“सरला येथे कधी आली होती का?”
“बरेच दिवसांत नाही आल्या. तुम्ही येथे नाही तर त्या कशाला येतील? या खोलीत तुमची नावे आहेत. तो नवीन विद्यार्थी हसतो.”
“खोलीला नवीन रंग नाही का दिलास?”
“रंगेल माणसे आली तर द्यावा रंग. हा नवीन मुलगा भुक्कड दिसतो. तुम्ही असतेस तर गुलाबी रंग दिला असता. जा, बघून या नवीन खोली. सामान ठेवा इथे.”
भैय्या पुन्हा नळावर गेला. उदय खोलीत डोकावून बघत होता. इतक्यात तो विद्यार्थी आला.
“कोण आपण?”
“माझे नाव उदय”
“अस्से. या खोलीत तुम्ही राहात असा?”
“होय.”
“ते पाहा तुमचे नाव आणि ते दुसरे.”
“ही नावे अद्याप आहेत ! तुम्ही पुसून नाही टाकली?”
“प्रेमाची नावे मी कशाला पुसू?”
“ही वेल, ही पाखरे, सारे तसेच आहे.”
“तुमची स्मृतिचिन्हे. होय ना?”
“हो. सरला येथे आली होती का? माझी चौकशी करीत आली होती का?”
“येथे कोणी आले नाही. जरा बसा हां. मी हाततोंड धुऊन येतो.”
तो मित्र गेला. उदय त्या खोलीत उभा होता. सारे पाहात होता. ती वेल, ती पाखरे, ती नावे ! सारी त्याच्याजवळ बोलत होती. त्याला किती आठवणी आल्या. गोड गोड आठवणी. तो खिडकीजवळ गेला व समोर पाहात होता. इतक्यात तो विद्यार्थी आला.