मी त्या संस्थेत तुम्हांला सोडीन. मग सकाळी भेटायला येईन. रात्रभर विश्रांती घ्या. तुमचे दु:ख विसरा. ही संस्था तुमची चिंता दूर करील. तुम्हाला उद्योग देईल. आपल्या पायांवर तुम्ही उभ्या राहाल. स्वावलंबनाने तुम्हांला राहता येईल. येथे निरनिराळे शिक्षणही मोफत मिळते. तुम्ही सारे पाहालच आता.”

सरला ऐकत होती. थोडया वेळाने तिने विचारले,

“ही संस्था का नवीन आहे?”

“तशी नवीन नाही. जुनीच आहे. परंतु तिची जाहिरात फारशी नाही. संस्थेचे वाढदिवस, अहवाल असला प्रकार नाही. संस्थाचालकांना उदोउदो आवडत नाही. सेवा करावी, मुकेपणाने काम करावे, अनाथ स्त्रियांना आधार द्यावा, दु:खी भगिनींना सुखी करावे. वर्तमानपत्रातून या संस्थेची स्तोत्रे आली नसली तरी देवाघरी संस्था रूजू आहे. प्रभू रामचंद्राची ही नगरी. येथे पंचवटीत ते राहिले. अशा या नाशिक क्षेत्रातील ही संस्था आहे. पुण्यवान संस्था.”

मोटार शहरात शिरली. वळणे घेत घेत एका मोठया वाडयाजवळ ती थांबली. एक नोकर बाहेर आला.

“काही सामान?” त्याने विचारले.

“हे यांचे सामान. यांना नीट आत ने. चांगली व्यवस्था करा. मी सकाळी येईनच. उतरा सरलाताई. तुम्ही निश्चिंत राहा. जा.” तो सज्जन म्हणाला.

सरला उतरली. ती वाडयात शिरली. वाडयाचे दार लागले. मोटार पों पों करीत निघून गेली.

“चला जिना चढून.” तो नोकर म्हणाला. एक जिना चढून झाला. आणखीही एक जिना होता. तोही चढून झाला. आणि गॅलरीतून आत जाता जाता एक खोली आली. खोलीत एक पलंग होता. त्यावर गादी-उशी सारे होते. तांब्या-भांडे होते.

“बसा येथे.” नोकर म्हणाला.

सरला त्या खोलीत गेली. ते सामान तेथेच होते. नोकर निघून गेला. खोलीत विजेचा दिवा होता. खोलीला गुलाबी रंग होता. सरला खाली वळकटीवरच बसली.

थोडा वेळ गेला आणि एक गलेलठ्ठ बाई आली.

“वा: ! आजचे पाखरू नाजुक आहे. छान झाले काम. किती दिवस एखादे खुबसूरत सुंदर सावज मिळावे म्हणून धडपड होती. आता आश्रमाचे नशीब फुलणार. पैशाला आता तोटा नाही. काय नाव तुमचे?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel