“दीर्घायु कुमार अरण्यांत जाऊन यथास्थित रडला; व आपलीं आंसवें पुसून राजवाड्याजवळ असलेल्या हस्तिशाळेंत आला. तेथील मुख्य माहुताच्या अनुमतीनें रात्रीं राहून पहांटेला त्यानें अत्यंत सुस्वर गायन आरंभिले. ब्रह्मदत्त ते ऐकून फार प्रसन्न झाला; व त्यानें दीर्घायूला बोलावून आणून त्याला आपल्या तैनातीला ठेविलें. थोड्याच अवधींत दीर्घायूवांचून ब्रह्मदत्ताला करमत नाहीं असें झालें. एके दिवशीं ब्रह्मदत्त दीर्घायूबरोबर शिकारीला गेला. दूर अंतरावर गेल्यावर काशीराजा फार थकला, व रथांतून खालीं उतरून दीर्घायूच्या मांडीवर डोकें ठेवून निजल. त्याला ठार मारण्याचा विचार दीर्घायूच्या मनांत आला. पण आपल्या बापाचे शब्द आठवून त्यानें आपलें मन आवरलें. इतक्यांत काशीराजा खडबडून जागा झाला व ह्मणाला, “मुला, मला असें दुष्ट स्वप्न पडलें कीं, कोसल राजाच्या मुलानें माझ्यावर तरवारीचा प्रहार करून मला खालीं पाडलें. त्यामुळें मी खडबडून जागा झालों.” तत्क्षणीं काशीराजाचे केंस पकडून म्यानांतून तलवार बाहेर काढून दीर्घायु म्हणाला, “महाराज, तोच मी कोसलराजाचा मुलगा दीर्घायु आहें. तुम्हीं आमचें फार फार अकल्याण केलें आहे. आमचे राज्य हरण करून माझ्या आईबापांलाहि तुम्हीं ठार मारलें. तुमचा सूड उगवण्याची ही वेळ आहे.” ब्रह्मदत्त दीर्घायूच्या पायांवर डोकें ठेवून म्हणाला, “बा दीर्घायू, मला जीवदान दे, मला जीवदान दे.” दीर्घायु म्हणाला, “मी तुम्हाला जीवदान देणारा कोण? तुम्हींच मला जीवदान द्या.” ब्रह्मदत्त म्हणाला, “तर मग आपण परस्परांला जीवदान देऊं.” ते दोघे परस्परांवर प्रेम करण्याची शपथ वाहून वाराणसीला परत आले.

“तेथें काशीराजानें सभा भरवून अमात्यांला विचारलें कीं, कोसल राजाचा मुलगा दीर्घायु जर आमच्या हातीं आला तर त्याला कोणती शिक्षा करावी? निरनिराळ्या तरर्‍हेनें त्याचा वध करावा असें सर्वांचें मत पडलें. पण ब्रह्मदत्त म्हणाला, “हा तो दीर्घायु कुमार आहे. आम्हीं परस्परांला जीवदान दिलें असल्यामुळें ह्याला कोणतीहि शिक्षा करतां येणें शक्य नाहीं.” तो दिर्यायुला म्हणाला, “तुझ्या बापानें, ‘तूं फार लांब किंवा फार जवळ पाहूं नकोस, वैरानें वैर शमत नाहीं. प्रेमानेंच वैर शमतें,’ असें सांगितलें त्याचा अर्थ काय?” दीर्घायु म्हणाला, दूर पाहूं नकोस म्हणजे दुसर्‍यांचे वैर चिरकाळ चित्तांत बाळगूं नकोस. जवळ पाहूं नकोस म्हणजे मैत्री एकदम तोडूं नकोस. बाकी वाक्याचा अर्थ स्पष्टच आहे. मी जर तु्म्हांस मारलें असतें तर तुमच्या पक्षाच्या लोकांनी मला मारलें असतें. ह्याप्रमाणें वैर शमन न होतां वाढलें असतें. पण तें आम्हीं आज प्रेमानें शमविलें आहे.” हे ऐकून ब्रह्मदत्त राजा संतुष्ट झाला. व आपल्या कन्येचा दीर्घायुबरोबर विवाह करून कोसल देशाचें राज्य त्याला परत दिलें. त्याचप्रमाणें त्याच्या बापाची लुटून आणलेली संपत्ति त्याला परत देण्यांत आलीं.”

ही गोष्ट सांगून बुद्धानें भांडण न करण्याविषयीं भिक्षूंना उपदेश केला. परंतु तो अन्यायवादी भिक्षु पु्न्हां ह्मणाला, “भदंत, आपण स्वस्थ रहा. आम्ही या भांडणाचें काय होतें तें पाहून घेऊं.” ह्या लोकांचीं मनें कलुषित झालीं असून यांची समजूत करणें कठीण आहे, असें जाणून बुद्ध भगवान् त्या सभेंतून उठून गेला.

६७. कौशाम्बींत भिक्षाटन करून भोजनानंतर पात्र-चीवर घेऊन संघामध्ये राहुन बुद्धानें,

(१) सगळेच मोठमोठ्यानें बोलणारे आहेत. ह्यांत आपणाला मूर्ख कोणच समजत नाहीं. संघांत तट पडत चालले असतां इतरांविषयीं आदर कोणालाच वाटत नाहीं.
(२) हे निष्काळजी पंडितंमानी भिक्षु तोंड उघडून वाटेल तें बोलतात. परंतु आपण वहात चाललों आहों हें ह्यांना समजत नाहीं.
(३) मला शिव्या दिल्या, मला मारलें, मला जिंकलें, माझी वस्तू हरण केली ह्याचा जे सूड उगवूं पहातात त्यांचे वैर शमत पावत नाहीं.
(४) मला शिव्या दिल्या, मला मारलें, मला जिंकलें, माझी वस्तू हरण केली ह्याचा जे सूड उगवूं पहात नाहींत त्यांचे वैर शमन पावतें.
(५) वैरानें वैर कधींहि शमत नाहीं; प्रेमानेंच वैर शमतें, हा सनातन धर्म होय.
(६) दुसरे जाणत नाहींत पण आम्ही तरी ह्या भांडणापासून विरत होऊं असें जे जाणतात त्यांची भांडणें मिटतात.
(७) हाडें मोडणारे, ठार मारणारे, गाई घोडे व पैसा हरण करणारे आणि राष्ट्रें लुटणारे अशा लोकांचाहि संघ बनतो मग तुमचा कां बनूं नये?
(८) जर आपणाबरोबर रहाणारा शहाणा आणि सुशील सहाय मिळाला तर विघ्नांची पर्वा न करतां विवेकी मनुष्यानें त्याबरोबर रहावें.
(९) जर आपणाबरोबर रहाणारा शहाणा आणि सुशील सहाय मिळत नसला तर राजा जसा जिंकलेलें राज्य सोडून जातो, व जसा नागहत्ती मातंगारण्यांत एकटा रहातो, तसें एकाकी रहावें.
(१०) एकटें रहाणें चांगलें. मूर्खाशीं सहवास चांगला नाही. मातंगारण्यांत जसा नागहत्ती एकटा रहातो तसें एकटें रहावें व पापाचरण करूं नये.

ह्या अर्थाच्या गाथा म्हटल्या, व तो बालकलोणकारग्रामाकडे गेला. तेथें भृगु भिक्षूनें त्याचें स्वागत केलें. नंतर भगवान् प्राचीन वंशदाव नांवाच्या उपनाकडे गेला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel