“तुझ्या पतीचे?”

“तो खेळ किती पटकन संपला. उदय, नको त्या आठवणी.”

“बरे तर.”

“तुझी आई आहे?”

“हो. आईने मला वाढवले, लहानाचे मोठे केले.”

“तुझी आई कोठे असते? काय करते?”

“सरले, माझी आई दुसर्‍याकडे स्वयंपाक करते व मला शिकविते. किती तिचे उपकार, किती प्रेम !”

“उदय, पाऊस थांबला वाटते?”

“जरा झिम झिम आहे.”

“या छत्रीत येतोस?”

“नको, पावसाची झिमझिम मला आवडते, जणू गुलाबदाणी कोणी शिंपडीत आहे ! लाखो घरांची गुलाबदाणी ! सरले, आज सारी सृष्टी बघ. जिकडेतिकडे हिरवेगार आहे. डोळयांना प्रसन्न वाटते.”

“माझी सृष्टी रे कधी हिरवीगार होईल? कधी सारा रखरखीतपणा नाहीसा होईल?”

“तुझ्या सृष्टीत आनंद येत आहे ना? उषा येत आहे ना? गोडी येत आहे ना?”

“हो असा भास होत आहे खर, परंतु हा भासच न ठरो. आजपर्यंतच्या माझ्या सार्‍या आशा शेवटी आभास ठरल्या.”

“आपली सारी स्वप्ने थोडीच खरी होतात? आकाशातील तारेही तुटतात. गळतात. काही फुले कुस्करली जातात व काहींचे हार होतात; काहींचे सुंदर बी तयार होते. सरले ! काही टिकते, काही मरते.”

“परंतु सारेच न मरो. सारेच स्वप्न न ठरो. उदय, तू कोठे राहतोस?”

“तिकडे लांब. भांडारकर-संशोधन-मंदिराकडे.”

“मी येईन तुझी खोली शोधीत.”

“कधी येशील? सकाळी मी खोलीत नसतो. ग्रंथालयात वाचायला जातो.”

“तू खोलीत केव्हा असतोस?”

“तू सांगशील तेव्हा असेन.”

“उद्या येऊ? सकाळी येऊ?”

“ये.”

“आता जायला हवे. बाबा बोलतील नाही तर. माझा रुमाल हवा का तुला?”

“त्याच्यावर वेल काढून दे. पाखरे गुंफून दे.”

“सकाळी मी येईन हं.”

“ये. मी वाट पाहात असेन.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel