या सुत्तांत दीडशें शिक्षापदांचाच उल्लेख आला आहे. त्यावर मनोरथपूरणीकाराचें-बुद्धघोषाचार्यांचें-म्हणणें असें कीं, त्या वेळीं भगवंतानें दीडशेंच नियम केले होते; बाकी मगाहून केले. परंतु या स्पष्टीकरणाची कांहीं जरूर दिसत नाहीं. दोन अनियत यांनां स्वतंत्र नियम म्हणतां येत नाही. व ७५ सेखिय पाळले नाहींत तर पाचित्तियासारखी आपत्ति होत नाहीं. तेव्हां ते वजा जातां बाकी दीडशेंच नियम राहतात, व अंगुत्तरनिकाय लिहिला गेला त्या वेळीं एवढ्याच नियमांस पातिमोक्ख म्हणत असत. त्या काळानंतर आणि बुद्धघोषाच्या काळापूर्वी मूळच्या पातिमोक्खांत ७५ सेखियांची भर पडली, एवढेंच नव्हे तर त्या दीडशें नियमांच्या पायावर विनयग्रंथाची अवाढव्य इमारत उभारली गेली. अर्थांत् या नियमाच्या पूर्वपीठिका विनय ग्रंथांत वर्णिल्या आहेत त्या सर्वथैव ऐतिहासिक आहेत असे धरून चालतां कामा नये. पाराजिकासारख्या नियमांच्या पूर्वपीठिका आचार्यपरंपरनेंने चालत आल्या असणें शक्य आहे, परंतु इतर नियमांच्या पूर्वपीठिका विनयग्रंथ लिहिला गेला त्या वेळीं लेखकाला किंवा लेखकांनां माहीत नसाव्या व त्यांनी त्या नवीनच रचल्या असाव्या.

सरासरी ख्रिस्ती शतकाच्या आरंभापासून बौद्धवाङ्‌मयाची विलक्षण क्रांति झाल्याचें दिसून येतें. मूळच्या सुत्तांत पुष्कळशीं सुत्तें आनंदानें, सारिपुत्तानें अथवा अशाच दुसर्‍या प्रसिद्ध महाश्रावकांनीं उपदेशिलेलीं आढळतात. परंतु इ. सनानंतरच्या ग्रंथांतून सर्व प्रकरणांचा संबंध खुद्द बुद्धाशीं लावण्याचा प्रयत्न दिसून येतो. उदाहरणार्थ जातकाच्या गोष्टी घ्या. प्रत्येक गोष्ट बुद्धानेंच सांगितली व ती त्याच्या पूर्वजन्मींची होती असें वर्णन जातक अट्ठथेंत सांपडतें. अभिधर्माचीं सात प्रकरणेंहि बुद्ध भगवंतानेंच उपदेशिलीं असें सिद्ध करण्याचा कट्ठकथाकारानें विलक्षण प्रयत्न केला आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला असतां विनयग्रंथ सर्व अट्ठकथांचा पूर्वगामी आहे अशी माझी समजूत झाली आहे, आणि त्यांतील गोष्टींचा इतिहासाच्या कामीं उपयोग करतांनां मोठी सावधगिरी ठेविली पाहिजे, असें मला वाटतें.

येथें असा प्रश्न उपस्थित होईल कीं, जर या गोष्टीचें ऐतिहासिक महत्त्व नाहीं तर त्यांचा या ग्रंथांत संग्रह कशाला केला? याचें उत्तर हें कीं, पूर्वपीठिकांशिवाय पुष्कळशा नियमांचे स्पष्टीकरण होणें कठीण आहे. कांहीं नियमांच्या पूर्वपीठिका देऊन कांहींच्या दिल्या नसत्या तर तेंहि योग्य झालें नसतें. म्हणून सेखिय खेरीज करून बाकी सर्व नियमांच्या संक्षेपानें पूर्वपीठिका दिल्या आहेत. वाचकांनीं त्या पूर्वपीठिकांनां ऐतिहासिक महत्त्व न देतां केवळ नियम समजावून घेण्याकडेच त्यांचा उपयोग करावा. सरासरी इ. सनाच्या आरंभाला बैद्धसंघाची घटना कशी होती, त्या संघांत कोणत्या वस्तूला महत्त्व देण्यांत येत होतें व संघशक्ति वाढविण्याचा कसा प्रयत्न करण्यांत येत होता हें समजण्यापुरताच पहिल्या दोन भागांचा उपयोग वाचकांस होणार आहे. तिसर्‍या भागांत जीं महाश्रावकांची चरित्रें दिलीं आहेत त्यांत दंतकथांची बरीच भेसळ आहे, तथापि बुद्ध भगवंताच्या हयातींत भिक्षु आणि गृहस्थ कशा प्रकारें रहात असत याची चांगली कल्पना या चरित्रांवरून होईल. जेथें शक्य हेतें तेथें मूळ सुत्तांचा आधार घेऊन तद्वारा या त्या व्यक्तीचें चरित्र वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. कार्ली, वेरूळ वगैरे लेण्यांत व सांची वगैरे स्तूपांच्या आसपास सांपडणार्‍या बौद्धसंघांतील व्यक्तींची कोरींव चित्रें जाणण्याला व त्या चित्रकलेचा अर्थ समजण्याला, आणि फाह्यान, ह्युएन्त्सांग वगैरे चिनी प्रवाशांचीं प्रवासवर्णन वाचतांना या भागाची वाचकांला चांगली मदत होईल अशी मी आशा बाळगतों.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel