भारद्वाज :- (अशा तरुण भिक्षूंना), महाराज, भगवंतानें म्हटलें आहे कीं, भिक्षुहो, तुम्ही इंद्रीयांचें रक्षण करा. डोळ्यांनीं रूप पाहून चेहर्‍याचें व हावभावादिकांचें (कामासक्तिपूर्वक) ग्रहण करूं नका. नेत्रेंद्रिय रक्षण केलें नाहीं तर विषम लोभ, दौर्मनस्य इत्यादिक पापकारक, अकुशल विचार मनांत शिरतील; म्हणून याचें नीट रक्षण करा. (त्याचप्रमाणें इतर इंद्रियांचा रक्षणविधि समजावा). महाराज, या कारणामुळें तरुण भिक्षु ब्रह्मचर्य पाळूं शकतात.

राजा :- फार चांगलें! फार चांगलें! भो भारद्वाज, त्या भगवंताचें हें म्हणणें फार चांगलें आहे. ह्याच कारणामुळें तरुण भिक्षु ब्रह्मचर्य पालन करीत असले पाहिजेत. जेव्हां मी शरीर, वाचा आणि मन ह्यांजविषयीं संयम न ठेवतां, स्मृति कायम न ठेवतां असंवृत इंद्रियांनीं अंतःपुरांत प्रवेश करतों तेव्हां कामविकार माझा पूर्णपणें पराभव करतात. पण जेव्हां मी काया, वाचा आणि मन संयमित करून स्मृति कायम ठेवून संवृत इंद्रियांनीं अंतःपुरांत जातों, त्यावेळीं कामविकार माझा परावभव करूं शकत नाहींत.

अशा रितीनें भारद्वाजाचा गौरव करून उदयन राजा भारद्वाजाचा उपासक झाला.

राजगृहक श्रेष्ठीनें चंदनाचें पात्र बांबूच्या टोंकाला लावून ठेवलें होतें. तें योगसिद्धिबळानें पिंडोल भारद्वाजानें तेथून घेतलें. ही कथा चुल्लवग्गाच्या पांचव्या खन्धकांत आहे व ती मनोरथपूरणींतहि घेतली आहे. परंतु तिचें ऐतिहासिक महत्त्व विशेष न वाटल्यामुळें ती येथें सविस्तर देण्यांत येत नाहीं.


पुण्ण मन्तानिपुत्त

“माझ्या धर्मोपदेशक भिक्षुश्रावकांत पुण्ण मन्तानिपुत्त श्रेष्ठ आहे.”


हा आज्ञात कौण्डिन्याचा भाचा. आईचें नाव मन्तानी;  म्हणून ह्याला मन्तानिपुत्त असें म्हणत असत. कपिलवस्तूजवळ द्रोणवस्तु नांवाच्या ब्राह्मणग्रामांत ह्याचा जन्म झाला. बुद्धाचा धर्म जाणून अर्हत्पद मिळविल्यावर कौण्डिन्य स्वदेशीं आला, व त्यानें ह्या आपल्या भाच्याला प्रव्रज्या दिली; व अज्ञात कौडिन्य पुन्हां बुद्धाजवळ आला, आणि भगवंताची परवानगी घेऊन एकाकी रहाण्याच्या उद्देशानें षड्दन्त सरोवराच्या प्रदेशांत गेला. पुण्ण कपिलवस्तूजवळच रहात होता. भगवंताच्या धर्मांत पारंगत होऊन तो पुष्कळ शिष्यांना शिकवीत होता, तरी त्यानें भगवंताचें प्रत्यक्ष दर्शन घेतलें नव्हतें. कांहीं वर्षांनंतर आपल्या शिष्यांना पुढें पाठवून मागाहून एकटाच भगवंताच्या दर्शनाला येण्यासाठीं तो निघाला. ह्याच्या पुढील हकीगत मज्झिमनिकायांतील रथविनीत सुत्तांतच आली आहे. ती अशी :-

भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. वर्षावास संपल्यावर जातिभूमीहून १ (१- जातिभूमि म्हणजे भगवंताची जन्मभूमि, शाक्यदेश.) कांहीं भिक्षु भगवंताच्या दर्शनाला आले, आणि भगवंताला नमस्कार करून एका बाजूला बसले. त्यांना भगवान् म्हणाला, “भिक्षुहो, स्वतः अल्पेच्छ असून भिक्षूंना अल्पेच्छकथा सांगणारा, स्वतः संतुष्ट असून भिक्षूंना संतुष्टिकथा सांगणारा, स्वतः प्रविविक्त असून भिक्षूंना प्रविवेककथा सांगणारा, स्वतःअसंसृष्ट असून भिक्षूंना असंसर्गकथा सांगणारा, स्वतः आरब्धवीर्य असून भिक्षूंना वीर्यारंभकथा सांगणारा, स्वतः शीलसंपन्न असून भिक्षूंना शीलसंपत्तिकथा सांगणारा, स्वतः समाधिसंपन्न असून भिक्षूंना ना समाधिसंपत्तिकथा सांगणारा, स्वतः प्रज्ञासंपन्न असून भिक्षूंना प्रज्ञासंपत्तिकथा सांगणारा, स्वतः विमुक्तिसंपन्न असून भिक्षूंना विमुक्तिसंपत्तिकथा सांगणारा, स्वतः विमुक्तिज्ञानदर्शनसंपन्न असून भिक्षूंना विमुक्तिज्ञानदर्शसंपत्तिकथा १ (१- ह्या दहा कथांना ‘दसकथावत्थु’ व त्या सांगण्यार्‍या समर्थ भिक्षूला ‘दसकथावत्थुलाभी’ म्हणतात.) सांगणारा उपदेशक, विज्ञापक, संदर्शक समादपक आणि समुत्तेजक अशी ज्याची संभावना केली जात आहे, असा जातिभूमींतील भिक्षूंमध्यें कोणी आहे काय?”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel