मागंदियेच्या सौंदर्याची कीर्ति ऐकून उदयनराजानें तिच्या चुलत्याची समजूत घातली व तिच्याशीं लग्न केलें. सामावतीप्रमाणेंच तिलाहि एक महाल बांधून दिला होता; व तिचा मानमरातबहि तसाच ठेवण्यांत आला होता. बुद्ध भगवान् कौशांबीला आला, तेव्हां त्याचा सूड उगविण्याची ही संधि चांगली आहे असें जाणून मागंदियेनें आपल्या चुलत्यामार्फत गांवांतील टवाळ लोकांना एकत्र करून त्यांच्याकडून बुद्धाला शिव्यागाळी देवविल्या. तेव्हां आनंद म्हणाला, “भदंत, या शहरांतील लोक असे दुष्ट आहेत. तेव्हां आपण येथून दुसरीकडे जाऊं.” भगवान् म्हणाला, “अशा प्रसंगीं तथागत घाबरत नसतात. एक आठवडाभर हे लोक शिव्यागाळी देतील; मग स्वस्थ बसतील. त्यांची शिवीगाळ त्यांजपाशींच राहील. तूं आपल्या जीवाला विनाकारण त्रास करून घेऊं नको.”

अर्थात् मागंदियेचा हा प्रयोग साधला नाहीं, व दुसर्‍या कोणत्या मार्गानें सूड उगवितां येईल या विचारांत ती पडली.

एके दिवशी भगवंताला कौशांबी नगरांतील मुख्य माळ्याच्या घरीं आमंत्रण होतें. सामावतीच्या परिवारांत खुज्जुतरा दासीहि होती, व ती रोज त्या माळ्याकडून आठ कार्षापणांचीं फुलें घेऊन जात असे. नियमाप्रमाणें फुलांसाठीं आली असतां माळी तिला म्हणाला, “अग उत्तरे, आज तुला फुलें देण्यास मला अवकाश नाहीं. भगवंताला आणि भिक्षुसंघाला मला वाढावयाचें आहे. तूंहि वाढण्याच्या कामीं जरा मदत कर.” त्याप्रमाणें खुज्जुत्तरेनें माळ्याला मदत केली. भोजनोत्तर भगवंतानें केलेला उपदेश तिनें ऐकला, व माळ्याकडून फुलें घेऊन ती सामावतीकडे गेली. फुलें पाहून सामावती तिला म्हणाली, “अग हीं तर फुलें दुप्पट दिसतात. राजानें प्रसन्न होऊन फुलांचे पैसे दुप्पट तर केले नाहींत ना?” खुज्जुत्तरा म्हणाली, “बाईसाहेब, खरें सांगूं, मी रोज चार कार्षापणांची फुलें आणीत असें व चार कार्षापण पदरीं ठेवीत असे; पण आज आठहि कार्षापणांचीं आणलीं.”

सा० :- अग, पण आजच असें कां केलेंस?

उ० :- बाईसाहेब, आज मी अमृतप्राय धर्म जाणलास; आणि यापुढें माझ्याकडून असत्य कर्म होणें शक्य नाहीं.

सा० :- अग उत्तरे, जो तूं अमृतधर्म जाणलास, तो आम्हांलाहि दे ना?

म्हणून सामावतीनें आणि तिच्या सखींनीं हात पुढें केले.

खुज्जुत्तरा म्हणाली, “बाईसाहेब, हा धर्म आपल्या हातावर ठेवतां येत नाहीं. बुद्धगुरूनें सांगितल्याप्रमाणें त्याचा मी तुम्हांस उपदेश करीन. पण तुमच्या कर्मांत असेल, तरच तुम्हांला त्याचा लाभ होईल.

खुज्जुत्तरेच्या सांगण्याप्रमाणें तिला बसण्यासाठीं एक उत्तम आसन देण्यांत आलें, आणि सामावती आणि तिच्या सख्या हलक्या आसनांवर बसून धर्मोपदेश ऐकूं लागल्या. त्यांना तो इतका आवडला कीं, त्या दिवसापासून खुज्जुत्तरेला पाठवून बुद्धाचा नवा नवा उपदेश त्या ऐकावयास लावीत, व तिच्याकडून आपण स्वतः ऐकत. त्याशिवाय खुज्जुत्तरेला महालांत दुसरें कोणतेंहि काम सांगण्यांत येत नसे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel