घोसित श्रेष्ठीची आणि त्याची भेट झाली होती, अस नाहीं. तरी परस्परांचा व्यवहार चालू असल्यामुळें त्यंची मैत्री जडली होती. भद्दवतिय श्रेष्ठी आपल्या बायकोला आणि एकुलत्या एक मुलीला घेऊन कौशांबीला जाण्यास निघाला. जिकडे तिकडे दुष्काळ असल्यामुळें वाटेंत त्यांचे फार हाल झाले. मोठ्या प्रयासानें कौशांबी गांठून तीं तिघेंहि एका धर्मशाळेंत उतरलीं. ‘अशा मलिन वेशानें घोसित श्रेष्ठीची भेट घेणें योग्य नाहीं, एक दोन दिवस विश्रांति घेऊन मग तिकडे जावें,’ अशा विचारानें भद्दवतिय तेथेंच राहिला;  पण जेवणाचें  कसें करणार?

त्या वेळीं घोसित श्रेष्ठीनें दुष्काळपीडित लोकांसाठीं अन्नछत्र सुरू केलें होतें. आपल्या बायकोला तिकडे न पाठवितां भद्दवतियानें पिंड आणण्यासाठीं मुलीला पाठविलें. ती एक भांडें घेऊन अन्नछत्राजवळ जाऊन भिडेनें एका बाजूला उभी राहिली. तिला पाहून छत्राच्या व्यवस्थापकाच्या मनांत असा विचार आला कीं, दुसरीं स्त्रीपुरुषें मासे पकडणार्‍या कोळ्यांसारखीं मोठमोठ्यानें आरडाओरड करून पुढेंपुढें होण्याचा प्रयत्‍न करतात. पण ही मुलगी खालीं मान घालून मुकाट्यानें उभी आहे. ही कोणी तरी कुलीन मुलगी असली पाहिजे. तो तिला म्हणाला, “मुली, तूं पुढें कां येत नाहींस?” ती म्हणाली, “गर्दींत माझ्यासारख्या मुलीनें कसें घुसावें?”

तो :- बरें मुली, तुझ्या घरीं किती माणसें आहेत?

ती :- आम्ही तीन माणसें आहोंत.

त्यानें तिला ताबडतोब तीन पिंड दिले; व ते घेऊन ती धर्मशाळेंत आली. मार्गांतील श्रमांनीं आणि उपवासांनीं भद्दवतिय अत्यंत अशक्त झाला होता. त्यांत हें अन्न त्यानें प्रमाणाबाहेर खाल्लें, व त्यामुळें तो त्याच रात्री मरण पावला. दुसर्‍या दिवशीं सामावतीनें अन्नछत्रांत येऊन दोनच पिंड मागून घेतले. पण पतिशोकामुळें आणि शरीराला अत्यंत क्लेश झाल्यामुळें तिची आईहि त्या दिवशीं मरण पावली. तरी भूक राहीना, म्हणून तिसर्‍या दिवशीं अन्नछत्राच्या व्यवस्थापकाकडे जाऊन तिनें एकच पिंड मागितला. तेव्हां तो म्हणाल, “पहिल्या दिवशीं तीन, काल दोन, व आज एकच पिंड मागतेस हें काय?” तिनें त्याला इत्थंभूत वर्तमान सांगितलें. तेव्हां तो म्हणाला, “असें आहे तर तूं माझ्या मालकाचीच मुलगी आहेस, असें समजलें पाहिजे. मलाहि मुलगी नाहीं. चल, आजपासून तूं माझी मुलगी हो.”

पोरक्या सामावतीला कोणीतरी वडील पाहिजेच होता. तेव्हां तिनें ही गोष्ट ताबडतोब कबूल केली, व त्या दिवसापासून ती आपल्या दत्तक बापाच्या घरीं राहूं लगली. दुसर्‍याच दिवशीं ती त्याला म्हणाली, “ह्या अन्नछत्राच्या जागीं एवढी गडबड आणि आरडाओरड होत आहे, ती तुम्हाला बंद करतां येत नाहीं काय?”

तो :- अग मुली, एवढा मोठा जमाव असतो, तेथें गडबड आणि आरडाओरड बंद करणें कसें शक्य आहे?

सा० :- मी तुम्हांला उपाय सांगतें. ह्या जागीं एक मोठें कुंपण तयार करा, व त्याला दोनच दरवाजे ठेवा. मध्यें वाढणार्‍यांनीं अन्नाचीं भांडीं भरून ठेवावीं, व तेथें उभें रहावें. जे पिंडासाठीं येतील, त्यांपैकीं प्रत्येकाला एका दरवाजांतून आंत सोडावें, व पिंड घेऊन दुसर्‍या दरवाजानें बाहेर जाण्यास सांगावें. असें केलें असतां आरडाओरड आणि मरामारी न होतां सर्व काम पार पडेल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel