“काय कबूल करू ?”

“करीन पुन्हा लग्न असे मला सांग. म्हणजे मी सुखाने मरेन. माझे प्राण घुटमळत आहेत.”

सरला रडू लागली. पती पुन्हा वातात गेला. सासूसासरे आले व तेही जवळ बसले. रात्र संपत आली. आयुष्यही संपत आले. सरलेचा पती देवाघरी गेला.

दुर्दैवी सरला माहेरी आली.

सरला आपल्या खोलीच्या बाहेर पडत नसे. मरता येईना म्हणून दोन घास ती खाई. रमाबाई नाही नाही ते तिला बोलत. ‘जाईल तेथे मेली मसणवटी करील. पांढर्‍या पायाची अवदसा कुठली ! सरलेच्या कानांवर ते निखारे पडत. परंतु सर्व गोष्टींची आता तिला सवयच झाली होती.

“बाबा माझे सारे आयुष्य मी कसे दवडू? मला आणखी शिकवा तरी.”

“कर्व्यांच्या कॉलेजात जाशील?”

“वाटेल तेथे जाईन. शिकवा म्हणजे झाले.” आणि सरला महिला महाविद्यालयात जाऊ लागली. पुस्तकांत पुन्हा रमली. आपले दु:ख विसरू लागली. परंतु विसरण्यासारखे ते दु:ख नव्हते. कधी कधी तिला आपले सारे जीवन आठवे. आणि एखाद्या वेळेस तिचे डोळे अकस्मात भरून येत. ती बाहेर उठून जाई. शोकावेग आवरून ती वर्गात पुन्हा येऊन बसे.

त्या दिवशी रविवार होता. आज पर्वतीच्या बाजूस ती एकटीच फिरावयाला गेली होती, आणि पर्वतीच्या पायथ्याखालच्या कालव्याच्या काठाने ती जात होती आणि एके ठिकाणी बसली. तीच ती पूर्वीची जागा. तेथेच ती एकदा खूप वेळ बसली होती. तेथेच रमाबाई व ती दोघी एकदा बसल्या होत्या. मी तुला सख्ख्या आईचे प्रेम देईन असे त्या म्हणाल्या होत्या. कोठे आहे ते प्रेम? आईचे प्रेम ते जगात कुठे मिळेल, कोण देईल? सरला तेथे आजही रडत बसली होती.

तो पाहा एक तरुण मुलगा. कॉलेजमधला विद्यार्थी दिसतो. तोही एकटाच फिरायला आला आहे. त्यालाही का कोणी मित्र नाहीत? तोही का दु:खी आहे? सरलेचे लक्ष नाही. परंतु त्या तरूणाचे तिच्याकडे लक्ष आहे. सरलेचे अश्रू तो पाहात आहे. त्याला वाईट वाटत आहे. त्या बाभळीच्या झाडाखाली तो उभा आहे.

सायंकाळचा प्रकाशही कमी होत आला. कालव्याचे पाणी काळसर दिसू लागले. आजूबाजूस गंभीर भीषण शांतता होती. आणि पुन्हा एकदा सरलेला हुंदका आला. तेथे एक दगड होता. सरलेने दु:खावेगाने त्या दगडावर जोराने डोके आपटले. ती पुन्हा डोके आपटणार तो, तो तरुण विद्युतवेगाने तेथे धावून आला. त्याने तिचे डोके धरले. त्यातून रक्त येत होते.

“कोण?”

“मी.”

“फोडा हो हे डोके ! मरू दे मला ! धरा व जोराने या दगडावर आपटा. मला तितक्या जोराने आपटता येईना. मरावेसे तर वाटते; परंतु धैर्य नाही

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel