जो भिक्षु एकीनें वागणार्‍या संघांत फूट पाडण्याचा प्रयत्न करील, किंवा फूट पडेल अशा रितीचें प्रकरण उपस्थित करून हट्ट धरून बसेल, त्याला भिक्षूंनीं म्हणावें कीं, आयुष्मान्, एकीनें वागणार्‍या संघांत फूट पाडण्याचा प्रयत्न करूं नकोस, किंवा फूट पाडण्याजोगें प्रकरण उपस्थित करून हट्ट धरून बसूं नकोस. संघाशीं तुझें ऐक्य असूं दे. कारण एकीनें वागणारा संघ आनंदानें भांडणांवाचून एक ध्येय पुढें ठेवून सुखानें रहातो. असें भिक्षु सांगत असतां जर तो भिक्षु तसाच हट्ट धरील, तर भिक्षूंनी हट्ट सोडण्यासाठीं त्याची त्रिवार समजूत पाडावी. त्रिवार समजूत पाडली असतां जर हट्ट सोडला तर ठीक आहे, जर सोडला नाहीं तर त्याला संघादिशेष होतो ।।१०।।

१५. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या काळीं देवदत्त संघांत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत होता. भिक्षु म्हणाले कीं, देवदत्त अधर्मवादी आहे, अविनयवादी आहे, तो संघांत भेद पाडण्याचा प्रयत्न करतो हें कसें? हें ऐकून कोकालिक आणि समुद्रदत्त भिक्षु त्यांना म्हणाले, “तुम्ही असें म्हणूं नका. देवदत्त धर्मवादी आणि विनयवादी आहे. तो आमच्या विचाराप्रमाणें वागतो. आमचें मत त्याला माहीत आहे, व त्याप्रमाणें तो बोलतो. आम्हाला तें पसंत आहे.” हें जेव्हां भगवंताला समजलें तेव्हां त्यानें त्यांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालू दिला तो असा:-

त्याच (संघांत फूट पाडूं पहाणार्‍या) भिक्षूच्या मताप्रमाणें वागणारे, तंटा उपस्थित करणारे एक, दोन किंवा तीन भिक्षु म्हणतील कीं, आयुष्मन्त, तुम्ही त्या भिक्षूला कांहीं बोलूं नका. तो धर्मवादी आणि विनयवादी आहे. तो आमच्या विचारानें वागतो. आमचें मत तो जाणतो, व त्याप्रमाणें तो बोलतो. आम्हांला तें पसंत आहे. त्या भिक्षूंला इतर भिक्षूंनीं म्हणावें कीं, आयुष्मान्त, तुम्ही असें म्हणूं नका. हा भिक्षु धर्मवादी नाहीं, विनयवादी नाहीं. तुम्हांलाहि संघभेदाची आवड होऊं देऊं नका. संघाशीं तुमचें ऐक्य असूं द्या. कारण एकीनें वागणारा संघ आनंदानें भांडणावांचून एक ध्येय पुढें ठेवून सुखानें राहतो. ह्याप्रमाणें म्हटलें असतां ते भिक्षु तसाच हट्ट धरतील तर इतर भिक्षूंनीं हट्ट सोडण्यासाठीं त्यांची त्रिवार समजूत पाडावी. त्रिवार समजूत पाडली असतां हट्ट सोडला तर ठीक आहे: सोडला नाहीं तर त्यांना संघादिशेष होतो ।।११।।

१६. बुद्ध भगवान् कौशांबी येतें घोषितारामांत रहात होता. त्या काळीं छन्न भिक्षु नीट वागत नसे. भिक्षु त्याला म्हणत कीं, आयुष्मान् छन्न, तूं अशा रीतीनें वागूं नकोस; असें वागणें योग्य नाहीं. तो म्हणे, “तुम्ही मला उपदेश करतां हे कसें? मीच तुम्हांला उपदेश करणें योग्य आहे. बुद्ध आमचा आहे आणि धर्म आमचा आहे. आमच्या मालकानें धर्म शोधून काढला आहे. जसा सोसाट्याचा वारा गवत, काठ्या, पानें, कचरा एकत्र आणतो, किंवा जशी एखादी डोंगरातून वाहणारी नदी शिंपल्या, शेवाळ वगैरे एकत्र करते, त्याप्रमाणें तुम्ही अनेक नांवांचे, अनेक गोत्रांचे, अनेक ज्ञातींचे, अनेक कुळांचे प्रव्रज्या घेऊन एकत्र झालां आहां, तुम्हीं आम्हांला बोलावें हें कसें? मीच तुम्हांला बोलणें योग्य आहे.” ह्यासाठीं भिक्षूंनी छन्नाची निंदा केली; व हें वर्तमान भगवंताला सांगितलें. भगवंतानें त्याचा निषेध करून भिक्षूंनीं छन्नाची निंदा केली; व हें वर्तमान भगवंताला सांगितलें. भगवंतानें त्याचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

भिक्षु स्वाभाविकपणें वाईट बोलणारा असतो. भिक्षूंच्या नियमांसंबंधानें जेव्हां इतर भिक्षु त्याला वहिवाटीस अनुसरून बोलतात तेव्हां तो आपणाला अवचनीय (बोलण्याला अयोग्य) करतो; म्हणतो कीं, मला तुम्ही चांगलें किंवा वाईट असें कांहींच बोलूं नका; माझ्याशीं बोलणें सोडून द्या. त्याला भिक्षूंनीं म्हणावें कीं, आयुष्मान्, तूं आपणाला अवचनीय करूं नकोस. आपणाला वचनीयच कर. तूंहि भिक्षूंला नियमानुसार बोलत जा, व भिक्षुहि तुला नियमानुसार बोलतील. कारण परस्परांना बोलून आणि परस्परांच्या चुकीची दुरुस्ती करून त्या भगवंताच्या संघाची अभिवृद्धि झाली आहे. ह्याप्रमाणें म्हटलें असतां जर तो भिक्षु तसाच हट्ट धरील तर त्याची भिक्षूंनीं त्रिवार हट्ट सोडण्यासाठीं समजूत पाडावी. त्रिवार समजूत पाडली असतां हट्ट सोडला तर ठीक आहे; न सोडला तर, त्याला संघादिशेष होतो ।।१२।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel