३६
नंदक

“भिक्षुणींना उपदेश करणार्‍या भिक्षुश्रावकांत नंदक श्रेष्ठ आहे.”

हा श्रावस्ती येथें चांगल्या कुटुंबांत जन्मला, व पुढें वयांत आल्यावर भिक्षु झाला. हा भिक्षुणींना अत्यंत निःस्पृहपणें उपदेश करीत असे. ह्यासंबंधानें नंदकोवाद नांवाचें एक सुत्त मज्झिमनिकायांत आहेच. ह्याशिवाय भगवान् ह्याच्या उपदेशाला किती महत्त्व देत असे, ह्याचा एक दाखला अंगुत्तरनिकायाच्या नवक निपातांत सांपडतो :-

एके वेळीं नंदक श्रावस्ती येथें अनाथपिंडिकाच्या आरामांतील उपस्थानशाळेंत भिक्षूंला उपदेश करीत बसला होता. भगवान् तेथें आला, व त्याचा उपदेश संपेपर्यंत दरवाजाबाहेर उभा राहिला. नंतर त्यानें हळूच दार ठोठावलें. भिक्षूंनीं दार उघडलें, तेव्हां उपस्थानशाळेंत जाऊन भगवान् तेथें मांडलेल्या आसनावर बसला आणि म्हणाला, “नंदक, तूं भिक्षूंला बराच लांब उपदेश केलास. दाराबाहेर उभा राहून माझी पाठ दुखूं लागली.”

नंदक म्हणाला, “भदंत, आपण बाहेर उभे होतां, हें जर मला समजलें असतें, तर मला इतका वेळ उपदेश करण्यास सुचलेंच नसतें.”

नंदकाला ओशाळलेला पाहून भगवान् म्हणाला, “नंदक, तूं सज्जनाला शोभण्यासारखेंच आचरण केलेंस. तुझ्यासारख्या चांगल्या भिक्षूंला एकत्र जमलां असतां ह्या दोनच गोष्टी शोभतात - एक तर धार्मिक संभाषण किंवा दुसरें आर्य मौन.”

३७
नंद


“इंद्रियांचें रक्षण करणार्‍या भिक्षुश्रावकांत नंद श्रेष्ठ आहे.”

हा महाप्रजापती गोतमीचा मुलगा; भगवंताचा सावत्र - आणि मावसभाऊ. त्रिपिटकांतच ह्याच्या संबंधानें बरीच माहिती मिळते. उदानवग्गांत ह्याची माहिती आहे तिचा सारांश असा :-

“हा भिक्षु झाला होता तरी आपल्या स्त्रीचें स्मरण करून अत्यंत दुःख पावत होता. तेव्हां भगवंतानें त्याला ऋद्धिबळानें देवलोकीं नेऊन अप्सरा दाखविल्या. मेल्यावर आपणाला अप्सरांचा लाभ होईल, ह्या बुद्धिनें बायकोचा नाद सोडून तो नीटपणें ब्रह्मचर्य आचरूं लागला. पण ही गोष्ट भिक्षूंला समजली, तेव्हां ते म्हणूं लागले कीं, नंद केवळ चाकर आहे; वेतन मिळावें म्हणून ब्रह्मचर्य आचरतो. त्या योगें त्याला वैराग्य उत्पन्न झालें, व तो निर्वाणपदाला पावला.”  निदानवग्गांतील भिक्खुसंयुत्तांत ह्या संबंधानें मजकूर आहे. त्याचा सारांश :-

“भगवान् बुद्ध श्रावस्ती येथें रहात होता. त्या वेळीं आयुष्मान नंद - भगवंताचा मावसभाऊ - चांगलीं इस्तरी केलेलीं चीवरें नेसून डोळ्यांत अंजन घालून व स्वच्छ पात्र घेऊन भगवंताजवळ गेला. त्याला भगवान् म्हणाला, “नंद तुला, श्रद्धापूर्वक घर सोडून प्रव्रज्या घेतलेल्या कुलपुत्राला अशा रितीनें वागणें योग्य नाहीं. आरण्यक, पिंडपातिक आणि पांसुकूलिक होऊन कामोपभोगाविषयीं निःस्पृह होणें, हेंच तुला योग्य आहे.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel