एके दिवशी सरला, उदय, विश्वासराव सारी त्या ग्रामीण आश्रमात आली. सुंदर स्थान होते. सरलेची झोपडी प्रशस्त होती. तेथे पाळणा होता, प्रकाशची सोय होती. आणि आश्रमीय जीवन सुरू झाले. उदय खेडयांतून हिंडू-फिरू लागला. सरला शाळा चालवू लागली. विश्वासरावही त्या वारली वगैरे लोकांत जात. त्यांना अनुभव होता, ते म्हातारे होते, प्रेमळ होते. त्या गरीब लोकांत ते मिसळत. त्यांना नाना गोष्टी शिकवीत, पटवीत.

आणि उदय ग्रामोद्योगाचे शिक्षण घ्यायला गेला. वर्ध्यास गेला. खादीचे साद्यन्त शिक्षण घेऊन आला. नवीन नवीन शोधबोध सारे पाहून आला. त्या गरीब लोकांस तो सूत कातणे शिकवू लागला. बाया, माणसे, मुले कातू लागली. आणि गरिबांना मजुरी मिळू लागली. वृध्द विश्वासराव ठाणे जिल्हाभर आश्रमाचीच खादी घेणारे व्रती लोक मिळवीत हिंडू-फिरू लागले.

आश्रमाचा सुगंध पसरू लागला. मोठमोठे पुढारी भेटी देऊन जात. त्या भेटीची हकीकत वर्तमानपत्रांतून येई. अनेकांच्या कानांवर आदिवासी सेवा मंडळ गेले.

एके दिवशी सरला नि उदय सायंकाळी फिरायला गेली होती. रम्य शोभा होती. मेघांमधून प्रकाश पडला होता. दूरच्या वृक्षांच्या शेंडयांवर तो प्रकाश किती सौम्य-स्निग्ध दिसत होता. पाहात राहावे असे वाटत होते. एकाएकी देखावा बदलला. तिकडे पिवळा रंग सर्वत्र पसरला. आणि मधूनमधून निळया नभाचे दर्शन. जणू पीत समुद्रातली निळी बेटे. जणू पिवळया रेशमी वस्त्रांतून घननीळ गोपाळकृष्णाचे सुंदर शरीर दिसत होते !

“सरले, सरले, बघ तरी !”

“उदय, माझे सारे सौंदर्य म्हणजे तू. तू तिकडे पाहात होतास. मी तुझ्याकडे पाहात होत्ये. पुरूषांना विश्व पाहिजे असते. स्त्रियांना फक्त पती पुरे.”

इतक्यात एक मित्र त्यांना बोलवायला आला व म्हणाला,

“आश्रमात कोणी पाहुणे आले आहेत. ते तुम्हांला भेटू इच्छितात. चला.”

दोघे परत आली. कोण आले होते?

“नमस्कार. ओळखलेत का मला?

“ओळखले. परंतु तुम्ही तुमचे नाव सांगितले नव्हते.”

“तुम्हीच ते घेतले नाही. म्हणाले होतेत मरणाराने कशाला पत्ते घ्यावे? तुम्ही येथे आहात असे कळले. आणि मीही या संस्थेस वाहून घेण्यासाठी आलो आहे.”

“सरले, माझ्या खोलीत हा विद्यार्थी राहात असे.”

“मीही यांना पाहिले होते.”

“याने मला वाचवले. मरू नका सांगितले. सेवेचा मंत्र दिला. सरलेचे प्रेम ही एक सत्यता; परंतु सामाजिक कर्तव्ये ही दुसरी सत्यता असे याने सांगितले. सरले, तुझ्या उदयला याने वाचवले.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel