“राहुल, आनापानस्मृतीची भावना कर. आनापानस्मृतीची भावना अत्यंत हितावह होते. ती कशी? राहुल, एकादा भिक्षु, अरण्यांत, झाडाखालीं किंवा एकांत स्थळीं जाऊन देह सरळ ठेवून मोठ्या सावधगिरीनें बसतो. तो सावधानपणें आश्वास घेतो व सावधानपणें प्रश्वास सोडतो. दीर्घ आश्वास घेत असला तर, दीर्घ आश्वास घेत आहें असें जाणतो. दीर्घ प्रश्वास सोडीत असला तर, दीर्घ प्रश्वास सोडीत आहें असें जाणतों. र्‍हस्व आश्वास घेत असला तर, र्‍हस्व आश्वास घेत आहें असें जाणतो. र्‍हस्व प्रश्वास सोडीत असला तर, र्‍हस्व प्रश्वास सोडीत आहें असें जाणतो. सर्व देहाची स्मृति ठेवून आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. कायसंस्कार शांत करून आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. प्रीतीचा अनुभव घेऊन आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. सुखाचा अनुभव घेऊन आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. चित्तसंस्कार जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. चित्तसंस्कार शांत करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. चित्त जाणून आश्वास प्रश्वास करण्या अभ्यास करितो. चित्ताला प्रमुदित करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. चित्ताचें समाधान करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. चित्ताला विमुक्त करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. अनित्यता जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. वैराग्य जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. निरोध जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. त्याग जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. अशा प्रकारें जर तूं आनापानस्मृतीची भावना करशील तर अंतकाळच्या आश्वासप्रश्वासांचीहि तुला जाणीव राहील. तुला नकळत त्यांचा निरोध होणार नाहीं.”

असें भगवान् बोलला. मुदितमनानें राहुलानें भगवंताच्या उपदेशाचें अभिनंदन केलें.

(२) बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें रहात होता. एके दिवशीं राहुलाजवळ आपलें आसन देऊन व त्याला बरोबर घेऊन तो अंधवनात गेला आणि एका झाडाखालीं बसला. राहुलहि त्याला वंदन करून एका बाजूला बसला. तेव्हां भगवान् म्हणाला, “राहुल, चक्षु नित्य आहे कीं अनित्य आहे?”

“भदंत ते अनित्य आहे.”

“जें अनित्य आहे, तें सुखकार आहे की दुःखकारक आहे?”

“दुःकारक, भदंत.”

“आणि जें अनित्य, दुःखकारक, विपरिणामधर्मी तें माझें आहे, तें मी आहें आणि तो माझा आत्मा आहे, असें समजणें योग्य होईल काय?”

“नाहीं, भदंत.”

ह्याप्रमाणें रूप, चक्षुर्विज्ञान, चक्षुःस्पर्श व त्यापासून उत्पन्न होणार्‍या सुखदुःखादिक वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान; श्रोत्र, शब्द... श्रोत्रविज्ञान; घ्राणगन्ध... घ्राणविज्ञान; जिव्हा, रस... जिव्हाविज्ञान; काय, स्पर्श... कायविज्ञान; ह्यासर्वांविषयीं भगवंतानें प्रश्न विचारले व त्यांचीं वरच्याच पद्धतीनें राहुलानें यथायोग्य उत्तरें दिलीं. तेव्हां भगवान् म्हणाला, “राहुल, विद्वान् आर्यश्रावक असें जाणून ह्या सर्व पदार्थांविषयीं विरक्त होतो, आणि वैराग्यामुळें विमुक्त होतो.”

भगवंताच्या ह्या उपदेशानें राहुल अर्हत्पद पावला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel