६३
शूर अंबट्ठ

“ज्ञानयुक्त श्रद्धा ठेवणार्‍या उपासकांत शूर अंबट्ठ आहे.”

ह्याचा जन्म श्रावस्तींतील एका श्रेष्ठिकुलांत झाला. वयांत आल्यावर तो दुसर्‍या पंथाच्या श्रमणाच्या नादीं लागला होता; पण पुढें भगवंताचा धर्म ऐकून बुद्धोपासक झाला. तेव्हां हा आपल्या हातचा सुटून जातो, असें वाटून बुद्धाचें रूप घेऊन मार तेथें आला. बुद्ध भगवान् परत आला असें वाटून शूरानें त्याचा आदरसत्कार केला, व येण्याचें कारण विचारलें. बुद्धरूपी मार म्हणाला, “मी तुला पंचस्कंध अनित्य आहेत असें सांगितलें. पण तें बरोबर नाहीं, हें माझ्या लक्ष्यांत आल्यामुळें मी पुन्हां येथें आलों. कांहीं स्कंध ‘अनित्य आहेत, हें खरें; पण कांहीं स्कंध नित्यहि आहेत, हें विसरतां कामा नये.”
बुद्धवचनांत असा फेरफार होणें शक्य नाहीं, हें जाणून शूर म्हणाला, “तूं बुद्ध नाहींस; पण मार आहेस.”

आर्यश्रावकाचे हे शब्द कानीं पडतांच माराला आपणावर जणूं काय परशुप्रहार झाल्यासारखें वाटलें. आणि भयभीत होऊन तो म्हणाला, “होय, मी मार आहें.”

शूर :- अरे मारा, तुझ्यासारखें शेकडो आणि हजारो मार आले तरी माझें मन चलबिचल करूं शकणार नाहींत. तेव्हां तूं येथें उभा राहूं नकोस.

असें म्हणून अंबट्ठानें चिटकी वाजविली, व मार स्तब्ध होऊन तेथेंच अन्तर्धान पावला.

ही गोष्ट केवळ मनोरथपूरणींत सांपडते. ही काल्पनिक असली तरी मनोवेधक आहे, एवढ्याचसाठीं येथें दिली आहे.

६४
जीवक कौमारभृत्य

“वैयक्तिक श्रद्धा ठेवणार्‍या उपासकांत जीवक कौमारमृत्य श्रेष्ठ आहे.”

ह्याची समग्र गोष्ट पहिल्या भागांत (कलम ६०-६२) आलीच आहे. राजगृह येथें यानें एक आम्रवन बुद्ध भगवंताला आणि भिक्षुसंघाला राहण्यासाठीं दिलें होतें. परिनिर्वाणापूर्वीं भगवान् राजगृहाला आला असतां अजातशत्रु राजाला त्याच्या भेटीला आणण्याचा प्रयत्‍न जीवकानेंच केल्याचें सामञ्ञफलसुत्तावरून दिसून येतें. परंतु जीवकाची सारी श्रद्धा व्यक्तिगत होती, म्हणजे धर्म किंवा संघ ह्याविषयीं त्याचें निस्सीम प्रेम नव्हतें. म्हणून वैयक्तिक श्रद्धा ठेवणार्‍या उपासकांत त्याला अग्रस्थान देण्यांत आलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel