गृहस्थापाशीं याचना करून आपणासाठीं कोणाच्या मालकीची नव्हे अशी कुटी करूवूं इच्छिणार्‍या भिक्षूनें ती प्रमाणांत करवावी. तिचें प्रमाण येणेंप्रमाणें:- लांबी १२ सुगतवितस्ति,१ व रुंदी सात सुगतवितस्ति. जागा दाखविण्यासाठीं भिक्षूंला न्यावें, त्यांनी अनारंभ आणि सपरिक्रमण अशी दाखवावी. सारंभ आणि अपरिक्रमण जागेंत गृहस्थाची याचना करून कुटी करविली तर, किंवा जागा दाखविण्यासाठीं भिक्षूंना नेलें नाहीं तर, किंवा प्रमामाबाहेर कुटी बांधली तर संघादिशेष होतो ।।६।।
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- एक सुगतवितस्ति म्हणजे दीड हात असें टीकाकाराचें म्हणणें आहे.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जागा दाखविण्यासाठीं भिक्षु न्यावे ते असे: कुटी करविणार्‍या भिक्षूनें जागा साफ करून संघापाशीं येऊन भिक्षूंला तिकडे पाठविण्यास याचना करावी. सर्व संघाला जागा पाहणें शक्य असल्यास संघाने जागा पहावी. शक्य नसल्यास जागा पहाण्यासाठीं योग्य भिक्षूंची निवड करावी. संघाच्या ठरावाप्रमाणें त्या भिक्षूंनीं ती जागा अनारंभ आणि सपरिक्रमण असेल तर पहावी. नसल्यास, तिकडे कुटी बांधूं नकोस असें त्या भिक्षूला सांगावें. जागा योग्य ठरल्यास संघाच्या परवानगीनें तेथें कुटी बांधावी.

सारंभ म्हणजे जेथें मुंग्यांचें किंवा वाळवीचें वारूळ असतें; उंदरांची, सर्पाचीं, विंचवांची आणि घोणींची बिळें असतात; जेथें हत्ती, घोडे, सिंह, वाघ, अस्वल, तरस ह्यांची किंवा इतर प्राण्यांची रहाण्याची जागा असते; जें स्थान शेताजवळ, अपराध्यांला दंड देण्याच्या जागेजवळ, स्मशानाजवळ, उद्यानाजवळ, राजाची जागा, हस्तिशाला, अश्वशाला, कारागार, दारूचें दुकान, कसाईखाना, गल्ली, सभास्थान, घांट ह्यांच्या जवळ असतें तें सारंभ जाणावें.

अपरिक्रमण म्हणजे जेथें गाडा जाऊं शकत नाहीं व जेथें झोंपडीभोंवतीं शाकारणारा मनुष्य शिडी घेऊन जाऊं शकत नाहीं तें.

११. बुद्ध भगवान् कौशाम्बी येथें घोषितारामांत रहात होता. त्या काळीं छन्न भिक्षूच्या उपस्थायक गृहस्थानें त्याच्यासाठीं एक विहार बांधण्याचें ठरविलें. छन्नानें विहाराची जागा साफ करवीत असतां तेथें सर्व लोकांना पूज्य असा एक वृक्ष होता तो तोडविला. त्यायोगें लोक त्याची निंदा करूं लागले. भगवंताला हें वर्तमान समजले. तेव्हां त्यानें छन्न भिक्षूचा निषेध करून भिक्षूचा निषेध करून भिक्षूंला खालील नियम घालून दिला:-

आपणासाठीं गृहस्थाच्या मालकीचा मोठा विहार बांधविणार्‍या भिक्षूनें जागा दाखविण्यासाठीं भिक्षु न्यावे. त्यानें अनाम्भ व सपरिक्रमण अशी जागा दाखवावी. सारंभ व अपरिक्रमण अशा जागेंत जो भिक्षु मोठा विहार करवील, किंवा जागा दाखविण्यासाठीं भिक्षु नेणार नाहीं त्याला संघादिशेष होतो ।।७।।

१२.बुद्ध भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या काळीं दब्ब मल्लपुत्र भिक्षूनें सात वर्षांचा असतांना अर्हत् पद् मिळविलें होतें. पुढें वयांत आल्यावर त्याच्या मनांत संघाच्या शयनासनाची व भोजनाची व्यवस्था आपल्या हातीं घेण्याचा विचार आला, तो त्यानें भगवंताला कळविला. भगवंतानें संघाला सांगून ह्या कामीं त्यांची नेमणूक करविली. तो त्या त्या भिक्षूंच्या योग्यतेप्रमाणें तेथें तेथें त्यांची निजण्याची सोय करीत असे; गृहस्थांनीं नियमित भिक्षूंना आमंत्रण केलें असतां अनुक्रमें भिक्षूंना तेथें पाठवीत असे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel