आई मुलाची वाट पाहात होती. दिवाळीत आला नाही, नाताळात आला नाही. परीक्षा आहे, अभ्यास असेल, होऊ दे एकदाची परीक्षा असे द्वारकाबाई म्हणत असत. परंतु त्यांच्याच्याने आता काम होईना. त्या आजारी पडल्या. आपल्या खोलीत त्या आता पडून असत. स्वत:च थोडी भाकरी करून खात. परंतु दिवसेंदिवस त्यांना अधिक अशक्त वाटू लागले. तापही येई. ग्लानी येई. त्यांनी भावाला बोलावून घेतले. भाऊ आला होता. पोलिस खात्यातील भाऊ. परंतु प्रेमाने सारे बहिणीचे करीत होता. एके दिवशी द्वारकाबाई भावाला म्हणाल्या, “भाऊ, उदयची उद्या परीक्षा संपायची होती. आता त्याला पत्र पाठव. इतके दिवस त्याला आपण कळविले नाही. परंतु त्याला आता कळव. म्हणावे लवकर ये. माझा भरवसा नाही.”
आणि मामाने त्याप्रमाणे उदयला कळविले. परंतु उदय आला नाही. ती माऊली वाट पाहात होती.
“नाही का रे आला उदय? त्याचे पत्र तरी?”
“तोही नाही व पत्रही नाही.”
“परीक्षा संपून कोठे गेला की काय? परीक्षेची उत्तरे चांगली गेली नाहीत की काय? वाईट वाटल्यामुळे आला नाही की काय? का बरे आला नाही? उद्या तार तरी कर. एकदा भेटू दे. मी जगेनसे वाटत नाही. एकदा शेवटचे त्याला डोळे भरून पाहीन.
द्वारकाबाईना सारखा उदय दिसत होता. त्याच्या आठवणी त्यांना येत होत्या. कोणी आले की, उदयच्या आठवणी त्या सांगू लागत. आणि दिवसातून शंभरदा त्यांच्या डोळयांतून पाणी येई. एके दिवशी त्यांची मालकीण त्यांच्या समाचाराला आली होती.
“कसे वाटते द्वारकाबाई?”
“या बसा. तुम्ही कशाला आल्यात? येथे बसायलासुध्दा नीट जागा नाही. तो पाट घ्या. बसा.”
“जरा बरे वाटते का?”
“जीव आत ओढतो आहे. मी जगेनसे नाही वाटत. प्राण कंठात गोळा होत आहे असे वाटते. घाबरल्यासारखे वाटते. एकदा उदय आला म्हणजे झाले.”
“त्याची परीक्षा झाली ना?”
“हो, खरे म्हणजे यायचा.”
“ही अलीकडची मुले. त्यांना काही वाटत नाही. परीक्षा संपली. चार दिवस चैन करून येईल. नाटक-सिनेमा पाहील. मित्र असतात. मोह पाडतात.”