उदय, काय रे हे मी केले? आपण वेळेवर आलो नाही, सरलेशी रमलो, म्हणून आईला शेवटी भेटलो नाही असा धक्का बसून तू धाडकन पडलास. तुझी स्मृती गेली आणि हे असे सारे पसारे झाले ! तू वेळेवर जातास तर हे झाले नसते. आई देवाकडे गेली असती. परंतु तू दु:ख गिळून माझ्याकडे येतास. आपण विवाहबध्द होऊन नीट राहिलो असतो. परंतु आता काय? तुझी आई गेली आणि तूही का गेलास? तू या जगात नसतास तर मला का राहवले असते? तू या जगात कोठेतरी आहेस. सरलेला शोधीत असशील. तू प्राणत्याग करतास तर माझेही प्राण गळून पडते. मला जगावेसे वाटते. डोके आपटून वा फास लावून मरावे असे वाटत नाही. यावरून तू आहेस असे वाटते. उदय, तुझी सरला या नरकात येऊन पडली आहे असे ऐकून तुला काय रे वाटेल? आपण कदाचित परत भेटलो तर तू घेशील का मला जवळ? मातीत पडलेले फूल आपण हळू हाताने उचलून घेतो. चिखलातले कमळ घेतो. परंतु चिखलातले कमळ स्वत:ला घाण लागू देत नाही ! ते अलिप्त असते. मीही का अलिप्त नाही? येथे का कशात माझे मन रमत आहे?

देवा, काय रे करू? तू भक्तांसाठी धावतोस. अनाथांचा तू नाथ. परंतु माझी कोठे आहे एवढी भक्ती? माझ्याजवळ काही नाही. परंतु अगतिक होऊन तुला मारलेली एक हाक, ती तुला पुरी होते असे म्हणतोस. मला सोडव रे. ये कोणाचे रूप घेऊन.

सरलेच्या मनातील दु:ख कसे सांगावे, कसे वर्णावे? ती रात्र संपूच नये असे तिला वाटत होते. सभोवतीचा तो अंधार अनंत असावा असे तिला वाटत होते. परंतु पलीकडे गाणे-बजावणे चालले होते. थट्टाविनोद कानी येत होते. नरक जवळ होता. ती थरथरत होती. कोणी येईल या भीतीने ती घाबरत होती.

ती तेथेच भिंतीजवळ पडली. फरशीवरच निजली. त्या दु:खातही जरा तिचा डोळा लागला. खरोखरच निद्रा म्हणजे अति थोर वस्तू आहे. निद्रा म्हणजे प्रेमाची माता आहे. त्रस्त जिवाला ती हळूच जवळ घेते. नकळत येऊन त्याचे डोळे मिटते. त्याच्या मनाला विसावा देते. निद्रा म्हणजे पृथ्वीवरचे अमृत आहे. जगात निद्रा आहे म्हणून शांती आहे, समाधान आहे, थोडी विश्रांती आहे. थोडे हायसे वाटते. निद्रा नसती तर हे जग भेसूर वाटले असते. जीवन असह्य झाले असते. दु:ख, क्लेश मानसिक यातना, अपमान- सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे निद्रा. निद्रा म्हणजे सुधासिंचन, निद्रा म्हणजे आरोग्यदायिनी देवता. निद्रा म्हणजे प्रभूचे परम कारूणिक स्वरूप. निद्रा म्हणजे सर्व धडपडींचे, ओढाताणीचे, यातनांचे तात्पुरते तरी मरण.

सरले, क्षणभर तरी तुझी ओढाताण थांबू दे. तुझ्या जिवाला थोडा विसावा मिळू दे. सकाळी उठलीस म्हणजे तुला धीर येईल. संकट आले आहे खरे; त्यातूनही पार पड. तुझी श्रध्दा तुला पार नेईल. अदृश्य शक्ती तुला वाचवतील. या जगात आश्चर्ये होत असतात. आश्चर्यांचे युग संपले असे नाही. आश्चर्ये रोज घडत आहेत. जो पाहील त्याला दिसत आहेत.

सकाळ झाली. सरला तेथे उठून बसली होती. तिचे मुखकमल अति म्लान झाले होते. गळून गेलेल्या वेलीप्रमाणे दिसत होती. शेवटी ती उठली. तोंड वगैरे धुऊन ती आली. ती देवाचे नाव घेत बसली. थोडया वेळाने ती उठली. ती स्नान करून आली. आणि डोळे मिटून खरेच तिने जप आरंभला. तिने त्या नरकाचे तपोवन केले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel