हा अभंग एक भक्त भक्तीने म्हणत होता. सरलेला रडू आले. केव्हा येईल उदय असे सारखे तिच्या मनात येईल. पहाटेची वेळ होत आली. मंदिरात गर्दी होऊ लागली. ती चंद्रभागेच्या तीरावर गेली. तिने तोंड धुतले. तिने स्नान केले. आणि तेथेच ती बसली. तीरावर माणसेच माणसे. तिने आपले लुगडे वाळत टाकले होते. तिने ती पत्रे काढली. ते फोटो काढले. तिने फुले आणली होती. तो फोटो तिने हृदयाशी धरला. तिला हुंदका आवरेना. “उदय, कोठे रे आहेस राजा? मी अभागिनी आहे. ये, ये रे, ये असशील तेथून.” असे ती म्हणे. त्याच्या त्या फोटोकडे ती पुन:पुन्हा पाही. कसे आहेत डोळे ! कसे आहेत ते राजीव-लोचन? “उदय, तुझा फोटो पाण्यावर सोडून देते. रत्नाकराजवळ जाऊन तो   राहील !” असे म्हणून तिने त्या फोटोची पूजा केली. अश्रूंचे अर्ध्य दिले. आणि तो फोटो तिने पाण्यावर सोडून दिला. ती पाहात होती. चंद्रभागेच्या प्रवाहात कोणी दिवे सोडतात. सरलेने आपली प्रेमपताका सोडली होती. प्रेममूर्ती सोडली होती आणि तिने ती सारी पत्रे घेतली. तिने ती एकदा हृदयाशी धरली. आणि शेवटी ती पत्रे तिने चंद्रभागेजवळ दिली. जणू प्रेमाच्या फुलांची चंद्रभागेला ती भेट देत होती.

“चंद्रभागे, संतांचे प्रेम तू अपार चाखलेस. आता हे माझे प्रेम थोडे चाख. हे माझ्या जीवनातील प्रेम ! हे का अमंगल आहे, अशुचि आहे? नाही. हेही निर्मळ आहे. या प्रेमाची ही पत्रे घे. प्रेमपुष्पांच्या या सुगंधी पाकळया घे.”

तो फोटो चालला. ती पत्रे चालली. सरला उभी होती. पायांखाली चंद्रभागा वाहात होती. डोळयांतून प्रेमगंगा वाहात होती. किती वेळ तरी ती उभी होती. परंतु शेवटी थकली. पोटात कळ येते असे तिला वाटले. ती चरकली. ती परत आली. पाण्यातून बाहेर आली. वळकटी व तांब्या घेऊन निघाली. लुगडे वाळले होते. तेही तिने घेतले. हळूहळू चालत होती. कशीबशी घाट चढून आली. आणि तिने एक टांगा केला.

“त्या अनाथ आश्रमांकडे ने.” ती म्हणाली.

टांगेवाल्याने ओळखले आणि त्याने टांगा नीट नेला. सरला उतरली. अनाथ परित्यक्तांना आधार देणारे ते खरे प्रभुमंदिर होते. प्रभूच्या मूर्ती तेथे वाढत होत्या. तेथे जिवंत परमात्मा होता.

व्यवस्थापकांच्या कार्यालयात ती गेली. प्रश्नोत्तरे झाली :

“दहा दिवस झाल्यावर तुम्हांला जावे लागेल.” सांगण्यात आले.

“मी जाईन. बाळाला ठेवाल ना?”

“ठेवू.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel