“किती वेळ झाला? वाळले का रे पातळ?”

“हो वाळले. ऊठ. नेस नि जा. घरी वाट पाहतील.”

“हेच माझे घर. आज खरोखर घर झाले, नाही का उदय?”

ती उठली. वाळलेले पातळ ती नेसली. तिने केस नीट विंचरले. मी तिला फुले आणून दिली. ती म्हणाली, “तूच घाल माझ्या केसांत.”

“तुला नाहीत का हात?”

“माझ्या हातांपेक्षा तुझे हात मला आवडतात. तुझ्या हातांतून खावे, तुझे हात स्वत:ला लावून घ्यावेत असे मला वाटते. घाल लौकर केसांत फुले. उशीर होईल.” असे म्हणून तिने हळूच माझ्या गालावर चापट मारली आणि “लागले हो माझ्या राजाला” म्हणाली. “तू मार मला चापट, जोराने मार.” असा ती हट्ट धरून बसली. ते सारे त्याला आठवले. आज तो गारठून आला होता. त्या आठवणीने त्याला प्रेमळ ऊब मिळाली. त्याने कपडे बदलले. त्याला भूक लागली होती. त्याने आज चांगलाच स्वयंपाक केला. तो पोटभर जेवला. जेवून पांघरूण घेऊन झोपला. आज किती सुंदर झोप त्याला लागली होती !

तो सकाळी उठला. त्याला आज हलके वाटत होते. सरला माझ्या पत्राचा आत्यंतिक अर्थ घेणार नाही असे त्याला वाटले. ती येईल, रडेल. परंतु पटकन हसेल, असा त्याला विश्वास वाटला. कॉलेजातून तो खोलीत आला, तो ते पत्र ! सरलेचे पत्र. त्याने उघडले. वाचले. त्याला जोराने हुंदका आला. “अरेरे !” हा एकच शब्द मी उच्चारीत आहे. “अरेरे” असे त्या पत्रात होते. त्या लिहिण्यात किती वेदना होत्या ! आणि सायंकाळी तेथे ये म्हणून त्यात लिहिले. परंतु केव्हा होईल सायंकाळ ! पाखरू होता आले असते तर पटकन सरलेकडे मी गेलो असतो. परंतु तिचे घरही अद्याप मला माहीत नाही. त्या कालव्याच्या काठी तिने बोलावले आहे. तो घडयाळात सारखा पाहात होता. शेवटी तो निघाला. मध्येच झपझप चाले. मध्येच त्याची पावले मंद होत. मनाच्या गतीप्रमाणे पावले पडत होती. वळला त्या कालव्याकडे. त्याला कोणी तरी तेथे बसलेले दिसले. अपराध्याप्रमाणे तो हळूहळू चालू लागला. आला. जवळ आला. सरला एकदम उठली.

“उदय, उदय, काय रे असे लिहिलेस?” ती एकदम उठून जवळ येऊन म्हणाली.

“पण आली ना? ते सारे खोटे असे सांगण्यासाठी आलो ना? चल तेथे बसू.”
“किती रे मला दु:ख दिलेस? रात्र जाता जाईना. उदय नको हो पुन्हा असे लिहू. किती रे निराशा मी भोगायची? आजपासून सरलेला रडवायचे नाही, दुखवायचे नाही, असे ठरव. मी आधीच मेलेली. मला आणखी मारू नको. मला सजीव केलेस ते का पुन्हा मारण्यासाठी?”

“सरले, असे कधी येतात क्षण. नेहमी का एकाच वृत्तीत असतो आपण? परंतु वर अशा लाटा कितीही आल्या तरी आपण परस्परांनी खालचा अथांग, गंभीर प्रेमसागर लक्षात ठेवला पाहिजे. आणि क्षणिक दु:ख विसरून पुन्हा श्रध्देने व विश्वासाने राहिले पाहिजे. मी असे चार शब्द लिहिताच तुला का असे वाटते की संपले याचे प्रेम? तुझा विश्वास का इतका लेचापेचा आहे? मी तुला विसरणे शक्य तरी आहे का? असे कधी मी लिहिले तरी त्यावर विश्वास नको ठेवीत जाऊस. उदयचे हे क्षणिक वादळ आहे असे समज हो. कालसुध्दा येथे येऊन गेलो. सरले, आपण दोघे एकमेकांची झालो आहोत. असल्या गोष्टींनी आपण दूर नाही होणार. कोण आपली ताटातूट करील? मृत्यूनंतर एकत्र असू. हस बरे एकदा.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel