५६. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं उदायी श्रावस्तीमध्यें पुष्कळ कुटुंबांत जात येत असे. अशा एका कुटुंबात सासू बाहेरच्या दरवाजांत बसली होती, व सून आंतल्या दरवाज्यांत बसली होती. उदायी इकडे येऊन सासूच्या कानांत धर्मोपदेश करून सुनेपाशीं गेला; तिलाहि त्यानें तसाच कानाशीं धर्मोपदेश केला. तेव्हां त्या उभयतांना परस्परांविषयीं संशय उत्पन्न झाला; व उदायी कानाशीं काय बोलत होता हें परस्परांनी परस्परांना विचारलें. त्यानें नुस्ता धर्मोपदेश केला हें समजून आल्यावर त्या दोघीहि त्यावर टीका करूं लागल्या; व ही गोष्ट अनुक्रमें भगवंताला समजली. त्यानें उदायीचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

“जो भिक्षु स्त्रीला धर्मोपदेश करील त्याला पाचित्तिय होतें.”

त्या काळीं उपासिका भिक्षूंना पाहून, आपणाला धर्मोपदेश करा अशी विनंती करीत असत. भिक्षु म्हणत, ‘असें करणें योग्य नव्हें.’ त्या म्हणत, ‘निदान पांच सहा वाक्यांनी तरी धर्मोपदेश करा.’ परंतु भिक्षु त्यांचें म्हणणे ऐकेनात. तेव्हां त्या भिक्षूंवर टीका करूं लागल्या. ही गोष्ट भगवंताला समजली तेव्हां त्यानें बायकांना पांच सहा वाक्यांनी उपदेश करण्याची भिक्षूंना परवानगी दिली, व वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

“जो भिक्षु स्त्रीला पांच सहा वाक्यांपेक्षां जास्त धर्मोपदेश करील त्याला पाचित्तिय होतें”

त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु भगवंतानें अशी परवानगी दिली आहे म्हणून एकाद्या अजाण मनुष्याला स्त्रीजवळ बसून पुष्कळ धर्मोपदेश करीत असत. ही गोष्ट भगवंताला समजली, तेव्हां त्यांचा निषेध करून त्यानें वरील नियमांत फेरफार केला. तो असा:-

जो भिक्षु सुज्ञ पुरुष हजर असल्याशिवाय स्त्रीला पांच सहा वाक्यांपलिकडे धर्मोपदेश करील त्याला पाचित्तिय होतें।।७।।

५७. बुद्ध भगवान् वैशली येथें महावनांत कूटागारशालेंत रहात होता. त्या काळीं कांहीं नाणावलेले भिक्षु वल्गुमुदा नदीच्या तीरावर वर्षाकाळीं राहिले.(सर्व मजकूर चवथ्या कलमाप्रमाणें समजावा.) वर्षाकाळानंतर जेव्हां ते भगवंताच्या दर्शनाला आले तेव्हां त्यांनीं परस्परांना लोकोत्तर धर्माचें ज्ञान झाल्याचें गृहस्थांना सांगितलें. ही गोष्ट भगवंताला समजली. पण त्यापैकीं बर्‍याच जणांना खरोखरच लोकोत्तर धर्माचें ज्ञान झालें होतें. तरी पण त्यांचा निषेध करून भगवंतानें भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु अनुपसंपन्नाला लोकोत्तर धर्म प्राप्त झाल्याचें सांगेल-गोष्ट खरी असल्यास-त्याला पाचित्तिय होतें।।८।।

५८. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं उपनंद शाक्यपुत्र षड्वर्गीय भिक्षूंबरोबर भांडला होता. त्याच्या हातून चेतनायुक्त वीर्यपात करण्याची आपत्ति घडली होती, व संघानें त्याला त्याबद्दल परिवास दिला होता. तो अशा स्थितींत असतां श्रावस्तींत एका पूगाकडून संघाला आमंत्रण होतें. तेथें उपनंद एका बाजूला बसला. षड्वर्गीय भिक्षु त्या पूगांतील पुरुषांना म्हणाले, “या उपनंदाचा तुम्ही बराच मान ठेवतां, पण हा ज्या(..) दायकांनी दिलेली भिक्षा ग्रहण करतो, त्याच ‘हातानें वीर्यपात करीत असतो. ह्या अपराधाबद्दल संघानें त्याला परिवास दिला आहे; व म्हणून तो (..) शेवटीं बसला आहे.” हे त्यांचें भाषण सज्जन भिक्षूंना आवडलें नाहीं; व भगवंताला जेव्हां ही गोष्ट समजली तेव्हां त्यानें षड्वर्गियांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षू संघाच्या संमतीशिवाय दुसर्‍या भिक्षूची संघदिशेष आपत्ति अनुपसंपन्नाला सांगेल, त्याला पाचित्तिय होतें ।।९।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel