“नलू, जळगाव ग. ऊठ.”
“आले का?”
“हो.”
दोघींनी पटकन वळकटया बांधल्या. सारी मंडळी उतरली. सरलाही अर्थातच उतरली. घोडयाची गाडी करून सर्व मंडळी घरी आली. अद्याप रात्र होती. हातपाय धुऊन, चूळ भरून, अंथरूणे घालून सारी पुन्हा झोपली. सरला व नलू एकत्र झोपल्या होत्या.
सकाळ झाली. हळूहळू मंडळी उठली. नलू उठली. सरला झोपली होती. नलूने तिला उठवले नाही. आठ वाजले.
“सरलाताई !”
“काय ग?”
“ऊठ आता. उशीर झाला.”
“किती दिवसांनी इतकी झोपले.”
सरला उठली. तोंडधुणी, अंगधुणी झाली. सरलेने नीट कुंकू लावले.
“नलू, हे कपाळ पांढरे होते. उदयने त्यावर प्रथम कुंकू लावले.”
“ते कुंकू जन्मसावित्री होईल.”
दोघी मैत्रिणी द्वारकाबाईच्या खोलीकडे गेल्या.
“काय नलू, आलीस लग्न लावून?”
“होय रंगूताई.”
“तुझ्या लग्नात द्वारकाबाई नव्हत्या. तुम्हालाही चुकल्यासारखे झाले असेल. इतके दिवस तुमच्याकडे काम करीत होत्या. परंतु आजारी पडल्या आणि वारल्या. मुलाचीही भेट झाली नाही.”
“फार वाईट झाले. उदय उशिरा आला; होय ना?”
“हो. प्रेत न्यायला होता. परंतु तो स्मशानात घेरी येऊन पडला. त्याला शुध्द येईना. त्याचे मामा त्याला घेऊन गेले.”
“कोठे असतात त्याचे मामा?”
“तिकडे वर्हाडात, कोणते गाव बाई?”
“उमरावती, अकोले, खामगाव?”
“नाही. असे नाही.”
“मग कोणते?”
“थांबा, आठवले. पांढरकवडा. विचित्र नाव. तेथे ते पोलिसखात्यात आहेत.”
“तुम्ही बर्या आहात ना?”
“हो. आणि या कोण?”
“माझी मैत्रिण सरलाताई.”
“बसता का जरा?”
“नको, रंगूताई, पुन्हा येऊ.”
“कुंकू लावून जा हो, अशा नका जाऊ.”