“जीव द्यायचा असता तर तो पूर्वीच देतीस.”
“माझा अंत पाहू नका. डोके फोडून जीव देईन. केसांनी गळा आवळीन.”
“ते पाहू. किती दिवस खात नाहीस ते दिसेल. येथे लोळागोळा होऊन पडशील. मग समजेल.”
काय असेल ते असो. त्या दिवशी तिच्या वाटेस कोणी गेले नाही. ती देवाला आळवीत बसली.
दुसर्या दिवशी तिने थोडे खाल्ले. पळून जायचे झाले तर थोडी शक्ती नको का, असा तिने विचार केला. धैर्याने राहायचे तिने ठरविले. आणि तो पुजारी आला, लाळघोटया !
“काय सुंदरा ! आज खूष दिसतेस?”
“हळू हळू आले नशिबी भोगायला तयार असलेच पाहिजे.”
“तू निराश नको होऊस. फक्त लक्षाधिशाचे गिर्हाईकच तुझ्याकडे येईल अशी मी व्यवस्था करीन. प्रतिष्ठित, अब्रूदार माणसेच तुझे दर्शन घेतील. माकडे तुला मिठी मारायला येणार नाहीत. तुझ्यासारखे रत्न कोंबडयापुढे आम्ही टाकणार नाही. परंतु तू माझे ऐकत जा. मी तुझे हाल वाचवीन. तू माझे हाल वाचव. काल रात्रभर मी तळमळत होतो. माझी तळमळ व मळमळ तू दूर कर.”
“तुम्ही रामाचे पुजारी ना? तुम्ही असे कसे? मी व्रतस्थ स्त्री आहे. माझा पती हरवला आहे, का मला टाकून गेला आहे कोणास ठाऊक ! परंतु एक वर्ष तरी पुरे होऊ दे. एक वर्षभर तरी मला रडू दे. एक रामनवमी तरी जाऊ दे. भटजी, पती हरवून चार महिने झाले. आणखी आठ महिने जाऊ दे. आणखी आठ महिने मला अकलंकित ठेवा. मग माझे काय वाटेल ते करा. आता श्रावण महिना संपेल. भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र असे आठ महिने जाऊ देत. ऐका. मी काही पळून जात नाही. या आठ महिन्यांत प्राण गेले तर संपलेच सारे. सुटेन. प्राण नाहीच गेले तर या देहाचे काहीही करा. तुम्ही हे आठ महिने मला मुदत द्या. मग मी तुम्ही सांगाल ते करीन. तुमचे उपकार मी विसरणार नाही. हे आठ महिने माझ्यापासून सर्वांना दूर ठेवा. नंतर या देहावर तुमची सत्ता. तुमच्या पाया पडते.”
“सुंदरा, कोणी पाहिलेत आठ महिने? फुल आहे ते हुंगावे, जवळ घ्यावे, फूल केव्हा कोमेजेल त्याचा काय नेम? मरण केव्हा येईल त्याचा काय नेम?”
“माझे हे अश्रू पाहा. आठ महिने थांबा. मग मी कायमची तुमची आहे. परंतु आठ महिन्यांच्या आत जर कोणी मला भ्रष्टवील तर हा देह मी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. स्त्रियांजवळ हजार मार्ग असतात. मी नागीण होईन, वाघीण होईन. मला स्पर्श करणार्याच्या मानेचा घोट घेईन. त्याला ठार करीन. आणि स्वत:सही या दुनियेतून मी नष्ट करीन. नाही तर आठ महिने वाट पाहा.”
“हे नेमके आठ महिनेच कशाला?”
“पती हरवल्यावर वर्षभर तरी स्त्रीने वाट पाहावी. पती सोडून गेला असेल तरीही वर्षभर वाट पाहावी अशी श्रुतीची, धर्माची आज्ञा आहे. म्हणून सांगते की थोडे दिवस थांबा. ही हरिणी तुमच्या ताब्यात आहे. ती थोडीच पळून जाणार आहे?”