१७. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्याकाळीं अस्सजि आणि पुनब्बसुक हे दोघे भिक्षु कीटागिरी येथें रहात होते. ते पहिल्या भागाच्य ७४व्या कलमांत सांगितल्याप्रमाणें नानाप्रकारचा अनाचार आचरीत असत. त्याच कलमांत सांगितल्याप्रमाणें त्यांना सारिपुत्र आणि मोग्गल्लान ह्यांजकडून तेथून हांकून लावण्यांत आलें. अशा रितीनें प्रव्राजनीय कर्म केलें असतां ते नीट रितीनें वागत नसत; भिक्षूंची क्षमा न मागतां त्यांना शिवीगाळ देत असत; म्हणत असत कीं, भिक्षु छंदगामी, द्वेषगामी, मोहगामी आणि भयगामी आहेत. हें ऐकून भिक्षूंनीं त्यांचा निषेध केला, व हें वर्तमान त्यांनीं भगवंताला सांगितलें. तेव्हां भगवंतानें नियम घालून दिला तो असा:-

एकादा भिक्षु एकाद्या गांवाजवळ अगर शहराजवळ रहातो. तो कुटुंबांची श्रद्धा बिघडवितो, व वाईट आचरण करतो. त्याचीं पापाचरणें दिसून येतात व ऐकूं येतात. कुटुंबांची श्रद्धा बिघडविल्याचें दिसूं येतें  व ऐकूं येतें. त्याला भिक्षूंनीं म्हणावें कीं आयुष्मान्, तू कुलांची श्रद्धा बिघडविणारा व पापाचारी आहेस. तुझीं पापाचरणे दिसतात व ऐकूं येतात. तूं कुटुंबांची श्रद्धा बिघडविल्याचें दिसतें व ऐकूं येतें. तेव्हां तूं येथून निघून जा. येथें तुला रहातां येत नाहीं. असे भिक्षूंनीं म्हटलें असतां तो म्हणेल कीं, भिक्षु छंदगामी, द्वेषगामी, मोहगामी व भयगामी आहेत. अशा आपत्तीसाठीं एकाद्याला हांकून लावतात व एकाद्याला हांकून लावीत नाहींत. त्याला भिक्षूंनी म्हणावें कीं, आयुष्मान्, तूं असें बोलूं नकोस. भिक्षु छंदगामी, द्वेषगामी, मोहगामी व भयगामी नाहींत. तूं कुलांची श्रद्धा बिघडविणारा व पापाचारी आहेस. तुझीं पापाचरणें दिसण्यांत येतात व ऐकण्यात येतात. तूं कुटुंबांची श्रद्धा बिघडविल्याचें दिसतें व ऐकूं येतें. तेव्हां तूं येथून निघून जा. तुला य़ेथें रहाता येत नाहीं. असें म्हटलें असतां तो जर असाच हट्ट धरील, तर हट्ट सोडण्यासाठीं भिक्षूंनी त्याची त्रिवार समजूत पाडावी. त्रिवार समजूत पाडली असातां जर हट्ट सोडला तर ठीक आहे; सोडला नाहीं तर संघादिशेष होतो ।।१३।।

दोन अनियत आपत्ति

१८. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं आयुष्मान् उदायी श्रावस्तींतील पुष्कळ कुटुंबांत जात येत असे; त्याच्या ओळखीची एक तरुण कुमारिका दुसर्‍या एका घरीं विवाह करून दिली होती. एके दिवशीं उदायी तिच्या सासर्‍याच्या घरीं जाऊन एका एकान्त जागीं तिच्याशीं गोष्टी करीत बसला. त्या काळीं विशाखेला निरागी पुत्र आणि निरोगी नातू पुष्कळ होते. लोक तिला यज्ञांत, मंगलकार्यांत आणि उत्सवांत आमंत्रण करून अग्र भोजनाचा मान देत असत. ती निमंत्रणावरून त्या कुटुंबांत गेली होती. उदायीला एकांतांत त्या तरुण स्त्रीशीं बोलतांना पाहून ती म्हणाली, “भदंत, अशा रितीनें एकान्तांत स्त्रीबरोबर बसणें बरोबर नाहीं. तुम्ही जरी कामविकारापासून मुक्त असलां, तरी पुष्कळ लोकांना तुमची खात्री वाटणार नाहीं.” असे सांगितलें तरी उदायीनें तें ऐकलें नाहीं. तेव्हां विशाखेनें तें वर्तमान भिक्षूंना कळविलें. भिक्षूंनीं त्याची निंदा केली, व तें वर्तमान भगवंताला सांगितलें. त्यानें उदायीचा निषेध करून भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु स्त्रीबरोबर एकटा स्त्रीसंगाला योग्य अशा प्रतिच्छन्न जागेंत बसेल, व विश्वासू उपासिका त्याला पाहून पाराजिका, संघादिशेष किंवा पाचित्तिय ह्या तिन्हींपैकी एक आपत्ति लागू करील; जर तो भिक्षु तेथें बसल्याचें कबूल करीत असेल, तर ती विश्वासू उपासिका बोलेल त्याप्रमाणें त्याला पाराजिका, संघादिशेष किंवा पाचित्तिय आपत्ति लागू करावी. ही आपत्ति अनियत (अनिश्चत) आहे ।।१।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel