६५
नकुलपिता गृहपति

“दुसर्‍याचें समाधान करणार्‍या उपासकांत नकुलपिता गृहपति श्रेष्ठ आहे.”

याचा जन्म भर्गदेशांत सुंसुमार नगरांत एका श्रेष्ठीच्या कुळांत झाला. भगवान् त्या नगराला गेला असतां नकुलपित्याची आणि त्याच्या स्त्रीची त्यावर अत्यंत श्रद्धा जडली. तीं दोघें भगवंताला आपला पुत्र म्हणत असत, व तसेंच त्याच्यावर प्रेम करीत असत. तरी बुद्ध भगवंतानें आरंभीं धर्मोपदेश करून त्यांचा स्नेह नष्ट करण्याचा प्रयत्‍न केला नाही. हळु हळु त्यांच्या त्यानांच विचार करूं देऊन ताळ्यावर येऊं दिलें; व नंतर धर्मोपदेशानें त्यांना स्त्रोतआपत्तिफल मिळवून देण्यास मदत केली.

नकुलपिता आणि नकुलमाता ह्या दोघांचें परस्परांवर इतकें प्रेम होतें कीं, त्यांची चरित्रें अलगअलग लिहितां येणें शक्य नाहीं. त्यांचीं शरीरें भिन्न होतीं, तरी प्रपंचांतील राहणी एक होती, असें म्हटलें पाहिजे. अंगुत्तरनिकायाच्या चतुक्क निपातांत त्यांच्या संबंधानें एक सुत्त (नं.५५) आहे, त्याचा सारांश असा :-

एके समयीं भगवान् भर्गदेशांत सुंसुमारगिर येथें भेसकलावनांत रहात होता. एके दिवशीं सकाळीं भगवान् नकुलपित्याच्या घरीं जाऊन तेथें त्याच्यासाठीं मांडलेल्या आसनावर बसला. नकुलपिता आणि नकुलमाता हीं दोघें भगवंताला नमस्कार करून एका बाजूला बसलीं आणि नकुलपिता भगवंताला म्हणाला, “भदंत, नकुलमातेचें लग्न माझ्याबरोबर अत्यंत तरुणपणी झालें; आणि तेव्हांपासून तिला सोडून माझें मन कधींहि दुसर्‍या ठिकाणीं गेल्याचें मला आठवत नाहीं. मग शरीरानें व्यभिचार घडल्याची गोष्ट सांगावयासच नको. आतां आमची अशी इच्छा आहे कीं, याच जन्मीं नव्हे, तर पुढच्या जन्मींहि आमचें असेंच सख्य कायम रहावें.”

नकुलमाता म्हणाली, “भदंत, माझें नकुलपित्यांशीं अत्यंत तरुणपणीं लग्न झालें; आणि तेव्हांपासून त्याला सोडून माझें मन कधींहि दुसर्‍या ठिकाणी गेल्याचें मला आठवत नाहीं. मग शरीरानें व्यभिचार घडल्याची गोष्टच सांगावयास नको. आतां आमची अशी इच्छा आहे कीं, याच जन्मीं नव्हे तर पुढल्या जन्मींहि आमचें असेंच सख्य कायम रहावें.”

भगवान् म्हणाला, “अशी जर तुमची इच्छा आहे, तर तुम्ही दोघांनीं समानश्रद्ध, समानशील, समानत्याग व समानप्रज्ञ होण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. असें केल्यास इहलोकीं आणि परलोकीं तुमचें सख्य कायम राहील.”

दुसर्‍या एका वेळीं बुद्ध भगवान् सुंसुमारगिर येथें रहात असतां नकुलपिता फार आजारी पडला. तेव्हां नकुलमाता त्याला म्हणाली, “बा गृहपति, तुला जर मरण यावयाचें असेल तर तें प्रपंचासक्त होऊन येऊं देऊं नकोस. अशा रितीनें मरण येणें निंद्य आहे, असे भगवंतानें म्हटलें आहे. कदाचित् तुला अशी शंका येई कीं, तुझ्या पश्चात् मीं मुलांचें संगोपन करूं शकणार नाहीं, प्रपंचाचा गाडा हांकूं शकणार नाहीं. पण तूं असें समजूं नकोस. मला सूत कांततां येतें व लोंकर तयार करतां येते. ह्यायोगें मी आमच्या मुलांचें पालन करूं शकेन. म्हणून प्रपंचाच्या तळमळीनें तुला मरण येऊं देऊं नकोस.

“दुसरी तुला अशी शंका येईल कीं, तुझ्या पश्चात् मी पुनर्विवाह करीन. परंतु तीहि ठीक नाहीं. आज सोळा वर्षें मी गृहस्थब्रह्मचर्य १  पाळीत आहें, हें तुला ठाऊक आहेच. तेव्हां ही शंका सोडून शांतपणें तुला मरण येऊं दे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- गृहस्थब्रह्मचर्य म्हणजे उपोसथाच्या दिवशीं ब्रह्मचर्यव्रतानें राहून सर्व नियम पाळणें.
------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel