडी टाकली व तो वाहून गेला!

इकडे धाकट्या मुलाला बचावण्यासाठीं ती धावत आहे, तोंच ससाणा त्याला घेऊन पळून गेला. त्यायोगें अत्यंत शोकाकुल होऊन, -

दोघे पुत्र मेले, मेला माझा पति।

असें म्हणत ती श्रावस्तीला आली. तेथें तिचे आईबाप व भाऊ घराला आग लागून एकाच ठिकाणी जळून मेल्याचें तिला वर्तमान समजलें. तेव्हां ती अगदींच वेडी होऊन गेली, व म्हणूं लागली कीं,

दोघे पुत्र मेले, मेला माझा पति।
आईबाप जळती, बंधूसह १ ।।
------------------------------------------------------------------------------------------------------------
१ मूळ गाथा थेरी अपदानांत आहे. ती अशी :-
------------------------------------------------------------------------------------------------------------
उभो पुत्ता कालकता पत्थे मय्हं पति मतो।
माता पिता च भाता च एकचितकस्मिं डय्हरे।।

दोन्ही पुत्र मेले. मार्गांत माझा पति मेला. आईबाप आणि भाऊ एकाच चितेवर जळाले.)

अशा स्थितींत ती नागडीउघडी भटकत असे, व कोणी कपडा दिला तर तो फाडून फाडून त्याच्या चिंध्या करी; म्हणून तिला पटाचारा हें नांव पडलें. एके दिवशीं भगवान् बुद्ध जेतवनांत पुष्कळ लोकांना धर्मोपदेश करीत असतां ती तेथें येऊन एका बाजूला उभी राहिली. तेव्हां भगवंतानें मैत्रीभावनेनें तिच्याकडे पाहिलें, आणि तो म्हणाला,  “भगिनी ताळ्यावर ये, भगिनी ताळ्यावर ये.”

हे शब्द कानीं पडल्याबरोबर तिच्या मनांत अत्यंत लज्जा उद्‍भवली, व ती मटकन खालीं बसली. जवळ उभा असलेल्या एका मनुष्यानें आपलें उपरणें तिच्या अंगावर फेकलें. तें नेसून ती धर्मश्रवण करूं लागली. तेव्हां भगवान् म्हणाला, “पुत्र, पिता किंवा बांधव आपलें रक्षण करूं शकत नाहींत. ज्याच्यावर काळाचा घाला आला असेल, त्याचें आप्तांकडून संरक्षण होत नसतें. हें जाणून शीलसंवृत होऊन शहाण्या माणसानें त्वरित निर्वाणगामी मार्गाला १ लागावें.” 
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- मूळ गाथा धम्मपदांतील आहेत त्या अशा :-
न सन्ति पुत्ता ताणाय, न पिता न पि बन्धवा।
अन्तकेनाधिपन्नस्स नत्थि ञतीसु ताणता।।
एतमत्थवसं ञत्वा पण्डितो सीलसंवुतो।
निब्बानगमनं मग्गं खिप्पमेव विसोधये।।
------------------------------------------------------------------------------------------------------------
नंतर तिनें भिक्षुणींच्या संघांत प्रवेश केला व क्रमानें अर्हत्पद मिळविलें. भिक्षुसंघांत जसा उपालि स्थविर विनयाच्या नियमांत कुशल होता, तशी ही भिक्षुणीसंघांत होती. म्हणून विनयधर भिक्षुणींत तिला अग्रस्थान मिळालें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel