Bookstruck

भाग २ रा 37

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१०३. बुद्ध भगवान् कौशांबी येथें घोषितारामांत रहात होता. त्या काळीं छन्न भिक्षु व्यवस्थितपणें वागत नसे. त्याला भिक्षु, हें करणें योग्य नाहीं, तें करणें योग्य असें शिकवीत. पण तो हट्टानें तसाच वागे. सज्जन भिक्षूंना ही गोष्ट आवडली नाहीं...आणि भगवंतानें नियम घालून दिला तो असा:-

अनादर केला असतां पाचित्तिय होतें ।।५४।।

१०४. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं षड्वर्गीय भिक्षु सप्तदशवर्गीय भिक्षूंना भिववीत असत. ते घाबरून रडत असत ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं... आणि भगवंतानें नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु भिक्षुला भिववील त्याला पाचित्तिय होतें ।।५५।।

१०५. बुद्ध भगवान् भग्ग देशांत सुंसुमार येथें भेसकळा वनात रहात होता. त्या काळीं भिक्षु हिवाळ्यांत आगटी पेटवून त्यांत त्यात एक मोठें लांकूड टाकून जवळपास शेकत बसले. त्या लांकडाच्या पोकळींत एक मोठा कृष्ण सर्प होता. तो बाहेर पडला व भिक्षूंच्या मागें लागला. भिक्षु इतस्तत: पळूं लागले. ही गोष्ट सज्जन भिक्षूंना आवडली नाहीं...आणि भगवंतानें नियम केला तो असा:

“जो भिक्षु शेकण्याच्या उद्देशानें आग पेटवील किंवा पेटवावयास लावील त्याला पाचित्तिय होतें.”

ह्या नियमांत दोन प्रसंगीं फेरफार करण्यांत आला तो असा:-

जो भिक्षु तशाच कारणांवांचून शेकण्याच्या उद्देशानें आग पेटवील किंवा पेटवावयास लावील,त्याला पाचित्तिय होतें ।।५६।।

भिक्षु आजारी असला तर, दिवा पेटवावयाचा असला तर, अग्निशाळेंत आग तयार करवावयाची असली तर, अशा कारणास्तव आग पेटविणें किंवा आग पेटवावयास लावणें योग्य आहे. त्यामुळें आपत्ति होत नाहीं.

१०६. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या काळीं भिक्षु तपोदांत१ स्नान करीत असत. एक दिवशीं भिक्षूंच्या स्नानाच्या वेळीं बिंबिसार राजा तेथें आला. पण भिक्षु स्नान करीत असल्यामुळें त्याला स्नान करण्यास बराच वेळ थांबावें लागलें. शेवटीं संध्याकाळीं फार उशीरां त्यानें स्नान केलें, व शहराचे दरवाजे बंद झाल्यामुळें रात्र नगरा बाहेर घालवून सकाळीं तो भगवान् होता तेथें आला. भगवंतानें इतक्या सकाळीं येण्याचें कारण विचारलें असतां राजानें घडलेली गोष्ट त्याला सांगितली. भगवंतानें त्याला धर्मोपदेश केला; आणि तो तेथून निघून गेला. नंतर ह्या प्रकरणीं भगवंतानें भिक्षूंना गोळा करून वारंवार स्नान करणार्‍या भिक्षूंचा निषेध केला, आणि नियम घालून दिला तो असा:-

“जो भिक्षु एखदां स्नान केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आंत दुसर्‍यांदा स्नान करील, त्याला पाचित्तिय होतें.”

ह्या नियमांत वेळोवेळीं फेरफार करण्यांत आला तो असा:-
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- ऊन पाण्याचा झरा. हा अद्यापि आहे, व ह्या झर्‍याच्या कुंडांत स्नान करण्यासाठीं आसपासच्या गांवचे पुष्कळ लोक येतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जो भिक्षु एकदां स्नान केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आंत प्रसंगावांचून दुसर्‍यांदा स्नान करील. त्याला पाचित्तिय होतें. उन्हाळ्याचा शेवटचा दीड महिना व पावसाळ्याचा पहिला महिना मिळून अडीच महिने उष्णकाळ, आजारी असणें, मेहनत केल्यानंतर, प्रवासांत असणें, वातवृष्टींत सांपडणे, हा ह्या बाबतीत प्रसंग जाणावा ।।५७।।
« PreviousChapter ListNext »