२१
राष्ट्रपाल

“श्रद्धेनें प्रव्रज्या घेतलेल्या भिक्षुश्रावकांत राष्ट्रपाल श्रेष्ठ आहे.”

ह्याची गोष्ट मज्झिमनिकायांतील रट्ठपाल सुत्तांत आली असून तिचाच अनुवाद मनोरथपूरणींत केला आहे. रट्ठपालसुत्ताचा सारांश असा :-

भगवान् बुद्ध कुरुराष्ट्रांत प्रवास करीत मोठ्या भिक्षुसंघासह थुल्लकोद्वित नांवाच्या कुरूंच्या शहरापाशीं आला. तेथील ब्राह्मणांनीं त्याची कीर्ति ऐकून ते सर्व त्याच्या दर्शनाला गेले. कोणी त्याला नमस्कार करून, कोणी कुशल प्रश्न विचारून, कोणी अंजलि करून, कोणी आपलें नामगोत्र सांगून व कोणी मुकाट्यानेंच जाऊन एका बाजूला बसले. त्या ब्राह्मणांना भगवंतानें जेव्हां धर्मोपदेश केला तेव्हां राष्ट्रापालहि तेथें होता. त्याच्या मनावर एकदम परिणाम झाला, व प्रव्रज्या घेण्याचा आपला विचार त्यानें भगवंताला कळविला. पण त्याच्या आईबापांची परवानगी नसल्यामुळें त्याला प्रव्रज्या देण्याचें भगवंतानें नाकारलें. तेव्हां घरीं जाऊन प्रव्रज्या घेण्यास परवानगीं देण्याविषयीं आपल्या आईबापांशीं तो हट्ट धरून बसला. त्यांनीं त्याची पुष्कळ प्रकारें समजूत घातली, व आपण जिवंत असतां त्याला परवानगी देतां येणें शक्य नाहीं असें सांगितलें. ‘एकतर परवानगी किंवा दुसरें मरण,’ असें म्हणून राष्ट्रपाल तेथेंच जमिनीवर पडला, व अन्नग्रहण करणें त्यानें वर्ज केलें. त्याच्या सख्यासोयर्‍यांनींहि त्याची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्‍न केला. पण राष्ट्रपालाच्या दृढ निश्चयापुढें त्यांचा कांहीं इलाज चालेना. शेवटीं आईबापांनीं परवानगी देऊन कसें बसें त्याचें एकदाचें समाधान केलें; व अन्न खाऊन अंगी थोडें बळ आल्याबरोबर भगवंतापाशीं जाऊन त्यानें प्रव्रज्या घेतली. दोन आठवड्यांनीं भगवान् त्याला बरोबर घेऊन भिक्षुसंघासह श्रावस्तीला आला.

तेथें रहात असतां एकान्तांत राहून राष्ट्रपालानें मोठ्या प्रयत्‍नानें अर्हत्पद मिळविलें, व भगवंताजवळ जाऊन आईबापांस भेटण्याची परवानगी मागितली. आर्यमार्गांत त्याची झालेली उन्नति पाहून भगवंतानें त्याला स्वदेशीं जाण्यास परवानगी दिली. भिक्षाटनासाठीं जेव्हां तो थुल्लकोट्ठित शहरांत शिरला, तेव्हां त्याचा पिता मधल्या दिवाणखान्यांत हजामतीला १ (१- मूळ शब्द ‘उल्लिखापेति.’ त्यावर टीका-कप्पकेन केसे अपहरापेति. परंतु दुसरा असाहि अर्थ होऊं शकेल कीं, मधल्या दिवाणखान्यांत चित्रकर्म करवीत होता. येथें टीकेला अनुसरूनच अर्थ केला आहे. हजामतीच्या अर्थी हा शब्द वापरण्यांत आलेला दुसर्‍या कोठें आढळला नाहीं.) बसला होता. राष्ट्रपालाला पाहून ‘ह्या मुंडकांनीं ह्या श्रमणकांनीं आमच्या आवडत्या एकुलत्या एका मुलाला भिक्षु केलें’ असें तो म्हणाला. अर्थात् राष्ट्रपालाला आपल्या पित्याच्या घरीं शिव्यांशिवाय दुसरा पदार्थ मिळाला नाहीं. तो परत जाण्याला निघाला तेव्हां त्याच्या घरची एक दासी कुल्माष २ (२- कुल्माष म्हणजे यवांचा केलेला पदार्थ ) नांवाचें शिळें अन्न फेकण्यासाठीं बाहेर आली होती. तिला पाहून राष्ट्रपाल म्हणाला, “भगिनी, हें अन्न फेकावयाचें असेल तर माझ्या पात्रांतच तें घाल.” तें तिनें त्याच्या पात्रांत घातलें, व इतक्यांत तिची खात्री पटली कीं, हाच आपल्या मालकाचा पुत्र आहे. ताबडतोब हें वर्तमान तिनें आपल्या यजमानिणीला सांगितलें. ती म्हणाली, “हें वर्तमान जर खरें असेल तर तुला मी दास्यांतून मोकळें करीन.” असें म्हणून तिनें नवर्‍याला राष्ट्रपालाच्या शोधासाठीं पाठविलें.

राष्ट्रपाल एका भिंतीच्या सावलींत बसून तें शिळें अन्न खात होता. तें पाहून त्याचा पिता म्हणाला, “बा राष्ट्रपाला, हें शिळें अन्न तूं कसे खातोस? तुझें घर तुला नाहीं काय?”

रा० :-  गृहपति, आम्हांला आमचें घर कुठलें? आम्हीं तें कधींच सोडून दिलें आहे. आपल्या घरीं गेलों होतों खरा; परंतु तेथें शिव्यांशिवाय दुसरें कांहीं मला मिळालें नाहीं.

पित्यानें त्याला घरीं येण्याचा आग्रह केला; पण त्या दिवशीं जेवण झालें असल्यामुळे त्यानें आमंत्रण न स्वीकारतां तें दुसर्‍या दिवशीं स्वीकारलें. राष्ट्रपाल सकाळच्या प्रहरीं भोजनासाठीं आला, तेव्हां पित्यानें आपली सर्व धनदौलत दाखवून त्याला प्रपंचांत आणण्याचा पुष्कळ प्रयत्‍न करून पाहिला. शेवटीं त्याच्या बायकांकडून १ (१- ह्या किती होत्या, हें मूळग्रंथांत किंवा अट्ठकथेंत सांगितलें नाहीं. अट्ठकथेंत पुष्कळ नर्तकी होत्या, असें दंतकथात्मक वर्णन आहे.) त्याचे पाय धरावयास लावले. परंतु ह्या सर्वांचा परिणाम राष्ट्रपालाच्या मनावर मुळींच झाला नाहीं. तो म्हणाला, “मला उपद्रव कशाल देतां?  जर जेवावयाला घालावयाचें असेल तर घाला.” पित्यानें त्याला उत्तम प्रकारचे भोजन दिलें. भोजनोत्तर तो आपल्या रहाण्याच्या जागीं - कौरव्यराजाच्या उद्यानांत - गेला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel