थोडा वेळ दोघे बरोबर जात होती. आणि आता रस्ते निराळे होणार होते.
“मी तुझे घर पाहायला येऊ?”
“नको, बाबा रागावतील.”
“दुरून पाहीन.”
“आपण बरोबर आहोत असे ते पाहतील.”
“मी दुरून चालेन.”
“पण आज नकोच. पुढे केव्हा तरी दाखवीन माझे घर. परंतु माझे घर तुला माहीत हवे.”
“ते आपोआप कसे माहीत होईल?”
“मी इथून दाखवू माझे घर?”
“इथून कसे दिसेल? इतके का जवळ आहे?”
“हो”
“दाखव.”
तिने त्याच्या हृदयावर हात ठेवला. तेथे आपले बोट तिने रोवले.
“हे माझे घर कोणाला न दिसणारे घर; उदय, होय ना? येऊ ना तेथे राहायला? करशील ना स्वागत? तू स्वागत कर वा नको करू. मी तेथे येऊन बसेन. तेथली राणी होईन, तेथली मोलकरीण होईन. तू एकदाच भेटलास, एकदाच दिसलास, एकदाच बोललास. परंतु जणू माझा झालास. तू माझा आहेस की नाही ते काय सांगू? परंतु मी तुझी आहे. मी माझे जीवन तुझ्या पायी वाहात आहे.”
“जा आता घरी. बाबा रागवतील.”
“तुला माझा कंटाळा आला? माझे बोलणे आवडले नाही, होय ना?”
“सरले, निराश नको होऊ. आपण आशेने राहू. जा आता.” तिने हात क्षणभर हातांत धरला. आणि ती गेली, तो गेला.
रात्री सरला आपल्या खोलीत बसून त्या रुमालावर वेली गुंफीत होती, फुले फुलवीत होती, पाखरे विणीत होती. ती निजली नाही. हृदयातील अनंत प्रेम जागे झाले होते. शेकडो जन्म बुभुक्षित राहिलेले प्रेम ! ते प्रेम आता का निजेल? सरला गुणगुणत होती. तिची बोटे गुंफीत होती. तिचे कोमल हृदय कल्पनातरंगावर फुलाप्रमाणे नाचत होते.