“चला माझ्याबरोबर. मी नाशिकला जात आहे. गाडी येईलच. नऊ-दहाला नाशिक. उद्या लावतो तुमची व्यवस्था. तुमचे काय नाव?”

“सरला.”

“सारे नाव?”

सरला बोलेना. तिला वाईट वाटत होते. दु:ख होत होते.

“बरे राहू द्या. घाई नाही. निश्चिंत असा. सारे चांगले होईल.”

भुसावळकडे जाणारी गाडी आली.

“मी बायकांच्या डब्यात बसते.” सरला म्हणाली.

“काही हरकत नाही. नाशिकला मी हाक मारतो. काळजी नका करू. सारे चांगले होईल. संस्था मोठी चांगली. मोठमोठे लोक तीत आहेत. जा. बसा.”

सरला गेली. बायकांच्या डब्यात ती बसली. गाडी निघाली. मागे नली व ती दोघी होत्या. आज ती एकटीच होती. तिला स्वत:च्या नशिबाचे आश्चर्य वाटत होते. ती मनात विचार करीत होती. “फुटके नशीब ! खरेच मी विषवल्ली आहे. अभागिनी आहे ! उदय, कोठे रे तू आहेस? तू माझ्यासाठी धावून आलास. सरलेचे काय झाले असेल असे मनात आणून अशक्त होतास तरी धावून आलास. बाबांनी तुला वाग्बाण मारले असतील. तू घायाळ झाला असशील. तू का खरेच गेलास जग सोडून? मग माझे रे प्राण का जात नाहीत? ते अद्याप या जगात का घुटमळत आहेत? तू कोठे तरी खात्रीने जिवंत आहेस, या जगात आहेस. तसे नसते तर मला जगावे असे वाटते ना. तुझ्या प्रेमाने केव्हाच माझे प्राण वर खेचून घेतले असते. तू पृथ्वीवर आहेस. परंतु कोठे आहेस? का मी जीव दिला असे समजून निराशेने वेडा होऊन तू कोठे भ्रमत असशील? सरले, सरले म्हणून टाहो फोडीस असशील?”

नलीबरोबर जात असता आगगाडीतून उडी टाकावी असे तिला वाटे. आजही वाटत होते. परंतु दाराजवळ जाऊन ती परत येई. मरण्याचे धैर्य तिला होईना. ती दीनवाणी तेथे बसली होती. केव्हा एकदा नाशिक येते असे तिला झाले होते. मध्येच तो फोटो काढी व प्रेमस्नेहाने त्याच्याकडे बघे. तिने आपली वळकटी सोडली. त्या अमर उशीवर डोके ठेवून चादर अंगावर घेऊन ती पडली. हृदयाशी तो फोटो होता. तिला झोप नव्हती लागली. कशी लागेल झोप? जीवन-मरणाच्या विचारात ती होती.

एकदाचे नाशिक आले. येथेच उदयचे बाळपण गेले. येथीलच गंगेत बुडताना तो वाचला. येथेच लहानाचा तो मोठा झाला. या नाशिक शहरातच तर तो नसेल ना आला? गंगेच्या डोहात जीव द्यायला नसेल ना आला? या शहरात त्याची-माझी भेट नसेल ना व्हायची? सरला निराशेतही आशेला जन्म देत होती.

“उतरा सरलाताई”, तो गृहस्थ येऊन म्हणाला. सरला उतरली. त्या सज्जनाच्या पाठोपाठ ती निघाली. दोघे बाहेर आली. तेथे टॅक्सी तयार होती.

“बसा आत. आपलीच आहे गाडी.” तो म्हणाला. दोघे आत बसली. मोटार निघाली. रात्रीचे दहा वाजले असतील. मोटारीत कोणी बोलत नव्हते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel