Bookstruck

भाग ३ रा 77

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
७१   
सुम्पवासा कोलियदुहिता

“उत्तम अन्न देणार्‍या उपासिकांत सुप्पवासा कोलियदुहिता श्रेष्ठ आहे.”

ही सीवलि स्थविराची आई. हिची गोष्ट ह्या भागाच्या अठराव्या प्रकरणांत आलीच आहे. तेव्हां ती तेथें पहावीं.

७२
सुप्पिया उपासिका

“आजार्‍यांची शुश्रूषा करणार्‍या उपासिकांत सुप्पिया श्रेष्ठ आहे.”

ही वाराणसींत जन्मली, आणि तिचें लग्नहि त्याच शहरांतील एका तरुणाशीं झालें. एके दिवशीं धर्मश्रवणासाठीं विहारांत गेली असतां, तेथें अत्यंत आजारी पडलेल्या एका भिक्षूला तिनें पाहिलें, व त्याला औषधासाठीं काय पाहिजे आहे ह्याची चौकशी केली. त्याच्या रोगाला मांसाचा काढा पाहिजे होता. तिनें मांस आणण्याचा प्रयत्‍न केला. पण अशा अवेळीं मांस मिळणें शक्य नव्हतें. ती बुद्धोपासिका असल्यामुळें प्राण्याला मारून मांस तयार करणेंहि तिला पसंत नव्हतें. तेव्हां आपल्या खोलींत जाऊन शस्त्रानें आपल्या मांडीचें मांस कापून त्याचा आपल्या दासीकडून काढा बनवून तिनें तो त्या भिक्षूकडे पाठविला; व ती त्यायोगें आजारी पडली.

सुप्पियेच्या नवर्‍याचें नांव सुप्पिय असें होतें. तोहि अत्यंत श्रद्धाळु उपासक होता. घरीं येऊन चौकशी केल्यावर तिच्या आजाराचें कारण जेव्हां समजलें, तेव्हां त्याला सानंद आश्चर्य वाटलें. आजारी भिक्षूला गुण पाडण्यासाठीं आपल्या मांडीचेंहि मांस कापून देण्यास ही तयार झाली, हें हिचें औदार्य फारच थोर आहे, असें तो आपल्या मनाशींच म्हणाला. त्या दिवशीं विहारांत जाऊन भगवंताला त्यानें आमंत्रण केलें. दुसर्‍या दिवशीं ठरलेल्या वेळीं भगवान् भिक्षुसंघासह त्याच्या घरीं येऊन तेथें मांडलेल्या आसनावर बसला. सुप्पिय भगवंताला नमस्कार करून एका बाजूला उभा राहिला. तेव्हां भगवंतानें सुप्पियेची चौकशी केली. सुप्पियानें, ‘ती आजारी आहे,’ असें सांगितलें. भगवान् म्हणाला, “तिला इकडे बोलवा.”

सु० :- पण भदन्त, तिच्यानें उठवत नाहीं.

भ० :- जर उठवत नसेल, तर तिला उचलून आणा.

त्याप्रमाणें तिला उचलून भगवंतासमोर आणून बसविलें. तेव्हां तिची जखम आपोआपच बरी झाली. भोजनोत्तर भगवंतानें विहारांत जाऊन, विचार न करतां मनुष्यमांसाचा काढा घेतल्याबद्दल त्या भिक्षूचा निषेध केला, व तेव्हांपासून औषधासाठींहि मनुष्यमांसाचा उपोयग करतां कामा नये, असा नियम केला. १
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- मूळ गोष्ट महावग्गाच्या सहाव्या भागांत आहे, व तीच कांहीं फेरफार करून मनोरथपूरणीकारानें घेतली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
ह्या गोष्टीवरून सुप्पियेची आजार्‍यांविषयीं अत्यंत कळकळ स्पष्टच दिसून येत आहे.
« PreviousChapter ListNext »